Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३९६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३९६
पेशव्यांच्या स्त्रिया...
भाग १
लेखक : अशोक पाटिल
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे विधान सर्वज्ञातच आहे. अगदी इतिहासही याला अपवाद नाही. विजयातून उन्मत्त होऊ नये हे जसे एक सत्य आहे तितकेच पराभावातूनही नाऊमेद होऊ नये असेही शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधारेच रणातून परतणार्या वीरांच्या शारीरिक तसेच मानसिक जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करणारी प्रमुख व्यक्ती कोण असेल तर ती घरातील 'स्त्री'.
सध्यातरी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास या मर्यादेतच विचार केल्यास शिवाजी राजा आणि जिजाऊ ही मायलेकराची जोडी समोर येते. सईबाई आणि सोयराबाई या छत्रपतींच्या पत्नी मराठी वाचकाला माहीत आहेत त्या अनुक्रमे संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या माता म्हणून. पण शिवाजीराजे ज्यावेळी अफझलखान याच्या 'प्रतापगड' भेटीसाठी तयारी करीत होते त्यावेळी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या सईबाईना देवाज्ञा झाली होती हे ज्ञात नसते. निदान सईबाई ह्या संभाजीराजेची जन्मदात्री म्हणून किमान नाव तरी माहीत आहे, पण 'पुतळाबाई' ज्या महाराजांच्या शवाबरोबर 'सती' गेल्या त्यांच्याविषयी किती जणांना माहित आहे.? ह्या तिघींशिवायही ‘लक्ष्मी’, ‘काशी’, ‘सगुणा’, ’गुणवंती’ आणि ‘सकवार’ अशा ज्या पाच स्त्रिया छत्रपतींच्या पत्नी होत्या त्यांचे महाराजांच्या निर्वाणानंतर काय झाले असेल? याची नोंद घेण्यात इतिहास काहीसा मागे पडलेला दिसून येतो. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी अल्पकाळाच्या कारकिर्दीत मराठी सत्तेवर अबदालीने पाडलेला पानिपतातील पराभवाचा डाग काही प्रमाणात सुसह्य केला. त्यात माधवरावांना रमाबाईची सुयोग्य आणि समर्थ साथ मिळाली, त्याबद्दल आपण सर्वांनी रणजित देसाई यांच्या 'स्वामी' कादंबरीत मोठ्या प्रेमाने वाचलेले असते. या ललितकृतीने मराठी मनाला इतिहासाची गोडी लावली हे निखळ सत्य आहे.
इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत (मग ती उजवी असो वा डावी) उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' विषयी कुतूहल जागृत होते. अशावेळी वाटतं एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील ‘टाईम मशिन' आपल्याकडेही असावं त्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावं म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल. पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती ’काल-प्रवासा’ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच ‘पेशवाईतील स्त्रियां’चा वेध घ्यावा लागेल.

No comments:

Post a Comment