Total Pageviews

Saturday, 22 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १००


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १००

महाराणी जिजाबाई संभाजीराजे भोसले
(मृत्यू -१७ फेब्रुवारी १७७३ ) :-

महाराणी ताराबाईनंतर करवीरकर संभाजीराजांच्या पत्नी महाराणी जिजाबाई यांनी अठराव्या शतकात जी राजकीय कर्तबगारी दाखविली, तिच्यामुळेच कोल्हापूरचे राज्य टिकले.संभाजीराजे यांना आनंदीबाई, उमाबाई, सकवारबाई, जिजाबाई, सुंदराबाई, दुर्गाबाई व कुसाबाई अशा एकूण सात राण्या होत्या. त्यांपैकी जिजाबाईंशी त्यांचा १७२७ मध्ये विवाह झाला. त्या सुस्वरुप असून हुशार व चाणाक्ष होत्या. त्यामुळे त्या राज्यकारभारात जातीने लक्ष घालीत व त्यांचे राणीवसात वर्चस्व होते आणि संभाजीराजेही त्यांचे ऐकत असत,
त्यांच्या कुशल धुरीणत्वाचे पुरावे तिच्या अनेक पत्रांमधून विखुरले आहेत. २१ नोव्हेंबर १७६३ ला जिजाबाई यांनी लिहीलेल्या पत्रात शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग येथील हाताचे व पायाचे ठशांवर घुमटी व कोनाडा बांधून त्यांची दररोज पूजाअर्चा करण्याची व नैवेदय दाखविण्याची आज्ञा केली होती.छत्रपती संभाजीराजे हयात असतानाही राज्यकारभाराची धुरा बऱ्याच प्रमाणात जिजाबाईंच्या खांद्यावर होती. संभाजीराजे त्यांच्या सल्लामसलतीवर अवलंबून असत, एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर कारभाराची अनेक प्रकरणेही सोपवून देत असत. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ एक तपाचा काळ हा जिजाबाईंच्या स्वतंत्र कर्तृत्वाचा काळ होता. आपापली सत्ताकेंद्रे अबाधित राखणे हा त्या काळाचाच धर्म म्हटला तर जिजाबाईंनी त्या धर्माचे उत्तम पालन केले, असे म्हटले पाहिजे.
संभाजींना कोणत्याच राणीपासून पुत्र-संतती झाली नाही. मरतेसमयी त्यांची राणी कुसाबाई गरोदर होती. तिला कन्या झाली. त्यामुळे जिजाबाईंनी दत्तक मुलगा घेतला. जिजाबाई व छ. संभाजींना पहिला बाजीराव आणि पुढे नानासाहेब पेशवा यांच्या मुत्सद्देगिरी व लष्करी सामर्थ्य यांपुढे आपला टिकाव लागणार नाही, याची कल्पना होती; म्हणून त्यांनी वारणेच्या तहानंतर सबुरीचे धोरण अवलंबिले. नानासाहेब पेशव्यांनी १७४० मध्ये संभाजीं- बरोबर दोन्ही गाद्या शाहूंच्या मृत्यूनंतर एकत्र करण्याचा गुप्त करार केला होता; पण शाहूंच्या मृत्यूनंतर (१७४९) प्रत्यक्षात तो कार्यवाहीत आला नाही; तेव्हा छ. संभाजीराजांनी सातारकडे फौजा वळविल्या होत्या, पण जिजाबाईंच्या सल्ल्यावरुन त्यांनी माघार घेतली. कारण मरतेसमयी शाहू महाराजांनी नानासाहेबांना दिलेल्या दोन सनदांमुळे त्यांनी या कराराकडे दुर्लक्ष केले. शिवाय या सनदांत एक महत्त्वाची अट होती, दत्तकाच्या बाबतीत ‘ कोल्हापूरचे करु नये ’, त्यामुळे संभाजींनी १७५०-५१ दरम्यान राज्यकारभारातून लक्ष काढून घेतले असावे; कारण त्यानंतरच्या पत्रव्यवहारांत जिजाबाईंना उद्देशून लिहिलेली पत्रे अधिक आहेत. सदाशिवरावभाऊस लिहिलेल्या एका पत्रात संभाजीराजे म्हणतात, ‘ विनंती पत्री सविस्तर अर्थ लिहीत जाणे. वरकड कित्येक राणीवास वाडा चौथा याजपाशी जे सांगणे ते सांगितले आहे. सविस्तर पत्रे त्या लिहीतील, त्यावरुन कळेल ’.कोल्हापूरचे छत्रपती आणि पेशवे यांचे ताणलेले संबंध जिजाबाईंनी शर्थीने सुधारले आणि डावपेच आखीत राज्यरक्षणाचा हेतू सिद्धीला नेला .

No comments:

Post a Comment