Total Pageviews

Saturday, 22 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९३


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९३

भोर संस्थान :शंकरराव चिमणाजी उर्फ रावसाहेब (१८७१-१९२२)

रावसाहेबांची कारकीर्द सुमारें ५० वर्षें झाली. शंकरराव तापट, करारी, निरलस, बुद्धिमान, व नियमित रहाणीचे असे होते. त्यांचीं दोन लग्नें झालीं. त्यांनीहि अनेक सुधारणा करून संस्थानचा दर्जा वाढविला. सडका, चावड्या, धर्मशाळा, विहिरी ब-याच ठिकाणीं बांधिल्या. शिक्षणखातें निर्माण करून भोर येथें हायस्कूल स्थापन केलें, व संस्थानांत सुमारें ६० प्राथमिक शाळा सुरू केल्या, आणि भोर येथें एक मोफत दवाखाना सुरू केला. रामनवमीचा उत्सव निरंतर चालण्याकरितां रावसाहेबांनीं वार्षिक ३०,००० रूपये उत्पन्नाचे २८ गांव अलग तोडून दिलें. याप्रमाणें प्रत्येक देवस्थानची त्यांनीं स्वतंत्र व्यवस्था करून ठेविली आहे. सन १९०३ मध्यें त्यांनां ९ तोफांच्या सलामीचा मान मिळाला. व पुढें १९११ सालीं आणखी दोन तोफांच्या सलामीचा मान व हिज हायनेस ही पदवी मिळाली. दिल्लीस नरेन्द्रमंडळ स्थापन होईपर्यंत राजमंडळाची जी सभा भरत असे त्या प्रत्येक सभेस रावसाहेबांनां निमंत्रण येत असे व प्रत्येक सभेस हजर रहात असत.

रावसाहेबांची धर्मावर फार श्रद्धा असून त्यांनीं हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व तीर्थयात्रा सहकुटुंब केल्या. काश्मीर, ग्वाल्हेर, बडोदें, कोल्हापूर, म्हैसूर, हैद्राबाद, त्रावणकोर इ. मोठ्या संस्थानिकांच्या निमंत्रणावरून तेथें जाऊन शंकररावांनीं त्या संस्थानिकांचा दृढ परिचय करून घेतला. रावसाहेबांच्या पत्नी कै. श्री. सौ. जिजीसाहेब ह्यांनीं एकट्यानींच व बदरीकेदार व नारायणाची बिकट यात्रा केली. रावसाहेबास प्रथम १८७७ सालीं कन्यारत्न झालें. व दुस-याच वर्षी म्हणजे १८७८ सालीं पुत्ररत्न झालें. त्याचें नांव त्यांनीं रघुनाथराव उर्फ बाबासाहेब ठेविलें. तेच हल्लींचे संस्थानाधिपति आहेत. खर्च करण्यांत रावसाहेबांचा हात अगदीं काटकसरीचा असे. यामुळेंच त्यांनां संस्थानची आर्थिक स्थिति चांगली ठेवतां आली. रावसाहेब सर्व खात्यांतील कामें स्वतः पहात असत. या त्याच्या एकतंत्री कारभाराचा परिणाम असा झाला कीं, नोकराच्या अंगीं जबाबदारीनें काम करण्याची पात्रता उत्पन्न झाली नाहीं. त्यांच्यांत एकतंत्री कारभारामुळें उत्पन्न होणारे दोष शिरले. महायुद्धनंतर नवीन तत्त्वें, नवीन आकांक्षा उदयास येऊन नवीन वातावरण तयार झालें व त्याच्या लाटा संस्थानीं प्रजेवर आदळून जागृति उत्पन्न झालीं, यामुळें रावसाहेबांचीं अखेरचीं २।३ वर्षें फार त्रासांत गेलीं. रावसाहेबांची सर्व कारकीर्द एकतंत्री राज्यकारभारांत गेली असल्यामुळें पालटलेल्या स्थितींत प्रसंगानुरूप धोरण बदलण्याचें जें एक प्रकारचें कौशल्य लागतें तें त्यांच्या अंगीं नव्हतें. प्रजपरिषद निर्माण होऊन राज्य कारभारांत प्रजेचा हात असला पाहिजे, जुलमी कर नाहींसें झाले पाहिजेत, अशा प्रकारच्या मागण्या प्रजेकडून होऊं लागल्या. प्रजेंत असंतोष माजत चालला. परंतु रावसाहेबांच्या करारी स्वभावामुळें नवीन मनूस अनुसरून राज्यकारभाराचें धोरण त्यांनीं बदललें नाहीं. यामुळें असंतोष जास्तच पसरत जाऊन रावसाहेबांनां मनस्वी त्रासहि होऊं लागला. अशा स्थितींतच स. १९२२ सालीं त्यांचें देहावसान झालें. व त्यांचे पुत्र श्रीमंत बाबासाहेब हे राज्यारूढ झालें.

No comments:

Post a Comment