Total Pageviews

Monday 8 August 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५
शूरवीर मराठा सरदार आनंदराव गोविंदराव गायकवाड_भाग
६ 
आबा शेलूकर नांवाचा इसम गुजराथेंत पेशव्यांतर्फे सुभेदार होता. तो दौलतराव शिंद्याकडे गेला असता तेथें त्यास कैद करण्यांत आलें. हें कृत्य रावबाजीच्या सांगण्यावरून झालें. त्यांत गोविंदरावाचा हात होता. परंतु शेलूकरानें दहा लाख रूपये देण्याचा दौलतरावाशीं करार करून आपली सुटका करून घेतली व परत येऊन तो अहमदाबादचा कारभार पाहूं लागला. शेलूकर हा नाना फडनाविसाच्या पक्षाचा असल्यामुळें बाजीरावानें गुप्तपणें गोविंदरावास त्याच्या विरूध्द पुन्हां उठविलें. याच सुमारास शिंद्यानेंहि रकमेच्या भरपाईचा तगादा लावल्यामुळें शेलूकरानें गायकवाडाच्या कांही गांवांपासून पैसा उकळला. त्यामुळें दोघांमध्यें पुन्हां भांडणें सुरू झाली. इ. स. १७९९ सालीं सुरतचा नबाब मरण पावला. तेव्हां सुरतेच्या चौथाईचा गायकवाडाचा हिस्सा प्राप्त करून घ्यावा असा इंग्रजांनीं मनसबा ठरविला व त्याप्रमाणें त्यांनीं गोविंदरावास विनंति करून तो हक्क तर मिळविलाच; परंतु त्याबरोबर चौ-याशी जिल्हाहि आणखी पदरांत पाडला. वास्तविक १७९३ सालीं पेशव्यांनां जशी या सुरतेच्या हक्काबद्दल इंग्रजानीं हरकत घेतली तशी या वेळेस पेशव्यांनांहि घेतां आली असती. पण पेशवे सध्या निर्बळ झाले होते. या देणगीबद्दल इंग्रजांनां गोविंदरावानें शेलुकराविरूध्द मदत मागितली पण इंग्रजांनीं त्याबद्दल टाळाटाळच केली. तथापि थोडक्याच दिवसांनीं अहमदाबाद गायकवाडच्या हातीं आलें, आबा शेलूकर कैद झाला व पेशव्यांनीं गायकवाडास आपला गुजराथेंतील हिस्सा वार्षिक पांच लाख रूपयांवर पांच वर्षांकरितां इजा-यानें दिला (१८०० ऑक्टोबर). इकडे गोविंदराव सप्टेंबरांतच मरण पावला. त्याच्या मागून त्याचा मुलगा कान्होजी हा मुतालकीचा कारभार पाहूं लागला. परंतु त्याच्या उद्दाम वागणुकीनें थोड्याच दिवसांत आरबसैन्यानें त्याला पदच्युत करून आनंदराव (त्याचा भाऊ) यास कारभारी केलें. त्यामुळें आनंदराव व त्याचा चुलता मल्हारराव यांत वैर माजलें. तेव्हां आनंदरावाचा दिवाण रावजी आप्पाजी यानें इंग्रजांकडे मदत मागितली व ती त्यांनीं दिली. यावेळीं सर्व सत्ता आरबांच्या हाती गेली होती. इंग्रजांच्या मदतीनें आनंदरावानें मल्हाररावाचा पराभव करून त्याला नडियादकडे (कडी प्रांतांत) कांही जहागीर दिली. या सुमारासच गणपतराव व मुरारराव गायकवाड यांनीं बंडाळी माजविली होती. त्यांचा पराभव होऊन ते धार येथें पळून गेले. या दोन तीन प्रसंगी केलेल्या मदतीबद्दल इंग्रजांनीं आपली तैनातीफौज गायकवाडावर रावजीआप्पाजीच्या तर्फे लादली; व तिच्या खर्चासाठीं बराचसा प्रांत घेतला; तसेंच स्वारीखर्चाबद्दलहि भरपूर पैसा मिळविला. लागलीच डंकन (गव्हर्नर) यानें रावजीशीं त्यानें केलेल्या या गोष्टींबद्दल गुप्त तह करून त्याचें व त्याच्या वंशजांचें रक्षण करण्याचें वचन दिलें. पुढें. (१८०२). गायकवाडांचें आरबसैन्य काढून टाकण्याबद्दल इंग्रजांनीं आनंदरावास लकडा लाविला. परंतु आपली बाकी दिल्याशिवाय आरब जाईनात. उलट त्यांनी आनंदरावास कैद केलें. तेव्हां इंग्रजांनीं त्याची सुटका करून आरबांची रक्कम देऊन टाकून टाकून त्यांनां काढून लाविलें. यानंतर कान्होजीनें बंड उभारलें पण तें इंग्रजांनीं मोडलें व तो उज्जनीकडे पळून गेला. इतक्यांत मल्हाररावानें पुन्हां उचल केली. पण विठ्ठलराव नांवाच्या सरदारानें त्याला कैद करून त्याचें बंड मोडलें. रावजी आप्पाजीनें गायकवाडीराज्याची सर्व सत्ता इंग्रजांच्या ताब्यांत दिल्यानें, प्रजा त्याला घरभेद्या म्हणूं लागली. परंतु इंग्रज म्हणतात कीं त्यानें दूरवर दृष्टी देऊन योग्य मार्ग स्वीकारला. यापुढें काठेवाड आपल्या ताब्यांत असावा अशी हांव इंग्राजांस उत्पन्न होऊन त्यांनीं गायकवाडाशीं १८०५ त तशा प्रकारचाएक तहहि केला.

1 comment:

  1. जय शिवराय�� दादा
    पुढील भाग आहे का ��

    ReplyDelete