Total Pageviews

Friday 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४०५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४०५
उमाजी नाईक
(जन्म : ७ सप्टेंबर १७९१ मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२)
सांभार : आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक. होते.
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.
३ फेब्रुवारीहा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन. रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.
क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे..मग हे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. 'मरावे परि क्रांतिरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वत:च्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?"
तर टॉस म्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी होता. त्याने पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली.
या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
उमाजी नाईक यांनी इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत तो त्याकाळात लिहिणे वाचणे शिकलला .आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने ५ इंग्र सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.
१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते .आणि काहीचे प्राण घेतले होते.
उमाजीने १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून उमाजीने एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाणही फितूर झाला. या दोघांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्याला ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी हसत हसत फासावर चढला. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.
अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४०४

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४०४
भीमाबाई होळकर
लेखक :संजय सोनवणी
जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना. तिच्याबद्दल येथे आपण थोडक्यात माहिती करुन घेवुयात.
भीमाबाईंचा जन्म १७९७ साली पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला कि नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव केल्यानंतर झाली.
तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले. सुटकेनंतर मात्र यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षनाची व लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली. ब्रिटिश विदुषि मेरी सदरल्यंड म्हणतात, ज्या काळात भारतात महिलांना गोषात रहावे लागे, शिक्षणाचा विचारही नव्हता, अत्यंत बंदिस्त व मानहानीचे जीवन जगावे लागे त्या काळात, यशवंतरावांसारख्या द्रष्ट्या पुरुषाने भीमाबाईला शिक्षण देने व लढवैय्याही बनवणे ही एक क्रांतीकारक घतना होती. अर्थात अशी सामाजिक क्रांती होळकर घराण्याला नवीन नव्हती. अहिल्याबाई होळकर स्वत: शिक्षित तर होत्याच पण त्या काळात भालाफेकीत त्यांचा हात धरणारा कोनी पुरुषही नव्हता. एवढेच नव्हे तर जगातील पहिले महिलांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालयही स्थापन करुन महिलांची बटालियन उभारली होती. या बटालियनला घाबरुन रघुनाथराव पेशव्यालाही पळुन जावे लागले होते.
यशवंतरावांचा ब्रिटिशांशी संघर्ष सुरु असला व एका मागोमाग एक अशा अठरा युद्धांत त्यांना पराजित करत राहिले असले तरी परिवाराकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. भीमाबाईचा विवाह धारचे संस्थानिक गोविंदराव बुळे यांच्याशी झाला. यशवंतरावांनी आपल्या लाडक्या कन्न्येला पेटलवाड येथील जहागीरही व्यक्तिगत उत्पन्नासाठी दिली. परंतु विवाहानंतर दोनेक वर्षातच भीमाबाईवर वैधव्य कोसळले. त्या परत माहेरी आल्या व यशवंतरावांनी भानपुरा येथे सुरु केलेल्या तोफांच्या कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहु लागल्या.
त्यांना उत्तम अस्वपरिक्षा अवगत होती. त्यामुळे भारतभरातुन यशवंतरावांनी एक लक्ष घोडे आपल्या सैन्यासाठी विकत घ्यायचा सपाटा लावला होता त्यात मुख्य भुमिका भीमाबाई बजावत होत्या. यशवंतरावांचा भारतीय स्वातंत्र्यासाठी कलकत्त्यावर इस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयावरच हल्ला करण्याचा बेत होता. पण दुर्दैवाने मेंदुतील गाठीच्या आजाराने यशवंतरावांचा २८ आक्टोबर १८११ रोजी भानपुरा येथे अकाली म्रुत्यु झाला.
त्यावेळीस भीमाबाईंच्या धाकट्य भावाचे, मल्हारराव तिसरा याचे वय होते फक्त सहा वर्ष. महाराणी तुळसाबाई या मल्हारराव (तिसरे) यांच्या रीजंट म्हणुन कारभार पहात असतांना भीमाबाई लष्करी फेररचनेत व्यस्त होत्या. यशवंतरावांच्या म्रुत्युमुळे होळकरी सम्स्थान ताब्यात घेता येईल या कल्पनेत इंग्रज रमाण होते व तसा प्रयत्नही करत होते, पण त्यांना यश येत नव्हते. कारण तत्कालीन भारतात होलकरांचे लष्कर बलाढ्य मानले गेलेले होते.
शेवटी इंग्रजांनी कपटनीतिचा आश्रय घेतला. गफुरखान या होळकरांच्या सेनानीला त्यांनी जाव-याची जहागिरी देण्याचे आमिष दाखवत फोडले. या घरभेद्याने १९ डिसेंबर १७१७ रोजी महाराणी तुळसाबाईंचा निर्दय खुन केला व त्यांचे प्रेत क्षिप्रा नदीत फेकुन दिले.
त्याच वेळीस भीमाबाई आणि मल्हारराव (तिसरे) सर थोमस हिस्लोप या माल्कमने पाठवलेल्या ईंग्रज सैन्याचा सेनापतीशी मुकाबला करण्याच्या तयारीत महिदपुर येथे होते. मल्हाररावाचे वय त्यासमयी फक्त बारा वर्षाचे होते तर भीमाबाईचे वय होते वीस. त्या घोडदळाचे नेत्रुत्व करत होत्या. २० डिसेंबरला सकाळी युद्ध सुरु झाले.
दुपारी तीन वाजेपर्यंत होळकरी सेना इंग्रजांना कापुन काढत विजयाच्या क्षणापर्यंत पोहोचली होती. पण ऐन मोक्याच्या वेळी गफुरखान आपल्या सैन्यासह रणांगणातुन निघुन गेला. हाती आलेला विजय त्याच्या गद्दारीमुळे निसटला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.
या युद्धानंतर मल्हाररावाला इंग्रजांशी मंदसोर येथे तह करावा लागला. पण भीमाबाई मात्र आपल्या तीन हजार पेंढारी घोडदळानिशी निसटली होती. इंग्रजांशी तिचा लढा थांबणार नव्हता. तिने अक्षरश: अरण्यवास पत्करला व पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत गनीमी काव्याचा मंत्र जपला. तिने माल्कमच्या सैन्यावर गनीमी हल्ले सुरु केले. इंग्रज खजीने लुटले. अनेक तळ उध्वस्त केले. मार्च १८१८ मद्धे तर खुद्द माल्कमच्या सेनेला अचानक हल्ला करुन असे झोडपले कि माल्कमलाच पळुन जावे लागले.
इंग्रजांनी भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे लक्षात घेवुन पेंढा-यांविरुद्धच मोहीम हाती घेतली. पेंढा-यांना पुनर्वसनाच्या, जमीनी-जागीरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी भीमाबाईला सोडुन जावु लागले. आपल्या पित्याप्रमानेच भीमाबाईने भारतातील सम्स्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळुन भीमाबाईच्या सर्वनाशासाठे भीमाबाईचा माग काढत होता, पण भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे. तिने इंग्रजी तळांना अचानक हल्ले करुन लुटण्याचा धडाका लावलेला होता. भीमाबाईवरील मोहीम यशस्वी व्हायचे नांव घेत नव्हती. माल्कमने पुन्हा कपटाचा आश्रय घेतला. त्याने भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करुन घेतले.
भीमाबाईचा तळ धारनजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली. माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला भीमाबाईवर हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पदला. यावेळीस दुर्दैव असे कि एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडुन निघुन गेले. भीमाबाईला कैद करण्यात आले. रामपुरा येथील गढीत त्यांना बंदिस्त करण्यात आले. पुढे नोव्हेंबर १८५८ मद्धे भीमाबाईंचा म्रुत्यु झाला. कैदेतच जन्म आणि कैदेतच म्रुत्यु असे दुर्दैव या थोर महिलेच्या वाट्याला आले. पुढचे दुर्दैव हे कि ज्या अखिल भारताच्या स्वातंत्र्यासाठी जिने संगर मांडला तिला भारतवासी चक्क विसरुन गेले.....!

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४०३


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४०३
पेशव्यांच्या स्त्रिया...
भाग 8
लेखक : अशोक पाटिल
७. आनंदीबाई
पेशवे इतिहासातील सर्वात काळेकुट्ट प्रकरण कुठले असेल तर शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेला 'नारायणराव पेशव्यां'चा निर्घृण खून. तोही सख्ख्या चुलत्या आणि चुलतीकडून. नाना फडणवीस आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी रामशास्त्रींच्या न्यायव्यवस्थेकडून त्या खून प्रकरणाचा छ्डा तर लावलाच पण त्या धक्कादायक प्रकरणाच्या मागे एकटे रघुनाथराव नसून अत्यंत महत्वाकांक्षी असलेली त्यांची पत्नी 'आनंदीबाई' आहेत हेही सिद्ध केले. ["ध" चा 'मा' हे प्रकरण इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण नाही, इतके ते कुप्रसिद्ध आहे.]
आनंदीबाई ह्या गुहागरच्या ओकांची कन्या. राघोबांशी त्यांचा विवाह (१७५६) झाल्यापासून आपला नवरा 'पेशवे' पदाचा हक्कदार आहे हीच भावना त्यानी त्यांच्या मनी चेतवीत ठेवली होती. गोपिकाबाईंचे वर्चस्व त्याना सहन होणे जितके शक्य नव्हते तितकेच त्यांच्या सरदारांसमवेतही संबंध कधी जुळू शकणारे नव्हते. रघुनाथराव पराक्रमी जरूर होते पण ज्याला सावध राजकारणी म्हटले जाते ते तसे कधीच दिसून आले नाही. विश्वासराव अकाली गेले आणि माधवराव अल्पवयीन म्हणून आपल्या नवर्याला - रघुनाथरावाना - पेशवाईची वस्त्रे मिळतील अशी आनंदीबाईंची जवळपास खात्री होतीच. पण छत्रपतींनी वंशपरंपरागत रचना मान्य केली असल्याने माधवराव व त्यांच्यानंतर नारायणराव हेच पेशवे झाल्याचे आनंदीबाईना पाहाणे अटळ झाले. माधवराव निपुत्रिक गेले आणि नारायणराव यांचे वैवाहिक जीवन [पत्नी काशीबाई] नुकतेच सुरू झाले असल्याने रघुनाथराव याना पेशवे होण्याची हीच संधी योग्य आहे असे आनंदीबाईनी ठरवून तो शनिवारवाडा प्रसंग घडवून आणण्याचे त्यानी धारिष्ट्य केले आणि तांत्रिकदृष्ट्या त्या यशस्वीही झाल्याचे इतिहास सांगतो.
पण दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अल्पकाळ का होईना, पण रघुनाथराव जरूर पेशवेपदी बसले पण नाना फडणविसांनी त्याना ते सुख घेऊ दिले नाही. 'बारभाईं'नी रघुनाथराव आणि पर्यायाने आनंदीबाईंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि एक वर्षाच्या 'सवाई माधवराव' यांच्या नावाने पेशवेपदाची नव्याने स्थापना केली. आनंदीबाई मध्यप्रदेशात धार प्रांतात पळून गेल्या आणि तिथेच त्यानी 'दुसर्या बाजीराव' ना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यु झाला. त्यानंतर आनंदीबाईंचीही ससेहोलपटच झाली. रघुनाथरावांपासून झालेली दोन मुले आणि सवतीचा एक अशा तीन मुलांना घेऊनच मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात त्यांच्यामुळेच होणार्या वादात आणि लढ्यात त्यांचे नवर्याच्या मृत्यूनंतरचे आयुष्य गेले. इकडे बारभाईनी 'सवाई माधवरावा' ला पेशवे गादीवर बसवून नाना फडणवीस यांच्याच अखत्यारीत राज्यकारभार चालू केल्याने दुसर्या बाजीरावाला निदान त्यावेळी तरी पुण्यात प्रवेश नव्हताच. सवाई माधवरावांनी वेड्याच्या भरात १७९६ मध्ये आत्महत्या केल्याने आणि ते निपुत्रिक वारल्याने त्यांच्या जागी 'पेशव्यां'चा अखेरचा वारस म्हणून नानांनी (आणि दौलतराव शिंद्यांनी) अन्य उपाय नाही म्हणून दुसर्या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली.
~ मात्र मुलगा मराठेशाहीचा "पेशवा' झाल्याचे सुख आनंदीबाईच्या नजरेला पडले नाही. त्यापूर्वीच ही एक महत्वाकांक्षी स्त्री १२ मार्च १७९४ रोजी महाड येथे नैराश्येतच निधन पावली होती.
अशोक पाटील

 

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४०२

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४०२
पेशव्यांच्या स्त्रिया...
भाग 7
लेखक : अशोक पाटिल
६. रमाबाई
काय लिहावे या पेशवे स्त्री यादीतील सर्वाधिक लोकप्रिय मुलीविषयी ? आज या क्षणी एकही सुशिक्षित मराठा घर नसेल की जिथे 'रमा-माधव' हे नाव माहीत नसेल. इतिहासातील पात्रे कशीही असू देत, पण 'रमा' या नावाने त्यावेळेच्या आणि आजच्याही जनतेत जे नाजूक हळवे असे घर केले आहे त्याला तोड नाही. इतिहासात क्वचितच असे एखादेदुसरे स्त्री व्यक्तिमत्व असेल की जिच्याविषयी इतक्या हळुवारपणे लिहिले बोलले जाते. पेशवे-इतिहास लेखन करणार्या सर्व लेखकांच्या लेखणीतून 'रमा' या नावाला जो मान दिला गेला आहे, तो अन्य कुठल्याच नाही. सर्वार्थाने 'प्रिय' अशी स्त्री म्हणजे माधवरावांची पत्नी - रमा. एक काव्यच आहे हे नाव म्हणजे. म्हणून या मुलीच्या निधनाची आठवणही इथे आणणे दुय्यम ठरते.
[हेही सांगणे दुय्यमच की माधवराव आणि रमा याना अपत्य नव्हते.]

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४०१

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४०१
पेशव्यांच्या स्त्रिया...
भाग 6
लेखक : अशोक पाटिल
५. पार्वतीबाई
सदाशिवराव भाऊंची पत्नी; पानिपत संग्रामाच्यावेळी प्रत्यक्ष रणभूमीवर पतीसमवेत गेल्या होत्या. गोपिकांबाईंसारख्या ज्येष्ठ आणि वरचढ स्त्रीसमवेत आपणास राहायला नको व त्यापेक्षा पतीबरोबर युद्धात गेलेले ठीक या भावनेतूनही त्यांचा तो निर्णय होता असा इतिहासकारांनी तर्क काढला आहे. पार्वतीबाईंच्या दुर्दैवाने त्याना पतीच्या शवाचे दर्शन झाले नाही कारण युद्धातील कधीही भरून न येणार्या हानीनंतर काही विश्वासू सरदार-सैनिकांनी त्याना पानिपताहून पुण्यात सुखरूप आणले. पण "मृत पती पाहिलेला नाही' या कारणावरून पार्वतीबाईनी स्वतःला 'विधवा' मानले नाही आणि त्यांच्या स्मृतीतच वाड्यावर रमाबाईसमवेत [ज्या आता पेशवीणबाई झाल्या होत्या] राहात होत्या. 'तोतयाच्या बंडा' ला त्या निक्षून सामोरे गेल्या होत्या आणि तो प्रकार माधवरावांच्या मदतीने त्यानी धीटपणे मोडून काढला होता. माधवरावांच्या बहरत जा असलेल्या कारकिर्दीकडे पाहातच त्या शांतपणे १७६३ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी मृत्युला सामोरे गेल्या. त्याना अपत्य नव्हते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४००

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४००
पेशव्यांच्या स्त्रिया...
भाग 5
लेखक : अशोक पाटिल
४. गोपिकाबाई
पेशवाई काळातील सर्वार्थाने ज्येष्ठ असे स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे गोपिकाबाई. बाजीरावांची सून आणि नानासाहेब पेशव्यांची पत्नी. सरदार रास्ते घराण्यातील या मुलीकडे राधाबाईंचे लक्ष गेले ते तिच्या देवपूजा, परिपाठ, संस्कार आणि बुद्धीमत्ता या गुणांमुळे. बाळाजीसाठी हीच कन्या पत्नी म्हणून पेशवे घराण्यात आणायची हा विचार तिथेच पक्का झाला होता. गोपिकाबाईनीही तो विश्वास सार्थ ठरविला होता आणि नानासाहेब पेशवेपदावर आरुढ झाल्यावर मराठा राज्यकारभार आणि विविध मसलतीत प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली "पेशवीण" ठरली.
नानासाहेब "पेशवे' झाल्यापासून गोपिकाबाईंनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. नानांच्या त्या अंतर्गत सल्लागार जशा होत्या तशाच आपल्या परिवारातील कोणतीही अन्य स्त्री आपल्यपेक्षा वरचढ होणार नाही याकडेही त्या लक्ष देत असल्याने पेशवाईतील प्रमुख सरदार आणि अमात्य मंडळींशी त्या मिळूनमिसळून वागत. राघोबादादा हे नात्याने त्यांचे धाकटे दीर. ते आपल्या पराक्रमाने मराठा राज्यातील आघाडीचे वीर गणले जात असत, त्यामुळे त्यांची पत्नी 'आनंदीबाई' यांच्या महत्वाकांक्षेला आणखीन धुमारे फुटू नयेत याबाबत गोपिकाबाई दक्ष असत. तीच गोष्ट सदाशिवराव [चिमाजी पुत्र] भाऊंची पत्नी 'पार्वतीबाई' हिच्याबाबतही.
पार्वतीबाई यांच्याशी गोपिकाबाईंची अंतर्गत तेढ वाढण्याचे कारण झाले 'विश्वासराव'. नानासाहेब आणि गोपिकाबाईंचे हे चिरंजीव पुढे भावी पेशवे होणार होते. सरदार गुप्ते हे नाशिक प्रांताचे त्यावेळेचे जहागिरदार आणि त्यांच्याच घराण्यातील 'पार्वतीबाई' या त्यावेळी सातार्यात होत्या, त्यांच्याकडे गुप्त्यांची कन्या "राधिका" मुक्कामास आली होती. शाहू छत्रपतीही तिथेच वास्तव्याला असल्याने त्यानी तिला [राधिकेला] पाहिले होते व नानासाहेबांना सुचवून गुप्ते घराण्यातील हीच 'राधिका' भावी पेशवीणबाई म्हणून निश्चित केली होती. हा नातेसंबंध गोपिकाबाईना रुचला नव्हता; पण छत्रपतींच्या इच्छेपुढे नानासाहेब नकार देऊच शकत नव्हते. साखरपुडा झाला आणि पुढे त्याचवेळी पानिपताच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न लांबणीवर पडले. विश्वासराव त्यात मारले गेले हा इतिहास सर्वश्रुत असल्याने त्याविषयी न लिहिता सांगत आहे की, लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली आणि पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतीत केले. [राधिकाबाई सन १७९८ मध्ये अनंतात हरिद्वार इथेच अनंतात विलीन झाल्या.]

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३९९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३९९
पेशव्यांच्या स्त्रिया...
भाग 4
लेखक : अशोक पाटिल
३. अन्नपूर्णाबाई
या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांच्या पत्नी. [आपण नेहमी बाजीरावांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या आणि विजयाच्या कथा वाचत असतो, चर्चा करीत असतो, पण वास्तविक चिमाजीअप्पा हे या बाबतीत थोरल्या बंधूंच्या बरोबरीनेच रण गाजवित होते. अवघे ३३ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या वीरावर स्वतंत्र धागा इथे देणे फार गरजेचे आहे.] ~~ चिमाजी आणि अन्नपूर्णाबाई यांचे चिरंजीव म्हणजेच पानिपत युद्धातील ज्येष्ठ नाव 'सदाशिव' = सदाशिवरावभाऊ पेशवे.
चिमाजीरावांना सीताबाई नावाची आणखीन एक पत्नी होती. पण अपत्य मात्र एकच - सदाशिवराव. चिमाजी पानिपत काळात हयात नव्हते आणि ज्यावेळी सदाशिवरावांनाही अवघ्या ३० व्या वर्षी पानिपत संग्रामात वीरमरण आले त्यावेळी अन्नपूर्णाबाई आणि सीताबाई या हयात होत्या की नाही याविषयी इतिहास मौन बाळगून आहे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३९८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३९८
पेशव्यांच्या स्त्रिया...
भाग ३
लेखक : अशोक पाटिल
२. काशीबाई
थोरल्या बाजीरावांची पत्नी. बाळाजी [जे पुढे नानासाहेब पेशवे या नावाने प्रसिद्ध झाले] आणि रघुनाथराव [अर्थातच 'राघोभरारी'] ही दोन अपत्ये. काशीबाई यांची सवत म्हणजेच 'मस्तानी'. बाजीरावापासून मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव प्रथम त्या जोडप्याने 'कृष्ण' असे ठेवले होते. पण बाजीराव कितीही पराक्रमी असले तरी या तशा अनैतिक संबंधातून [ब्राह्मण+मुस्लिम] जन्माला आलेल्या मुलाला 'ब्राह्मणीखूण जानवे' घालण्याची बाजीरावाची मागणी पुण्याच्या सनातनी ब्रह्मवृंदाने फेटाळली होती. त्याला अर्थातच पाठिंबा होता तो राधाबाई आणि बंधू चिमाजीअप्पा यांचा. युद्धभूमीवर 'सिंह' असलेले बाजीराव घरातील पेचप्रसंगासमोर झुकले आणि मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव 'समशेरबहाद्दर' असे ठेवण्यात आले.
मात्र मस्तानीच्या मृत्युनंतर काशीबाई यानीच समशेरबहाद्दरचे आईच्या ममतेने पालनपोषण केले आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनविले. वयाच्या २७ व्या वर्षी पानिपतच्या त्या युद्धात समशेरही भाऊ आणि विश्वासराव यांच्यासमवेत वीरगती प्राप्त करता झाला. [समशेरचा निकाह एका मुस्लिम युवतीशीच झाला आणि त्यापासून अली समशेर हे अपत्यही. पेशव्यांनी बाजीरावाची ही आठवण जपली, पण अलीला बुंदेलखंड प्रांतातील जहागीरव्यवस्था देऊन. बाजीराव मस्तानीचा हा वंश पुढे कसा फुलला की खुंटला याची इतिहासात नोंद असेलही पण त्याकडे कुणी खोलवर लक्षही दिलेले दिसत नाही.]

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३९७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३९७
पेशव्यांच्या स्त्रिया...
भाग २
लेखक : अशोक पाटिल
इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत [मग ती उजवी असो वा डावी] उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी [विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी] मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' च्या विषयी कुतूहल जागृत होते. वाटते, असेल का एखादे एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील "टाईम मशिन', ज्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावे आणि म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल.
पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती "काल-प्रवासा"ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच "पेशवाईतील स्त्रिया" ना आपण इथे चर्चेसाठी पटलावर आणू आणि त्या अनुषंगाने त्या त्या पुरुषासमवेत त्यांच्या अर्धांगिनींने इतिहासात दिलेल्या साथीचे अवलोकन केल्यास तो वाचन-आनंद सर्वांना भावेल अशी आशा आहे.
छत्रपतींच्या कारकिर्दीत पेशवेपद भूषविणारे मोरोपंत पिंगळे यांच्यापासून ते बहिरोजी पिंगळे यांच्यापर्यंत त्यांच्या कामकाजांचे स्वरूप 'महाराजांचे प्रशासनातील उजवे हात' अशा पद्धतीचे होते. शाहू छत्रपतींनी सातार्याला प्रयाण करून राज्याची सर्वबाबतीतील जबाबदारीची मुखत्यारपत्रे पेशव्यांना दिली आणि त्या जागी बाळाजी विश्वनाथ भटांची नेमणूक केल्यावर खर्या अर्थाने 'पेशवे' हेच मराठा राज्याची सर्वार्थाने धुरा वाहू लागले. त्यामुळे या पदावर आरुढ झालेल्या पुरुषांबरोबर त्यांच्या स्त्रियांही अधिकृतरित्या राज्यकारभारात विशेष लक्ष घालू लागल्याचे दाखले आपल्याला सापडतात. म्हणून आपण थेट पहिल्या पेशव्यांच्या घरापासून लेखाची सुरूवात करू या.
१. राधाबाई
बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी. ज्यांच्याकडे स्वतंत्र अर्थाने 'प्रथम पेशवेपत्नी' या पदाचा मान जाईल. बर्वे घराण्यातील राधाबाई यानी थेट राज्यकारभारात भाग घेतला असेल की नाही यावर दुमत होऊ शकेल पण त्यांचे पेशव्यांच्या इतिहासात नाव राहिल ते त्या "बाजीराव" आणि "चिमाजीअप्पा" या कमालीच्या शूरवीरांच्या मातोश्री म्हणून. राधाबाईना दोन मुलीही झाल्या. १. भिऊबाई, जिचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर २. अनुबाई हिचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. घोरपडे घराणे हे इचलकरंजीचे जहागिरदार होते. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३९६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३९६
पेशव्यांच्या स्त्रिया...
भाग १
लेखक : अशोक पाटिल
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे विधान सर्वज्ञातच आहे. अगदी इतिहासही याला अपवाद नाही. विजयातून उन्मत्त होऊ नये हे जसे एक सत्य आहे तितकेच पराभावातूनही नाऊमेद होऊ नये असेही शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधारेच रणातून परतणार्या वीरांच्या शारीरिक तसेच मानसिक जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करणारी प्रमुख व्यक्ती कोण असेल तर ती घरातील 'स्त्री'.
सध्यातरी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास या मर्यादेतच विचार केल्यास शिवाजी राजा आणि जिजाऊ ही मायलेकराची जोडी समोर येते. सईबाई आणि सोयराबाई या छत्रपतींच्या पत्नी मराठी वाचकाला माहीत आहेत त्या अनुक्रमे संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या माता म्हणून. पण शिवाजीराजे ज्यावेळी अफझलखान याच्या 'प्रतापगड' भेटीसाठी तयारी करीत होते त्यावेळी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या सईबाईना देवाज्ञा झाली होती हे ज्ञात नसते. निदान सईबाई ह्या संभाजीराजेची जन्मदात्री म्हणून किमान नाव तरी माहीत आहे, पण 'पुतळाबाई' ज्या महाराजांच्या शवाबरोबर 'सती' गेल्या त्यांच्याविषयी किती जणांना माहित आहे.? ह्या तिघींशिवायही ‘लक्ष्मी’, ‘काशी’, ‘सगुणा’, ’गुणवंती’ आणि ‘सकवार’ अशा ज्या पाच स्त्रिया छत्रपतींच्या पत्नी होत्या त्यांचे महाराजांच्या निर्वाणानंतर काय झाले असेल? याची नोंद घेण्यात इतिहास काहीसा मागे पडलेला दिसून येतो. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी अल्पकाळाच्या कारकिर्दीत मराठी सत्तेवर अबदालीने पाडलेला पानिपतातील पराभवाचा डाग काही प्रमाणात सुसह्य केला. त्यात माधवरावांना रमाबाईची सुयोग्य आणि समर्थ साथ मिळाली, त्याबद्दल आपण सर्वांनी रणजित देसाई यांच्या 'स्वामी' कादंबरीत मोठ्या प्रेमाने वाचलेले असते. या ललितकृतीने मराठी मनाला इतिहासाची गोडी लावली हे निखळ सत्य आहे.
इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत (मग ती उजवी असो वा डावी) उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' विषयी कुतूहल जागृत होते. अशावेळी वाटतं एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील ‘टाईम मशिन' आपल्याकडेही असावं त्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावं म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल. पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती ’काल-प्रवासा’ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच ‘पेशवाईतील स्त्रियां’चा वेध घ्यावा लागेल.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३९५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३९५
बायजाबाई शिंदे
लेखक : अभिषेक कुंभार
राणोजी शिंदे यांच्यापासून सुरु झालेली शिंदे घराण्याची पायाभरणी उत्तरोत्तर, कर्तुत्वरुपी इमारतीच्या कळसाच्या रूपानेचं उंचावत गेली. आजमितीला कण्हेर खेड इथले शिंदे मध्यप्रदेशमध्ये सिंधिया
या नावानं शासन करत आहे., एकसे बढकर एक कर्तुत्ववान योध्यांची खाण असणाऱ्या शिंदे घराण्यातील स्त्रियांचे कर्तुत्व देखील वाखाणण्याजोगं होतं परंतु., काळाच्या ओघात काही इतिहासाची पानं
निसटली किंवा काही तशीचं सोडून देण्यात आली., त्यातीलचं एक नाव म्हणजे "बायजाबाई शिंदे"
बायजाबाई म्हणजे ग्वाल्हेरच्या महाराणी. त्यांचा जन्म इ.स.१७८४ मध्ये झाला. यांच्या वडिलांचे नाव सखाराम घाटगे सर्जेराव. बायजाबाई लहानपणी फार बाळसेदार व देखण्या होत्या, त्या घोडयावर
बसण्यांत पटाईत अशा निपजल्या. बायजाबाई शिंदे यांस कित्येक इतिहासकारांनी 'दक्षिणची सौंदर्यलतिका' अशी संज्ञा दिली आहे. राजस्थानांतील कृष्णकुमारी इत्यादि लोकप्रसिध्द लावण्यवतींच्या
लग्नाचे प्रसंग ज्याप्रमाणे मोठमोठी राजकारस्थाने घडविण्यास कारणीभूत झाले, त्याप्रमाणे बायजाबाई यांचे लग्न हे देखील महाराष्ट्रांतील एक राजकारस्थान घडवून आणण्यास कारणीभूत झाले.
दुसऱ्या बाजीरावाने सर्जेरावांचे मन वळवून बायजाबाइंचे लग्न दौलतराव शिंद्याशी लावून दिले. हे लग्न पुणे मुक्कामी इ.स. १७९८ च्या मार्च महिन्यांत मोठया थाटाने झाले. लग्न झाल्यानंतर,
बायजाबाई या नेहमी लष्कराबरोबर असे, व लष्कराच्या सर्व राजकारणामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असे.
पुढे दौलतराव १८२७ साली मरण पावले. तेव्हा बायजाबाई यांनी गादीस वारस दत्तक न घेता, सर्व कारभार आपल्या हातांत घेतला. परंतु संस्थानच्या गादीचा धनी करण्याकरिता दत्तक पुत्र घ्यावा
अशी सर्व नागरिक जनांची इच्छा होती, व तशी इच्छा ब्रिटिश रेसिडेंट ह्यानेंही व्यक्त केली होती. नागरिकांच्या इच्छेवरून त्यांनी शिंदे घराण्यापैकी पाटलोजी म्हणून जे पुरूष होते, त्याचा पुत्र
मुकुटराव हा बारा वर्षांचा असता दत्तक घेतला. बायजाबाई यांची एकंदर राजकीय कारकीर्द इ.स. १८२७ पासून इ.स.१८३३ पर्यंत सरासरी सहा वर्षेच चालली, परंतु तेवढया अवधीमध्ये त्यांनी मोठया
दक्षतेने व शहाणपणाने राज्यकारभार चालविला, पुढे राज्यांत जनकोजी शिंदे व बायजाबाई यांचा बेबनाव होऊन राज्यांत थोडे बंडही झाले.
पुढे जनकोजी शिंदे यांनी १८३३ ते १८४३ असा दहा वर्षे त्यांनी कारभार केला, १८४३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला अन दुर्दैवाने त्यांनाही मुलबाळ नव्हते. त्यामुळे, त्यांची पत्नी ताराबाई शिंदे ह्यांनी
हनुमंतराव शिंदे यांचा मुलगा भगीरथराव याला दत्तक घेतले. पुढे हाच जयाजीराव शिंदे या नावाने ओळखला गेला. यानंतर बायजाबाई ग्वाल्हेर मुकामी जयाजीराव शिंदे यांच्याजवळचं राहिल्या.
बायजाबाई या काळातही सक्रीय होत्या, अन त्यांचे भाऊ त्यात त्यांना मदत करत होते. जयाजी शिंदे जेव्हा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांना मदत करत होते. जयाजी शिंदे जेव्हा कारभार पाहु
लागले तेव्हा त्यांना त्यांचे कारभारी असलेले दादा खासगीवाले यांनी बायजाबाईंच्या भावाने जशी अप्रत्यक्ष रित्या सत्ता स्वतःच्या हाती ठेवलेई होती तसेच काम केले. दिनकर राव शिंदे यानीं काही
काळ सूत्रे आपल्या हाती घेतली, तेव्हाच्या काळातच १८५७ चे बंड देशात घडले होते.
१८५७ च्या युद्धापूर्वी अनेक गावांमध्ये काही माणसे चपात्या किंवा पोळ्या घेऊन जायची. गावकऱ्यांना एकत्र करून या चपात्या खाण्याची पद्धत होती. हजारो गावांमधून अशा चपात्या युद्धापूर्वी
पोहोचवल्या गेल्या. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले, तर सैन्याला रसद पुरवठा कसा करायचा, याची योजना या चपात्यांच्या वाटपातून साकारली गेली.
युद्ध सुरू होण्यापूर्वी सहा महिने अगोदर मथुरेला मोठ्या यज्ञाची घोषणा केली गेली. यज्ञात सहभागी होणाऱ्या ब्राम्हणांना सात लाख रुपये दक्षिणा देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. या
यज्ञाच्या निमित्ताने गोपनीय माहितीची देवाण-घेवाण सुकर झाली. अनेक राजांचे राजगुरू संदेश घेऊन सगळीकडे संचार करू लागले. हा यज्ज्ञ ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे यांनी आयोजित केला
होता. १८५७ चे स्वातंत्र्यसमर फसले पण या राणीसाहेबांचा दबदबा चोहीकडे पसरला होता. ता. २७ जून इ.स. १८६३ रोजी, ह्या राजकारस्थानी व शहाण्या स्त्री कैलासवासी झाल्या.
विद्वानांनी यांच्याबद्दल जे धन्योद्गार काढिले आहेत, ते त्यांची खरी योग्यता व्यक्त करतात. तत्कालीन 'मुंबई गॅझेट' पत्रांत बायजाबाईसाहेब संबंधाचे जे मृत्युवृत्त आले त्यांत असे म्हटले होते की,
''बेगम सुमरू, नागपुरची राणी, झांशीची राणी, लाहोरची चंदाराणी आणि भोपाळची बेगम या सुप्रसिध्द स्त्रियांमध्ये ही राज स्त्री ही आपल्या परीने प्रख्यात असून, ह्यांनी अनेक वेळा आपल्या
देशाच्या शत्रूशी घोडयावर बसून टक्कर दिली होती.''
दुसऱ्या बाजीरावाला जी मुलगी ७२ व्या वर्षी झाली ती म्हणजे ही बयाबाईसाहेब ऊर्फ सरस्वतीबाईसाहेब. १६ जानेवारी १८४७ रोजी त्यांचा जन्म झाला. या नादान पेशव्याच्या मृत्यूबरोबरच पेशवे
घराण्याचे औरस पुरुष समाप्त झाले. मागे उरली ही एकमेव निशाणी. दुर्दैवी, हतभागी. बापाच्या मागे ती ६६ वर्षे जिवंत होती. बायजाबाई शिंदे यांनी मोठ्या कौतुकाने या लहान मुलीचे लग्न
त्यांच्याच एका सरदारपुत्राबरोबर म्हणजे रावसाहेब आपटे यांच्याबरोबर ठरविले. १८५७ चा सेनानी तिचा दत्तकभाऊ, बाजीरावाचा दत्तकपुत्र नानासाहेबाने ब्रह्मवर्ताच्या आपल्या राजवाड्यात मोठ्या
थाटामाटात लावून दिले.
पंढरपूर येथे महाद्वार घाटावर शिंदेसरकारचा मोठा भव्य असा वाडा आहे. या वाड्याच्या आत द्वारकाधिशाचे मंदिर बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेरच्या राणी साहेब यांनी बांधलेले आहे....!
(बायजाबाईसाहेब शिंदे यांचे चित्र काही मला मिळाले नाही तेव्हा पोस्ट सोबत राजा रवी वर्मा यांचे चित्र जोडले आहे)
संकलन
अभिषेक कुंभार

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३९४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३९४
दिपाई बांदल
भाग ५
लेखक : अभिषेक कुंभार
मिर्झाराजा जयसिंग जेव्हा स्वराज्यावर चालून आला, तेव्हा नाइलाजास्तव त्याच्यासोबत तह करणे शिवाजी राजांना भाग पडले., आणि याचं तहाच्या कलमानुसार राजे आणि बाळ संभू राजांना आग्र्यास बादशहाच्या भेटिस जावे लागले, मोघल दरबारी असणाऱ्या रिवाजाप्रमाणे यांच्यासोबत दगा होऊन पिता पुत्रास कैददेखील घडली, तेव्हा राजगड़ी जाउन दीपाई बांदल यांनी जिजाऊस धीर दिल्याचे उल्लेख देखील आपणास मिळतात फक्त तटस्थ इतिहासकाराच्या हाती हा लेखाजोखा जायला हवा एवढीचं माफक अपेक्षा.
प्रस्तुत लेख वाचूनसुद्धा जरं कोणास रामाची सीता कोण असा प्रश्न उद्भवत असेल तर दस्तूरखुद्द "छत्रपती शिवरायांची प्रथम पत्नी, युवराज संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाईसाहेब राणीसरकार यांच्या दिपाऊ बांदल ह्या आत्त्या होतं".
कर्तुत्व, त्याग, पराक्रम परंतु पूर्णपणे अपरिचत असणाऱ्या या मराठा स्त्रीची, पर्यायाने बांदल घराण्याची तत्कालीन पत - प्रतिष्ठा काय असेल यविषयीची गोळा बेरीज वाचकांनीचं केलेली बरी....!
सदर लेखास ऐतिहासिक ख़तपाणी पुरविन्यास दिपाऊ बांदल यांच्या वंशावळीत अत्ताचे वंशज म्हणून असणाऱ्या करणराजे बांदल इतबारराव यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे
दीपाऊ बांदल यांचे चित्र उपलब्ध नसल्याने जिजाउंचे चित्रं वापरतो आहे.
(अभिषेक कुंभार)

 

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३९३

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३९३
दिपाई बांदल
भाग ४
लेखक : अभिषेक कुंभार
राजं पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले, तेव्हा अतिशय मुरब्बी राजकारणी पत्रांची, शब्दांची देवाणं घेवाणं करून, शत्रुला गाफिल ठेवत, मराठ्यांचा मुकुट शत्रुच्या तावडीतून निसटला खरा पण शत्रूला या गोष्टीचा सुगावा लागताचं त्यांचा पाठलाग सुरु झाला, पण लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजेल एवढ्या जबरदस्त महत्वकांक्षी स्वराज्यनिष्ठा आपल्या मनाशी होती, म्हणूनचं गजापूरच्या खिंडीत स्वतःच्या देहाची चाळण करण्यासाठी बाजी बांदल हे खडे ठाकले आणि त्यांनी राजांना विशाळगडी जाण्यसाठीची विनंती केली., हे बाजी बांदल म्हणजे या वीर मातेचा वीर सुपूत होयं. राजे दुष्मनाच्या गर्दीतून निसटले खरे पण त्यासाठी या बांदल घराण्याने हसत हसत सूतक आपल्या घरावर घेतले., सूतक चढलेल्या घराला सांत्वन करण्याच्या आपल्या पूर्वपार चालत आलेल्या पद्धती प्रमाणे, जिजाऊनी स्वतः जातिनिशी जाउन दिपाऊचे सांत्वन केल्याच्या उल्लेखाची नोंद आपण कुणी घेतली नसेल पण ती ऐतिहासिक दस्तऐवजात झाली हे नशिबचं. "पोटचं पोरं गेल्याचं समिंदराएवढं दुःख त्या मायिनी कसं सोसले हे तिचं तिलाचं ठावं"
याचं युद्धानंतर भरविण्यात आलेल्या जखमदरबारात शाहीर अज्ञानदासानं गायिलेल्या पोवाड्यात जेधे आणी बांदल घराण हे शिवरायांना, प्रभू श्रीरामचंद्राला लभलेल्या अंगत-हनुमंताप्रमाणे नोंदवले गेले आहे., आणी याचं गजापुरच्या खिंडीतील पराक्रमापाई बांदल घरण्याला तलवारीच्या पहिल्या पातीचा मान मिळाला.
जशा दीपाई उत्तम माता, होत्या तश्या त्या उत्तम प्रशासकदेखील होत्या हे मानायला देखील इतिहासचं भाग पाड़तो., अत्ताच्या काळात चालणारे जमिनीचे तंटे हे त्या काळात देखील चालायचेचं तेव्हा शिवरायांना यात लक्ष घालून त्यासंदर्भात योग्य तो न्यायनिवाडा करावा लागायचा., अश्याच एकदा डोहर देशमुख यांच्या जमीनीविषयक तंट्यावर निवाडा करण्याची वेळ शिवरायांवर आली तेव्हा त्या निवाडा सभेत म्हणजे तत्कालीन कोर्टात न्यायाधीश म्हणून दीपाई बांदल या कार्यरत होत्या.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३९२

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३९२
दिपाई बांदल
भाग ३
लेखक : अभिषेक कुंभार
मराठ्यांच्या आपापसातील युद्ध असोत वा शत्रू शाह्यांशी केलेली निकराची पंजेफाड़, संपूर्ण ताकदिनिशी पाठिंबा देणे हेचं दीपाई बांदल यांनी आपले आद्य कर्त्यव्य समजले., कान्होजी जेधे आणि कृष्णाजी बांदल यांच्यातील लढाई दरम्यान लढण्यासाठी कृष्णाजींस दीपाई औ यांनी शंभु प्रसाद नावाचा घोडा दिला होता, अशी इतिहासात नोंद आहे.
स्वराज्याच्या लुटुपुटुचा खेळ शिवरायांनी जेव्हा नुकताचं मांडला, तेव्हा नुकताचं मांडलेला डाव मोडून काढण्यासाठी विजापुरी दरबारने पाठवलेला कसलेला सरदार फत्तेहखान आणि त्याची कैक हजाराची फ़ौज स्वराज्यावर चालून आली यावेळी खळद बेलसर येथे स्वराज्याचा पहिला रणसंग्राम झाला., हे घडलेलं युद्ध सगळ्या जाणकारांना ठाऊक असेलचं., पण याचं युद्धात स्वराज्याला मदत म्हणून स्वताच्या दिमतीस असलेलं सैन्य या लढ्यात शिवरायांच्या बाजूने लढण्यासाठी म्हणून दीपाई बांदल यांनी पाठवले हे ठाऊक असलेली लोकं नगण्यचं.
१६५९ साली स्वराज्यावर आलेली अफझलरूपी टोळधाड़ कायमची गर्दीस मिळविण्यासाठी झालेल्या प्रतापगडाच्या महाप्रतापी पर्वात दिपाऊ बांदल यांचा सक्रीय सहभाग असल्याची नोंद इतिहासात आहे., पण आम्हाला ते कधी दिसलचं नाही कारण आम्हाला इतिहास माहितीये तो एवढाचं "विसरलात का वाघनखे"

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३९१

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३९१
दिपाई बांदल
भाग २
लेखक : अभिषेक कुंभार
महाराष्ट्रात जेव्हा परकीय सत्तांसाठी आप्तस्वकीयांच्या सर्रास कत्तली आरवल्या जात हा तो काळ. स्वतःच्या मर्दुमकीच्या जोरावर अनेक मोठमोठ्या कुटुंबांनी आपली छाप महाराष्ट्रवर पर्ययानं इतिहासवर पाडली अश्यांपैकी एक असणाऱ्या निंबाळकर घरण्यातील "सबाजी राजे निंबाळकर" यांच्या यांच्या घरण्याची लेकं "दीपाई" बांदल घराण्याची लक्ष्मी म्हणून हिरडस मावळातील नाईक बांदल देशमुख यांच्या घरण्यात आल्या.
दिपाऊ यांच्या पोटी जन्माला आलेला रणमर्द योद्धा म्हणजे "बाजी बांदल" होय. 'बांदल घरानं म्हणजे फितूर, स्वराज्याच्या कार्यात त्यांनी नेहमीच आड़काठी केली, रोहिड़ा जेव्हा स्वराज्यात दाखल झाला तेव्हा कृष्णाजी बांदलांचा विरोध मोडून त्यांना यमसदनी धाडले गेले आणि त्यानंतर उपरती होऊन बांदल घराण स्वराज्याच्या सेवेत दाखलं झाले, असे शालेय पुस्तकापासून मोठमोठ्या इतिहासकारांच्या कादंबरयातून सांगण्यात आले'.
परंतू बांदल घरण्यात असणाऱ्या या हरहुन्नरी, कर्तबागर स्त्रीचे कार्य आणि त्यांच्यासंबधीचे उल्लेखचं बोलके, की जेणे करून इतिहासचं आपनेआप बोलका झाला आणि बांदल यांच्यावरील ऐकवल्या जाणाऱ्या बंडल गोष्टी बंद झाल्या. पण अजूनही इतिहासचे अज्ञान असणारी मंडळी त्याच त्याच विषयांची घोकम पट्टी करते, हे मोठे दुर्दैव.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३९०

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३९०
दिपाई बांदल
भाग १
लेखक : अभिषेक कुंभार
आमच्याकडे अनंत काळापूर्वीची समुद्राच्या पाण्याखाली गेलेल्या मथुरा नगरीचे अस्तित्व आढळते, टीव्हीवरल्या बातम्यांमध्ये नको त्या विषयांवर कंटाळवाण्या चर्चा राजरोज घडतात. या व अश्या कित्येक गोष्टींवर मोठमोठाली चर्चासत्र देखील रंगतात, रामयणातील अमुक अमुक प्रसंग इथे इथे घडले आहेत असे 10 वेळा रिपीट करून सांगितले जाते पण साडेतीनशे - चारशे वर्षापूर्वीचा काळ अभ्यासायचा म्हटलं तर इथे चाचपड़ावं लागतं ही खरी मराठेशाही इतिहासाची शोकांतिकाचं म्हणावी लागेल.
लोकांचे अडाणीपण, इतिहासाविषयची कृष्टता यांमुळे मराठ्यांचा इतिहास काळाच्या ओघात कुठेतरी मागे पडला आणि शिवाजीचा भाऊ कोण विचारले तरं मग तान्हाजी अशी उत्तरे मिळू लागली. जर शककर्त्या शिवरायांविषयी एवढी माहिती समाजाला असेल तर त्यांच्यासाठी जीवाच्या बाजीने लढलेल्या असंख्य मावळ्यांचा पराक्रम तर केवळ इथल्या गडकोटांनीचं पाहिला आणी तेचं एकमेव या गोष्टीचे मूक साक्षीदार म्हणावे लागतील.
जीजाबाई, ताराराणी, अहिल्याबाई सोडल्याचं तर मराठा इतिहासाशी निगडित चौथी स्त्री सांगायला कौन बनेगा करोड़पतिच्या लाइफलाइन सुद्धा कमी पडव्यात हीच सत्य परिस्थिती., पण आता चुलीत जाऊनं ख़ाक होण्यापासून वाचलेल्या, पोटमाळयावरील ट्रंकेत अखेरच्या घटका मोजत वाळवीशी लढणाऱ्या कागदपत्रातून आम्ही काहीतरी खऱ्या अर्थानं शोधण्याचा प्रयत्न केला आणि मराठा इतिहासतं मोलाची कामगिरी बजवलेल्या तरी कळत नकळत वगळण्यात आलेल्या एका कर्तबगार महिलेचे चित्र त्यातून स्पष्ट झालं आणि त्या महिला म्हणजे "दिपाऊ बांदल" होय.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३८९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३८९
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १९
यानंतरच्या राजकारणात व घरच्या कलहात महाराज इतके अडकले की त्यानंतर कर्नाटक भागात त्यांना जातीने पुन्हा जाता आले नाही. व पुढे ३ वर्षातच त्यांचे निर्वाण झाले. मात्र महाराजांच्या या दक्षीण दिग्विजयाने महाराजांनी स्वराज्याहून दुप्पट मोठा व सुपिक प्रदेश सव्वावर्षात आपल्या ताब्यात आणला. मुघलांचे आक्रमण झाल्यास "बफर" तयार करुन घेतले. दख्खनमधले पठाणांचे वर्चस्व जवळपास मोडीत काढले. एक सार्वभौम राजा म्हणून कुत्बशहाकडून मान्यता मिळवून घेतली. वरुन सुरुवातीच्या आपल्या स्वारीचा खर्च त्यांनी मोठ्या हुशारीने तहाआडून कुत्बशहाकडूनच वसूल केला. पश्चिम किनारपट्टिप्रमाणेच पूर्व किनारपट्टिचा बराच भाग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आपल्या ताब्यात आणला. अर्थात तिथून येणार्या मालावरती मराठ्यांना कर मिळत असे. शिवाय आता पश्चिम किनारपट्टिप्रमाणेच पूर्व किनारपट्टिवरती जे जातीवंत अरबी घोडे उतरत त्यांना स्वत:च्या ताब्यात आणून कुत्बशहा - विजापूरची घोड्यांची रसद नियंत्रणात आणली. त्या भागात इंग्रजांना शरण आणून आपल्या परवानगी शिवाय कुठलीही व्यापारी हालचाल करायला बंदि आणली.
महाराजांच्या सर्वात दिर्घ व सर्वात यशस्वी मोहिमेला आपण आजवर जवळपास दुर्लक्षित केले. महाराजांच्या इतर मोहिमा व त्यांचा राज्याभिषेक या घटनाच इतक्या रोमहर्षक आहेत त्यामुळेही असेल कदाचित पण दुर्लक्ष झाले हे खरे. तीच चूक निस्तरायचा हा त्रोटक प्रयत्न.
- सौरभ वैशंपायन.
======
संदर्भ,
१) शककर्ते शिवराय - श्री विजयराव देशमुख
२) महाराजांच्या मुलुखात - श्री विजयराव देशमुख
३) राजा शिवछत्रपती - श्री बाबासाहेब पुरंदरे
४) जनसेवा समिती, विलेपार्ले यांच्या दक्षीण दिग्विजयावरील अभ्यासवर्गातील श्री पांडूरंग बलकवडे, श्री चंद्र शेखर नेने व श्री महेश तेंडुलकर यांची व्याख्याने.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३८८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३८८
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १८
करारानुसार विजापूर घेण्यासाठी सिद्दी मसाऊदने हालचाली सूरु केल्या. पण हिरापूर येथे बहलोलखान पठाणाने २३ डिसेंबर १६७७ मध्ये अखेरचा श्वास घेतला. लगोलग बहलोलचा हस्तक जमशिदखान पठाण याने विजापूरवरती आपला जम बसवला. व मसाऊदला निरोप पाठवला की सहा लक्ष होन मिळाले तरच कुठलाही प्रतिकार न करता विजापूरचा किल्ला ताब्यात देईन. सिद्दी मसाउदकडे इतका पैसा नव्हता, कुत्बशहाने जमशिदखानावरती अविश्वास दाखवून पैश्यांची मदत करण्यास नकार दिला. लढाई करणे परवडणारे नव्हते. मसाऊद गुपचूप बसला. इकडे विजापूरात पगार हवाय म्हणून पठाण जमशिदखानाचा जीव खाऊ लागले. तो सहा लक्ष होनांवरती विसंबून होता. विचित्र कोंडि महाराजांनी हेरली. जमशिदखानाने आता महाराजांशी बोलणे सुरु केले. महाराजांनी स्वत: सहा लक्ष होन देण्याचे कबूल केले व ते त्वरीत विजापूरकडे निघाले. हि बातमी समजताच सिद्दी मसाऊदच्या पोटात खड्डा पडला. त्यानेही विजापुरकडे धाव घेतली. पण लढून विजापुर काबीज होणार नाहि हे त्याने ओळखले. मग त्याने एक कपटनीती वापरायची ठरवली. त्याने स्वत:च्या मृत्यूची हूल उठवली. व आपल्या हाता खालचे ४ हजार सैनिक जमशिद खानाकडे नोकरीची मागणी करण्यासाठी पाठवले. आमचा नेता मेला, आम्हाला रोजीरोटी द्या म्हणून ते जमशिदखान पठाणाकडे गेले. आता जमशिदखान महाराज सहा लक्ष होन देणार या भरवश्यावरती होता. त्याने हे नवे सैन्य देखिल विजापूरात दाखल करुन घेतले. मात्र दोन दिवसांत योग्य संधी हेरुन त्यांनी जमशिदखानाला अटक केली. विजापुरचे दरवाजे सिद्दी मसाऊदला उघडे झाले. जिवंत मसाऊद विजापुरात शिरला. हि बातमी कळताच आता पुढे जाण्यात हशील नाही हे ओळखून महाराज पन्हाळ्यावरती परतले. विजापूर जिंकून दक्षीणेत दुपटिने प्रबळ होण्याची नामी संधी मात्र गेली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३८७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३८७
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १७
इथे एक खूप महत्वाची गोष्ट सांगाविशी वाटते आहे - जिंजीवरुन परत येताना तिरुवन्नमलाई या ठिकाणी आले. तेथिल अरुणाचलेश्वर शिवमंदिर व समोत्तिरपेरुमल देवालय ही दोन्हीहि मंदिरे भ्रष्ट करुन तिथे मशिदी उभारल्या होत्या. महाराजांनी त्या मशिदी पाडून पुन्हा त्या ठिकाणी शिवलिंगांची पुन: प्राणप्रतिष्ठा केली. त्या मंदिरांच्या मंडपासमोर महाराजांनी एक गोपूर बांधले. तसेच या मंदिराच्या पिछाडिवर असलेल्या टेकडीवरती दर त्रिपुरी पौर्णिमेला तुपाचा भव्य नंदादीप लावण्याची प्रथा अनेकवर्षे बंद पडली होती ती सुरु केल्याचेही सांगितले जाते. ती आजही कायम आहे.
तिथुन महाराज म्हैसूरच्या पुर्व भागात आले. त्यांच्या भयाने अनेक विजापूरी सरदार त्या भागातले किल्ले सोडून पळून गेल्याचे इंग्रजांनी नमूद केले आहे. छोट्या-मोठ्या पुंडाव्यांचा बिमोड करत कोल्हार, बाळापुर, कोप्पळ मार्गाने नोव्हेंबर १७६६ च्या पहिल्या पंधरवड्यात गदग प्रांतात आले. दक्षीणेतील अस्थिर परीस्थीती बघून कर्नाटक प्रांतापासून पन्हाळ्यापर्यंतच्या मुलुखावरती नियंत्रण आणण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला. मात्र त्या भागात पठाणांचे प्राबल्य होते, खूप सैन्य नसल्याने प्रदेशाची सामरिक बाजू भक्कम करता आली नसली तरी आपले लष्करी डाक कर्नाटकात येत-जात राहिल याची सोय नक्कीच केली.
महाराजांना परतीच्या प्रवासात एकाच ठिकाणी कडवा प्रतिकार झाला. बेलवडी या ठिकाणी. तिथल्या गढीवरती दादाजी रघूनाथाने हल्ला केला. मात्र बेलवाडिच्या ठाणेदाराने कडवा प्रतिकार केला. तब्बल २ महिने त्याने हि गढी लढवली. तो मारला गेल्यावरती त्याच्या पत्नीने सावित्रीबाई किंवा मलवाई देसाई हिने त्यानंतरही एक महिना हा लढा सुरु ठेवला. अगदि मराठ्यांचे अनेक बैल पळवून नेले. अखेर मराठ्यांच्या रेट्यापुढे नाईलाजाने तिला शरण यावे लागले. मात्र ती आपल्या मुलाच्या रक्षणासाठी हे करत होती हे लक्षात आल्यावरती तिला महाराजांनी अभय देऊन आदरपूर्वक गढीचा ताबा परत तिलाच दिला.
महाराज तोरगळ प्रांतात असताना दक्षीणेच्या राजकारणाने मोठी कूस बदलली. औरंगजेबाने बहादूरखानाकडून कुत्बशहाचा व शिवाजीचा ब्म्दोबस्त हो नाहीये हे जाणून त्याला परत बोलावले व सगळी सूत्रे दिलेरखान पठाणाकडे दिली. त्याने बहलोलखानाशी हातमिळवणी केली. कुत्बशहाने मग त्याला काटशह देत विजापुर दरबारातील दिलेरखानाच्या विरोधातील लोकांना फितवले. सिद्दी मसाऊद त्यातील एक मोठे नाव होते. सतत युध्दरत राहून बहलोलखानाचा पक्ष दुर्बळ झाला होता. कुत्बशहाचा पाठिंबा असलेल्या सिद्दी मसाऊदला जिंकणे सोपे नाहि हे त्याने जाणले. आपला वकिल त्याने भागानगरला पाठवला. झालेल्या तहात असे ठरले की बहलोलखान आपली पठाणी फौज बरखास्त करेल व त्या बदल्यात सिद्दी मसाऊद त्याला सहा लक्ष होण देईल. शिवाय विजापूरचा किल्ला देखिल सिद्दी मसाऊदच्या ताब्यात देण्यात येईल असे ठरले. करार नक्की झाला. मुघलांकडून देखिल दिलेरखानाने या तहाला मान्यता दिली. मात्र त्याने सर्वांनी मिळून शिवाजीशी लढावे असे कलम घुसवले. या घटनां दरम्यान मोरोपंत नाशिक व इतर मुघली मुलखावरती चालून गेल्याने दिलेरखान बहुदा पेडगावला परतला. तिथून जव्हारला मोरोपंतांना अडवायला धावून गेला. पण मोरोपंत आधीच मोठी लुट घेऊन निसटले होते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३८६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३८६
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १६
सगळ्या घटना महाराज सावधपणे बघत होते. आता महाराष्ट्रात परतायला हवे हे त्यांनी ताडले. आपल्या हालचालींचा सुगावा लागू न देता महाराज ऑक्टोबर १६७७ च्या शेवटी रायगडकडे निघाले. महाराजांची पाठ फिरताच इतके दिवस दबून राहिलेल्या व्यंकोजींनी उसळी घेतली. कितीही नाही म्हंटले तरी महाराजांनी त्यांचा मुलुख जिंकला होता. तो परत मिळवण्यासाठी त्यांनी ४ हजार स्वार व ६ हजार पायदळ घेऊन हंबीरराव व संताजी भोसले यांच्या ६ हजार स्वार व ६ हजार पायदळावरती हल्ला करण्यासाठी निघाले. मात्र दोन्ही सैन्य काही दिवस एकमेकांच्या समोर तळ देऊन युद्ध होत नव्हते. मात्र १६ नोव्हेंबर १६७७ मध्ये तोंड लागले. महाराजांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. मात्र या माघारीची बोच हंबीररावांना लागली. त्याच रात्री त्यांनी अनेक दिशांनी व्यंकोजीराजांच्या छावणीवरती हल्ला करुन ३ सेनापती कैद केले, हजारभर घोडे, शेकडो तंबू हस्तगत केले. व्यंकोजींचे सैन्य पळून गेले. या लढाईचे वृत्त महाराजांना समजले तेव्हा ते परतीच्या वातेवरती तोरगळ प्रांती होते. त्यांनी एक समजावणीचे पण खरडपट्टी देखिल काढणारे पत्र व्यंकोजीराजांना पाठवले. पण त्याने व्यंकोजीराजांना शहाणपण आले नाही. मग मात्र महाराजांनी त्यांचा मुलुख जिंकायचे आदेश आपल्या सैन्याला दिला. अर्णी, बंगरुळ, कोल्हार, शिराळकोट असे व्यंकोजींचे मुलुख महाराजांनी जिंकले. अखेर व्यंकोजींच्या पत्नी दीपाबाईसाहेब यांनी व्यंकोजीराजांची समजूत घातली व रघुनाथपंतांना मध्यस्थ बनवून महाराजांशी तह करायला लावला. कोल्हार प्रांत महाराजांना दिला. महाराजांनीही मग जिंकलेले बंगरुळ, होस्कोट वगैरे प्रांत व पाच लाख उत्पन्नाचे तीन महाल दीपाबाईसाहेबांना अतीव आदरपूर्वक चोळीबांगडीसाठी दिले. व सात लाख होनांचा प्रदेश व्यंकोजीराजांना दूधभातासाठी दिला.
पण पराभवाचा सल व्यंकोजींना लागून राहिला. त्यांनी विरक्ती स्वीकारली. हे कळताच महाराजांनी त्यांना उत्साह देणारे पत्र पाठवले. "आम्ही तुम्हास वडील मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची आहे? ..... तुम्ही त्या प्रांते पुरुषार्थ करून संतोषरुप असलिया आम्हास समाधान व श्लाघ्य आहे की, कनिष्ठ बंधू ऐसे पुरुषार्थी आहेती .... पुरुषार्थ व किर्ती अर्जणे ... वैराग्य उत्तरवयी कराल तेवढे थोडे. आज उद्योग करुन आम्हासही तमासे दाखविणे."

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३८५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३८५
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १५
दुसरीकडे मुघल - विजापूरकर - कुत्बशहा यांच्यात कलगीतुरा रंगु लागला होता. त्याचे झाले असे की बहादूरखानाने पठाणीपक्षासमोर नमते घेतले हे त्याला आवडले नाही. बादशहाची नाराजी दूर व्हावी म्हणून बहादूरखानाने १४ मे १६७७ रोजी नळदुर्ग, आणि ७ जुलै १६७७ रोजी गुलबर्ग्याचा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतले पण औरंगजेब चिडण्याचे दुसरे कारण कुत्बशहा-मराठे यांच्या मैत्रीकडे बहादूरखानाने केले दुर्लक्ष. त्यासाठी कुत्बशहाला धडा शिकवावा आणि शिवाजीला आपल्या मुलुखातून जाऊ दिले म्हणून त्यांच्याकदून १ कोटी खंडणी आणि तब्बल दहा हजार घोडे मिळवावेत असा आदेश त्याने बहादूरखानाला दिला. मग बहादूरखानाने आगाऊपणे कुत्बशहाला २ कोट खंडणी व २० हजार घोडे मागितले. कुत्बशहाने केवळ ५ लाखांची खंडणी देण्याची तयारी दाखवली. युध्द होणार अशी चिन्हे दिसू लागली. हा तोच कालखंड जेव्हा जिंजीच्या किल्याला महाराजांनी जिंकले होते व त्यानंतर कुत्बशहाने आपले ५ हजारांचे सैन्य व तोफखाना परत मागवून घेतला होता. त्याला हेच कारण असू शकते. बहादूरखानाने विजापूरशी म्हणजेच बहलोलखान पठाणाशी संधान बांधले. मुघलांना पुढली ८ वर्ष खंडणी देऊ नये मात्र त्या बदल्यात मुघलांसोबत कुत्बशहावरती चालून जावे व त्यानंतर शिवाजीवरती चालून जावे असा करार उभयपक्षी झाला म्हणजे चक्र आता पूर्ण फिरुन जैसे थे राजकिय परीस्थीतीवरती आले होते. मात्र मळखेड येथे १५ सप्टेंबर १६७७ रोजी कुत्बशहाने या संयुक्त फौजेचा पराभव केला. या पराभवाचे कारण बहादूरखानाचे आधीचे पठाणी पक्षाबाबतचे कटू मत आणि दक्षीणी मुसलमानांबाबतचा ओढा हे होते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३८४

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३८४
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १४
याच दरम्यान रघुनाथपंत हणमंते रायगडवरुन ४०० घोडेस्वारांसह महाराजांना भेटायला आले. महाराजांनी सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले. दुसर्या दिवशी त्यांना महाराजांनी मदुरेच्या संस्थानिकांकडे पाठवले. त्यांनी ६ लक्ष होनांचा तह करुन पैकि दिड लक्ष होन ताबडतोब भरायला सांगितले. याच मुक्कामात दोन फ्रेंच वकिल महाराजांना येऊन भेटले. व पांदेचेरीबाबत त्यांनी अभय मागितले. महाराजांनी तिथल्या नेमल्या हवालदाराला तश्या सूचना देणारे फर्मान पाठवले. तिरुमळ्ळवाडीवरुन महाराज २४ जुलैला वलिगंडापुअरम येथे आले. इथला भुईकोट जिंकून तो यशवंतराव शहाजी कदम ह्याच्या ताब्यात दिला. ३० जुलैला उटळूराचा कोट मराठ्यांनी जिंकला. २ ऑगस्ट रोजी एलवनसूरच्या किल्ला मराठ्यांनी जिंकला. तुंदुमगुर्तीच्या मुक्कामात तेवेनापट्टमचे डच महाराजांना भेटायला आले. त्यांनी महाराजांना रेशीम कापड, चंदन, गुलाबपाणी, मालदिवी नारळ, लवंगा, तलवारीची पाती महाराजांना भेट दिली. या कालापर्यंत महाराजांनी विजापूरकरांचा पाईनघाटाचा सर्व मुलुख व व्यंकोजीराजांच्या ताब्यातील कावेरीच्यावरचा जहागिरीचा मुलुख जिंकला. जवळपास दहा हजार चौरस मैलांचा सुपिक प्रदेश स्वराज्याला जोडला. कर्नाटाकात खोलवर मराठी भाला घुसला. महाराजांनी अगदि श्रीरंगपट्टणही लुटले. पुढले दोन महिने या सर्व प्रदेशाची महाराजांनी जातीने व्यवस्था लावली. खजिना वाडःअवला. डच, फ्रेंच, इंग्रजांची राजकिय व भौगोलिक नाकाबंदि केली. मराठ्यांच्या परवानगीवाचून त्यांना आता त्या प्रदेशातून कुठल्याही कारणाने प्रवास करता येणार नव्हता. निरुपयोगी असलेल्या गढ्या व किल्ले महाराजांनीच पाडले व तिथला दारुगोळा, तोफा जिंजीस पाठवल्या. जिंजीवरती महाराजांनी खूप मेहनत घेऊन गड झुंझता केला. जिंजीचे महत्व सांगताना सभासद लिहितो - "चंदि म्हणजे जैसे विजापूर, भागानगर, तैसाच तख्ताचा जागा. येथे राजियांनी रहावे परंतु इकडेही राज्य उदंड!" मात्र पुढे राजाराममहाराजांनी नऊ वर्षे याच जिंजीच्या आश्रयाने काढली हे बघता महाराजांचे द्रष्ट्रेपण सहज दिसून येते.
२२ सप्टेंबर रोजी महाराजांनी तोफांचे गाडे तयार करणार्या व सुरुंग लावूण दगडी भिंती उडवणार्या कुशल लोकांची मागणी केली. पण याने शिवाजीचे हात बळकट होतील, शिवाय कुत्बशहा, मुघल यांचे वैर पत्करावे लागेल हे ओळखून इंग्रजांनी आमच्याकडे अशी माणसेच नाहित असे सांगुन हात झटकले. मात्र महाराजांनी जातीने लक्ष घालून जिंजीच्या किल्याची मजबुती करुन घेतली. रघुनाथपंत हणमंते यांना चंदिचा साहेबसुभा सांभाळण्याची जबाबदारी सोपवली. एक लाख होन बक्षीस दिले. व तात्पुरती फौज असावी म्हणून सरनौबत हंबीरराव मोहीते व संताजी भोसले यांचे सैन्य जिंजीस ठेवले.