खंडो बल्लाळ—
भाग ४
चिटणिसी वतन खंडोबाकडे आलें होतें; परंतु ते चालविण्यास जीं गांवें दिली होतीं, तीं त्याच्याकडे शेवटपर्यंत चालली नाहींत. संभाजी राजाच्या वेळी तर इनामती उजू होणें शक्य नव्हतें; आणि संभाजी राजानंतर राजाराम चंदीस जाऊन पडल्यामुळें पैसा कोठूनहि मिळेनासा झाला. त्यामुळें खंडोबा नेहमी कर्जबाजारी राहून त्याच्या घरीं नेहमीं सावकारी धरणीं बसलेलीं असत. खंडोबाचा भाऊ निळोबा हाच घरचा कारभार पाहत असे. परंतु तो भयंकर उधळ्या असे. त्याला कधी खर्चाबद्दल बोलल्यास तो आम्हाला ब्राह्मणी वेश नको म्हणून वर्दळीवर येई. म्हणून खंडोबानें त्याच्याजवळ खर्चाबद्दल बोलणें सोडून दिलें होतें. खंडोबाची प्राप्ति म्हणजे पूर्वी येसूबाईकडून मिळालेला व नंतर राजारामाकडून मिळालेला ऐवज हीच होती. खंडोबा घराच्या व्यवस्थेकडे कधीच पहात नसे. त्याच्या पहिल्या बायकोचें नांव म्हाळसाबाई असून तिला बहिरवजी नांवाचा पुत्र व पुतळाबाई नांवाची कन्या होती. ही बायको चंदीस गेल्यानंतर एक वर्षाच्या आंत वारली म्हणून दुसरें लग्न केलें. तिचेंहि नांव म्हाळसाबाई असेंच होतें. ती किंचित कुरूप होती. म्हणून राजाराम महाराजांनी तिसरें लग्न करून दिलें. तिचें नांव तुळजाबाई असें होतें. दुसर्या म्हाळसाबाईला जिवाजी, बापूजी, गोविंदराव व सदाशिव हे चार पुत्र व बायजाबाई ही कन्या होती. तुळजाबाईस एक पुत्र व सात कन्या अशीं आठ अपत्यें झाली. मुलाचें नांव भैरवजी व मुलींचीं संतु, आमा, अनु, सुंदरा, तुकाबाई, राणी व येसू अशीं होतीं.
चंदीहून निघतांना खंडोबा खासाच निघाला होता. गणोजी शिर्क्याने त्याचा कबिला पोहोंचता करावयाचा. परंतु निळो बल्लाळानें जर खंडोबाचा सर्वच कबिला येथून गेला तर आमची वाट काय म्हणून हट्ट धरला. तेव्हां म्हाळसाबाई व तिचीं मुलें काय ती गणोजीनें पोहोंचविलीं. नंतर किल्लेदाराची सरसबाई हिला मूल नव्हतें म्हणून पुतळाबाईची तीन वर्षांची एक कन्या ठेवून घेऊन तिची सुटका केली. खंडोबानंतर जिवाजी खंडेरावास चिटणिसी दिली. [लेखक- वा. सी. बेन्द्रे].
No comments:
Post a Comment