Total Pageviews

Sunday, 9 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २६०

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २६०
सुभेदार पिलाजी जाधवराव
सन १७०८ मध्ये शाहूमहाराज मोगली कैदेतून सुटून साताऱ्यास आले. त्यावेळी परतीच्या वाटेवर पिलाजीराव जाधव त्यांना सामोरे गेले. बाळाजी विश्वनाथ पेशवे पदावर आल्यावर एकदा दमाजी थोरात यांनी हिंगणगावच्या गढीत त्यांना कैद केले होते. तेरा तासात पकडून पिलाजीरावांनी त्यांना शाहूराजांपुढे आणले (१७१६). दिल्लीच्या स्वारीत बाळाजी विश्वनाथांबरोबर पिलाजी होते. (१७१८). औरंगाबादमध्ये निजामाचा बंदोबस्त पिलाजीरावांनी केला. (१७२४). जंजिऱ्याच्या मोहिमेत पिलाजीरावांनी चांगली कामगिरी बजावली. वसईच्या मोहिमेत पिलाजींनी पोर्तुगीजांशी सामना दिला. गढामंडलाच्या मोहिमेत छत्रसालाच्या मुलाने बाजीरावाबरोबर पिलाजीरावांचाही सत्कार केला. बंगालच्या स्वारीतसुद्धा पिलाजीराव होते. व्यकंटराव घोरपडे व कोल्हापूरकर छत्रपती संभाजी यांचा तंटा त्यांनी मिटविला. कानोजी आंग्रे यांना इंग्रज आणि पोर्तुगीज यांचेविरुद्ध मदत केली. ‘फिरंगीयांनी हिराकोटावर लगट केली ते समयी पिलाजी जाधवांनी जातीनिशी अंगेजणीं करून फिरंगी व इंग्रज मारून काढला. तारेवरची शर्थ करून जागा जतन केला.’पिलाजीरावांनी सासवड, दिवा, वाघोली, जाधववाडी या व्यापारी पेठा वसविल्या. यासंबंधी शाहूमहाराज एका पत्रात म्हणतात, ‘राज्याभिषेक शके ३४ सर्वधारी नाम संवत्सरे शाहू छत्रपती महाराज यांनी पिलाजी बिन चांगोजी यास मौजे दिवे येथे पेठ बसविण्यास सोयीचे गाव आहे, तरी पेठ वसवावी, तिचे नवा शाहुपुरी असे ठेवावे. त्यास तुम्हास पेठेचे इनाम वंशपरंपरेने इतर ठिकाणचे वाणी उदमी आणावे, वतन वंशपरंपरेने खावे..’दिवेघाटातील मस्तानी तलाव म्हणून ओळखला जाणारा तलाव पिलाजीराव यांनी बांधला.पेशव्यांच्या दरवाजात पिलाजीरावांचा मान इतर सरदारांपेक्षा विशेष असा होता. त्यांचा एकंदर फौजफाटा व जातसरंजाम मिळून अडीच लक्षांचा मुलुख होता. बाळाजी बाजीराव पेशवे हे पिलाजी जाधवराव यांना स्वत:च्या वडिलांप्रमाणे पूज्य मानून त्यांचा आदर राखीत. त्यांना ते काका म्हणत. पिलाजीरावांचे देहवसान दि. ३ जुलै १७५१ रोज वाघोली येथे झाले.

No comments:

Post a Comment