Total Pageviews

Thursday, 6 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध भाग ३२


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध
भाग ३२

घाटगे मराठा घराणे -भाग ४

सखाराम (सर्जेराव) घाटगे :-

दौलतरावानें मागितलेले दोन कोट रूपये देण्यासाठीं पेशव्यांनी घाटग्यास शिंद्याची दिवाणगिरी देऊन बाळोजी कुंजराच्या मदतीनें पुण्यांतील लोकांपासून पैसे गोळा करण्याच्या कामावर त्याला नेमिले. यावेळीं पैसे गोळा करण्याकरितां घाटग्यानें जे उपाय योजले ते अत्यंत अमानुष होते (डफ) शनिवार वाडयांत जुनी कारभारी मंडळी कैदेंत होती, त्यांनां त्यानें बाहेर काढून ते आपला पैसा कोठें आहे तें सांगेपर्यंत त्यांच्या अंगावर कोरडे ओढून, त्यांच्या जवळून बलात्कारानें सर्व पैसा काढून घेतला. शहरांतील व्यापारी, सराफ वगैरे ज्या ज्या लोकांजवळ पैसा आहे असें वाटत होतें त्यासर्वांनां पकडून त्यांचा इतका छळ करण्यांत आला कीं, त्यांतील कांहीं मंडळीं त्यायोगें मरणहि पावली. गंगाधरपंत भानू यांस पैंशासाठीं तापलेल्या तोफेवर बांधलें असतां तो तेथल्या तेथेंच मरण पावला. महादजीच्या दोघा वडील बायकांनीं दौलतरावावर आपल्या धाकटया सवतींशी व्यभिचार केल्याचा आरोप केला, तेव्हां घाटग्यानें बळजबरीनें त्यांनां पकडून खूप मार दिला व त्यांची अतिशय विटंबना केली (१७९८). (डफ. पु.३.पृ.१६२). त्यामुळें बायकांच्या बाजूस असलेल्या मुजप्फरखानाची व सखारामाची दोनदां चकमक उडाली.

सखारामाच्या वर्तनास कोणाकडूनहि प्रतिरोध न झाल्यामुळें शेवटीं तो इतका बेताल झाला कीं, तो शिंद्यासहि जुमानीना. फकीरजी गाढवे याच्या साहाय्यानें लोकांपासून बळजबरीनें पैसे उकळण्याचें काम त्यानें चालविलेंच होतें. शिंद्यांच्या सैन्यांतील चार अधिका-यांस तर बायांच्या बंडांत सामील असल्याच्या केवळ संशयावरून त्यानें तोफेच्या तोंडीं दिले.शेवटीं आपला स्वत:चाच उपमर्द होऊं लागल्यानें चीड येऊन व पेशव्यांच्या आज्त्रेवरून आणि लोकांच्या शिव्यापाशास कंटाळून शिंद्यानें सखारामास पकडून कैदेंत टाकलें (१७९८). परंतु बाळोबातात्यानें रदबदली करून त्याला कैदेंतून सोडविलें (१८००). कैदेतूल सुटतांच त्यानें पुन्हां शिंद्यावर पगडा बसविला व बाळोबातात्याच्या विरूध्द एक पक्ष उपस्थित केला आणि शिंद्याचें मन वळवून बाळोबास व त्याच्या अनुयायांस कैद करवून नगरच्या तुरूंगात त्यांची रवानगी केली. बाळोबा कैदेंत लवकरच मरण पावला. त्याचा भाऊ धोंडीबा यास सखारामानें तोफेच्या तोंडीं दिलें. नारायणराव बक्षी (शिंद्याचा सेनापति) याच्या अंगास दारूचे बाण बांधून ते पेटविण्यांत आले; त्याबरोबर त्या दुर्दैवी माणसाचें शरीर आकाशांत उडून त्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या. हेंहि कृत्य सखारामानें केले.

No comments:

Post a Comment