सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १४
याच दरम्यान रघुनाथपंत हणमंते रायगडवरुन ४०० घोडेस्वारांसह महाराजांना भेटायला आले. महाराजांनी सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले. दुसर्या दिवशी त्यांना महाराजांनी मदुरेच्या संस्थानिकांकडे पाठवले. त्यांनी ६ लक्ष होनांचा तह करुन पैकि दिड लक्ष होन ताबडतोब भरायला सांगितले. याच मुक्कामात दोन फ्रेंच वकिल महाराजांना येऊन भेटले. व पांदेचेरीबाबत त्यांनी अभय मागितले. महाराजांनी तिथल्या नेमल्या हवालदाराला तश्या सूचना देणारे फर्मान पाठवले. तिरुमळ्ळवाडीवरुन महाराज २४ जुलैला वलिगंडापुअरम येथे आले. इथला भुईकोट जिंकून तो यशवंतराव शहाजी कदम ह्याच्या ताब्यात दिला. ३० जुलैला उटळूराचा कोट मराठ्यांनी जिंकला. २ ऑगस्ट रोजी एलवनसूरच्या किल्ला मराठ्यांनी जिंकला. तुंदुमगुर्तीच्या मुक्कामात तेवेनापट्टमचे डच महाराजांना भेटायला आले. त्यांनी महाराजांना रेशीम कापड, चंदन, गुलाबपाणी, मालदिवी नारळ, लवंगा, तलवारीची पाती महाराजांना भेट दिली. या कालापर्यंत महाराजांनी विजापूरकरांचा पाईनघाटाचा सर्व मुलुख व व्यंकोजीराजांच्या ताब्यातील कावेरीच्यावरचा जहागिरीचा मुलुख जिंकला. जवळपास दहा हजार चौरस मैलांचा सुपिक प्रदेश स्वराज्याला जोडला. कर्नाटाकात खोलवर मराठी भाला घुसला. महाराजांनी अगदि श्रीरंगपट्टणही लुटले. पुढले दोन महिने या सर्व प्रदेशाची महाराजांनी जातीने व्यवस्था लावली. खजिना वाडःअवला. डच, फ्रेंच, इंग्रजांची राजकिय व भौगोलिक नाकाबंदि केली. मराठ्यांच्या परवानगीवाचून त्यांना आता त्या प्रदेशातून कुठल्याही कारणाने प्रवास करता येणार नव्हता. निरुपयोगी असलेल्या गढ्या व किल्ले महाराजांनीच पाडले व तिथला दारुगोळा, तोफा जिंजीस पाठवल्या. जिंजीवरती महाराजांनी खूप मेहनत घेऊन गड झुंझता केला. जिंजीचे महत्व सांगताना सभासद लिहितो - "चंदि म्हणजे जैसे विजापूर, भागानगर, तैसाच तख्ताचा जागा. येथे राजियांनी रहावे परंतु इकडेही राज्य उदंड!" मात्र पुढे राजाराममहाराजांनी नऊ वर्षे याच जिंजीच्या आश्रयाने काढली हे बघता महाराजांचे द्रष्ट्रेपण सहज दिसून येते.
२२ सप्टेंबर रोजी महाराजांनी तोफांचे गाडे तयार करणार्या व सुरुंग लावूण दगडी भिंती उडवणार्या कुशल लोकांची मागणी केली. पण याने शिवाजीचे हात बळकट होतील, शिवाय कुत्बशहा, मुघल यांचे वैर पत्करावे लागेल हे ओळखून इंग्रजांनी आमच्याकडे अशी माणसेच नाहित असे सांगुन हात झटकले. मात्र महाराजांनी जातीने लक्ष घालून जिंजीच्या किल्याची मजबुती करुन घेतली. रघुनाथपंत हणमंते यांना चंदिचा साहेबसुभा सांभाळण्याची जबाबदारी सोपवली. एक लाख होन बक्षीस दिले. व तात्पुरती फौज असावी म्हणून सरनौबत हंबीरराव मोहीते व संताजी भोसले यांचे सैन्य जिंजीस ठेवले.
No comments:
Post a Comment