Total Pageviews

Thursday, 6 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध भाग ३३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध
भाग ३३
घाटगे मराठा घराणे -भाग ५
सखाराम (सर्जेराव) घाटगे :-
पुढें दौलतरावानें पटवर्धनावर स्वारी केली त्यावेळीं सखारामानें कोल्हापुरकरांची मदत शिंद्यास मिळवून दिली होती (१८००). यानंतर तो उत्तर हिंदुस्थानांत जाण्यासाठीं निघाला तेव्हां त्यानें सखारामाच्या हाताखालीं पांच पलटणी व दहा हजार स्वार देऊन त्यास पुण्यास ठेवलें. परंतु सखारामानें पुण्याच्या दक्षिणेकडील मुलुखांत लुटालुटीची मोहीम सुरू केली (१८०१).
पुढें तो पुण्यास आला व पैशाकरितां बाळोजी कुंजराच्या घरांत धरणें देऊन बसला. त्यानें पेशव्यांच्या दरबारांतील एकाहि माणसाचा अपमान करण्याचें बाकी ठेविलें नव्हतें. शेवटीं बाळोजी कुंजरानें सावकारांवर वराता देण्याकरितां ह्मणून त्याला आपल्या घरीं बोलावून व त्याचा मोठा आदर सत्कार करून थोडया वेळानें कागद आणण्याचें मिष करून तो तेथून जाऊं लागला. बाळोजी तेथून उठला कीं घाट ग्यास कैद किंवा ठार करण्यांत यावें असा पूर्वी संकेत झाला होता. परंतु बाळोजीचा हेतु ओळखून सखारामानें स्वत उठून व बाळोजीचा हात धरून त्याला आपल्या बरोबर आणलें व आपण घोडयावर बसून तेथून निघून गेला. नंतर त्यानें आपल्या सर्व सैन्यासह पुणें शहर लुटून जाळून फस्त करण्याची बाजीरावास धमकी दिली. परंतु बाजीरावानें इंग्रज वकिलाच्या मध्यस्तींने तो प्रसंग टाळला.
याच सुमारास सखारामास शिंद्याचें माळव्यांत निघून येण्याविषयीं निकडीचें बोलावणें आल्यावरून तो पुण्याहून निघून दौलतरावास नर्मदापार जाऊन मिळाला. शिंद्यानें त्यांस १०,००० घोडदळ व कवाइती पायदळांच्या चौदा पलटणी देऊन इंदूर लुटण्याकरितां पाठविलें. तेव्हां यशवंतराव होळकरहि कांहीं कवायत शिकविलेल्या पलटणी, ५००० बिनकवायती पलटणी व २५००० स्वार घेऊन चालून आला. दोन्ही पक्षांत कांहीं दिवस किरकोळ चकमकी झाल्यावर शेवटीं होळकरानें शिंद्याच्या लष्करावर जोराचा हल्ला केला; तथापि त्यांत त्याचा पराजय होऊन इंदूर लुटलें गेलें. इंदूर हातीं आल्यावर सखारामानें तेथें इच्छेस येईल त्याप्रमाणें पशुतुल्य क्रुरपणाचीं व अंगावर शहारे आणण्यासारखीं कृत्यें केलीं (डफ पुस्तक ३, पृ.२०१). पुढें इंग्रजांचें यशवंतराव होळकराशी युध्द चाललें असतां शिंद्यानें होळकरास मिळावें अशी सखारामाची आरांभापासून इच्छा होती व त्याप्रमाणें (१८०४ आक्टोबर) दोलतराव हा ब-हाणपुराहून उज्जनीकडे जावयास निघाला होता. भरतपूरच्या जाटानें इंग्रजांशीं तह केल्यावर, होळकर व शिंदे एक होऊन अजमेरला आले तेव्हां सर्जेराव हाच शिंद्याचा दिवाण होता. व त्याचें मत वरीलप्रमाणें होळकराप्रमाणेंच शिंद्यानेंहि इंग्रजांशीं युध्द चालू ठेवावें असें होतें. तथापि पुढें सर्जेरावच्या जुलमी वर्तनामुळें स्वत च शिंद्यानें त्याला कामावरून दूर केलें. यानंतर शिंदे व होळकर यांनीं इंग्रजांशीं तह केला. त्यांत दोघांनींहि अत:पर सर्जेरावच्या सल्ल्यानें न चालण्याचा व त्याला आपल्या पदरीं चाकरीस न ठेवण्याचा करार केला (१८०५) परंतु पुढें लवकरच हा करार रद्द करण्यांत आला. व घाटग्यानें शिंद्याच्या कारभारांत पुन्हां वर्चस्व संपादन केलें. पुढें एकदां वाठारच्या निंबाळकर नांवाच्या एका शिलेदारास शिंद्यांच्या इच्छेविरूध्द जहागीर देण्याचें घाटग्याच्या मनांत येऊन त्या गडबडींत मानाजी फांकडयाचा मुलगा आनंदराव शिंदे यानें सखारामास जागच्याजागीं भाल्यानें भोसकून ठार केलें (१८०९-१०). डफनें याला राक्षस म्हटले आहे (पु.३.पृ.३२४). याला सर्जेराव असा किताब होता. याच्याच वंशांत कोल्हापूरचे माजी राजे शाहूछत्रपती यांचा जन्म झाला होता.
(डफ.पु.३; खरे-ऐ.ले. संग्रह पु.१० ११ १२).)
==== माहिती संकलन द्वारा -विशाल बर्गे इनामदार

No comments:

Post a Comment