हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९९
यशवंतराव आणि बाबुराव दाभाडे
त्रिंबकरावास यशवंतराव नांवाचा एक अल्पवयी मुलगा होता. वापाच्या मरणानंतर त्याला सेनापतीची वस्त्रें मिळाल्यावर त्याच्या पालकत्वाचें काम त्याची आई उमाबाई हिजकडे आले; व पिलाजी गायकवाड त्याच्या मुतालकीच्या जागी कायम झाल्यामुळें सेनापतीचें सर्व कामकाज पाहूं लागला. अत:पर पेशवे व दाभाडे यांच्यामध्यें भांडणास जागा राहूं नये म्हणून, शाहूनें गुजराथचा सर्व कारभार दाभाड्याकडे सोंपवून, त्यानें त्या प्रांताच्या वसुलाचा अर्धा हिस्सा पेशव्यांमार्फत सरकारतिजोरित भरणा करावा असें ठरविलें. इतर स्वायामध्यें मिळालेला पैसा मात्र खर्च वजा जातां राजाच्या स्वाधीन करण्यांत यावा असा करार होता ( १७३१). पण हा करार दाभाड्यांनी पुरापुरा कधीच पाळला नाही, असें असतांहि शाहूच्या पश्चात नानासाहेब पेशव्यानें अर्ध्या गुजराथच्य सनदा यशवंतरावाच्या नांवें करून दिल्या ( १७५०).
बाबूराव:— त्रिंबकरावाच्या मृत्यूनंतर सेनापतीची वस्त्रें शाहूनें यशवंतराव दाभाड्यास दिली. त्याचप्रमाणें यापुढें पेशवे आणि दाभाडे यांच्यामध्यें वितुष्ट राहूं नये म्हणून शाहूनें स्वत: दाभाड्यांच्या गांवी (तळेगांव) येऊन त्रिंबकराव, यशवंतराव व बाबूराव दाभाडे यांची मातोश्री उमाबाई दाभाडे हिची घेतली; व शाहूनें तिची समजूत केली कीं, बाजीराव हा तुझाच पुत्र आहे असें समजून याला तू क्षमा कर आणि यापुढे तुझ्या पुत्रांनी व बाजीरावाने एक चित्ताने राहावे असे कर.
सातार्यास परत आल्यावर शाहूने यशवंतराव व बाबुराव दाभाडे व बाजीराव बल्लाळ यांस बोलून यांचेही सख्य करून दिले. यशवंतरावांच्या ठिकाणी बाबुरावांची दृढभक्ती असून शाहूने त्यांस देऊ केलेली सेनाखासखेलीची वस्त्रे त्याने प्रथम नाकारली. परंतु शाहूने अत्यंत आग्रहपूर्वक हि वस्त्रे त्यांसच देऊन शिवाय हत्ती, घोडा, शिरपेच, कंठी वैगरे देऊन त्यांचा मोठा गौरव केला. हा बाबुराव पुढे फार पराक्रमी निघाला व त्याने अनेक पराक्रमाची कृत्ये करून मोठा लौकिक संपादन केला. यशवंतराव हा दुर्व्यसनी व दुर्बळ होता. पुढे शाहूने बाबुरावास सुरतेच्या मोहिमेवर पाठविले; या प्रसंगी बाबुरावाने मोठ्या शिताफीने अगदी थोड्या सैनिकांनीशी सुरतेच्या नबाबास गाठून त्यास अटकेत ठेविले आणि त्याच्या पासून सुरतेच्या अठठावीस महालांपैकी चौदा महालांच्या व चौथाइच्या सनदा छत्रपतींच्या नावे करून घेतल्या. इतक्यात यशवंतरावही मोठे सैन्य घेऊन सुरतेस आला. हे पाहून नवाबाने तहनाम्यातील अटी ताबडतोब पुर्या करून दिल्या, व या उभयतां बंधुंस मौल्यवान पोशाख दिला.
यशवंतराव आणि बाबुराव यांनी परत निघतेवेळी, खुद्द सुरतेस आपला एक अंमलदार ठेऊन सुरत अठठाविषीपैकी मिळविलेल्या चौदा महालांचा व खानदेशात जो प्रांत त्यांच्या ताब्यात आला होता त्याचा नित रीतीने बंदोबस्त लावण्याची योजना केली. या सुरतेच्या पराक्रमाबद्दल शाहूने बाबुराव दाभाड्यास सोन्याचा तोडा आणि पाच लाख रुपयांची जहागीर वंशपरंपरेने करू दिली. काही महिन्यांनी गुजराथेत पुन्हा बंडाळी माजली. दाभाड्यांचे कोणी माणूस गुजराथेत नाही व सर्व अंमल मुख्यत्याराच्या मार्फत चालला आहे हि संधी पाहून जोरावरखां नबाबी नामक अमदाबादच्या मुसलमान ठाणेदाराने दाभाड्याची ठाणी हळू हळू उठविण्याची खटपट चालवली. हे समजताच यशवंतराव व बाबुराव यांस अमदाबादेच्या स्वारीवर पाठवले. या स्वारी बरोबर उमाबाई हीही होती. दाभाडे आपल्यावर येत आहेत हे पाहून जोरावरने जय्यत तयारी केली. त्याचे बहुतेक सैन्य कडव्या पठानाचे असून चांगले कवायती होते. लाधैस सुरवात होऊन दोन्हीकडील मिळून सुमारे १५०० लोक पडले. अखेर दाभाड्याचा जय होऊन जोरावरचा पूर्ण पराभव झाला. दाभाड्याच्या फौजेने अमदाबादेस आपली ठाणी बसवून सर्वत्र शांतता केली आणि गुजराथेचा सर्व बंदोबस्त आपला विश्वासू नोकर पिलाजी गायकवाड यास सांगून व खुद्द अमदाबादेस अप्पाजी गणेश यास ठेऊन ते परत आले. या पराक्रमाबद्दल खुश होऊन शाहूने सोन्याचे दोन तोडे करून उमाबाईंच्या पायात घातले व तेव्हापासून या घराण्यातील स्त्रियांस पायांत सोन्याचे तोडे घालण्याचा अधिकार परंपरेने करून दिला. हा अधिकार फक्त छत्रपतींच्या राणीचा असतो.
अहमदाबादेवरील स्वारी हे बाबुरावांच्या आयुष्यातील शेवटचेच कृत्य होय. यानंतर खानदेशातील सत्तेत काही बखेडा झाला म्हणून बाबुराव हा तिकडील बंदोबस्ताकरिता चालता झाला. एकदा त्याची स्वारी मौजे रामेश्वर देवळे येथे असता त्या मुक्कामी त्याच्यावर विषप्रयोग करण्यात येऊन त्याला ठार मारण्यात आले. बाबुरावांच्या मृत्यूनंतर दाभाडे घराण्यात नाव घेण्यासारखा कोणीही शूर पुरुष अगर मुत्सद्दी झाला नाही. यांचा वंशज सांप्रत तळेगाव येथे नांदत आहे. [दाभाडे घराण्याची हकीगत; शाहूची बखर; पेशव्याची बखर; राजवाडे खं.३.]
Regards and special thank to - Rahul Bhoite
No comments:
Post a Comment