Total Pageviews

Friday, 14 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ५३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ५३

सरदार थोरात घराण्याचा इतिहास
(भाग २)

* सरदार दमाजी थोरातांची स्वराज्यासाठीची कामगिरी- त्यांनी स्वराज्यासाठी पार पाडलेल्या कामगिरीची इत्यंभूत माहिती उपलब्ध नाही. पण ते रामचंद्र पंत अमात्य यांच्या दिमतीस देण्यात आलेल्या सरदारांपैकी एक असल्याने जिंजीच्या वेढ्याच्या प्रसंगी त्यांनी काहीतरी विशेष कामगिरी पार पाडली असावी किंवा त्याच काळात मोघल सरदारांविरुद्ध चालू असलेल्या रणधुमाळीत त्यांनी विशेष लौकिक प्राप्त केलेला असावा कि ज्याच्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना पाटस व सुपे प्रांताची जहागीर दिली. त्याशिवाय रुस्तुमराव हा किताब देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला.

* 'रुस्तुमराव' या किताबाविषयी थोडस काही- मराठेशाहीच्या अथवा सुलतानशाहीच्या काळात मर्दुमकी गाजवणाऱ्या पराक्रमी वीर पुरुषांना व सरदाराना वेगवेगळे किताब व पदव्या देऊन गौरवण्यात येत असे. जसे कि झुंजारराव, प्रतापराव, हंबीरराव, इत्यादी.. असा किताब देऊन त्या सरदाराचा विशेष बहुमान करण्यात येई. दमाजींच्या अगोदरच्या काळात इतर कोणा मराठा सरदाराला हा किताब देण्यात आला होता का? (मराठा छत्रपतींकडून) या विषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. पण दमाजीनंतर जाधव व कडू या मराठा समाजातील तर कोकरे व पांढरे या धनगर समाजातील सरदारांनी हा किताब अर्जित केल्याचे अस्सल पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे दमाजी हे मराठ्यांच्या इतिहासातील पहिला 'रुस्तुमराव' ठरतात.

* 'रुस्तुम' हे अत्यंत कडव्या व लढवय्या समजल्या जाणाऱ्या काबुलकडील पठाण या जमातीतील एका श्रेष्ठ वीराचे नाव आहे. त्यामुळे रुस्तुमराव या शब्दाचा अर्थ एक श्रेष्ठ वीर किंवा अत्यंत लढवय्या असाही घेता येऊ शकतो. दमाजींनी त्यांच्या या किताबाचा उल्लेख त्याच्या शिक्क्यात हि केलेला दिसतो. त्याशिवाय त्यांच्या नामे देण्यात आलेल्या कित्येक सनद पत्रांमध्ये हि दमाजी थोरात रुस्तुमराव असेच उल्लेख आढळतात. काही कागद पत्रांमध्ये त्यांचा 'दमसिंग' असाही उल्लेख आढळतो.

माहिती सौजन्य- श्री. संतोषराव पिंगळे

No comments:

Post a Comment