Total Pageviews

Friday, 14 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४८


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४८

शिवरायांचे शिलेदार - कान्होजीराजे आंग्रे
कान्होजीराजे आंग्रे

स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी ! पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म झाला. कालोसे गावातील आंगरवाडी ह्या छोट्या भागावरून त्यांचे आंग्रे हे आडनाव रूढ झाले. कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने, स्वत:चा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला. इ.सन १६८८ च्या सुमारास सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्या मोगलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळविले. सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी करून त्यांनी आपल्या पराक्रमास सुरुवात केली. तसेच ह्या विजयानंतर मोगलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली. छत्रपती राजारामांच्या काळात मराठ्यांचे अस्तित्व टिकविण्याची जबाबदारी कान्होजींवर आली होती. अनुभवाने आणि मुत्सद्देगिरीने ते शत्रूला तोंड देत होते. त्यांची स्वतंत्र कामगिरी पाहूनच राजारामांनी त्यांना सरखेल हे सन्मानाचे पद दिले. कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनी आंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावा लागत होता. कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.
सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्या परकीयांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. ह्याचा प्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले, तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्र किनार्यावर एक दबदबा निर्माण केला होता. कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर , आळंदी , जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शूर सरदारांचे योगदान होते. कोकण किनार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक !
दिनांक ४ जुलै, १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.

No comments:

Post a Comment