Total Pageviews

Thursday, 3 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३३२

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३३२
मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ९
इकडे अब्दाली गोकुळ मथुरेच्या दिशेने पुढे गेला. काही दिवसांपूर्वीच राघोबादादांनी येथील यात्रांसाठी करमाफी मिळवली होती. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च या दरम्यान गोकुळात होळीचा उत्सव सुरु असताना पठाणांची स्वारी आली आणि होळीच्या रंगात रक्ताचे पाट वाहू लागले. यमुनेचे पात्र लालीलाल करून सोडले. रस्त्यातून प्रेताचे ढीग इतके पडले की चालावयास वाट मिळेना. भरतपूर, दिग, कुंभेरी हे वास्तविक लुटण्याचा अब्दालीचा इरादा होता परंतु सुरजमल ने वकिली आणि युद्धाचीही तयारी दाखवून त्यास आपल्या प्रांतापासून दूर ठेवले. मथूराही प्रदेश जाटांचाच परंतु मोकळ्यावर असल्याने आणि अपुरी शिबंदी असल्याने तो पठाणांच्या तडाख्यात सापडला. आपल्या कृरतेचे प्रतीकच जणू म्हणून अब्दालीने खुलेआम आदेश दिला -“हे हिंदूंचे क्षेत्र आहे, लुट आणि कत्तल करा, जितकी मुंडकी आंत येतील तितकी आणोन राशी करा. प्रत्येक शिरास ५ रुपये बक्षीस” . पुढे ४ दिवस त्याच्या सैन्याने व त्यानंतर ३ दिवस नजीबच्या सैन्याने अमानुष कत्तल चालविली. गाई आणि माणसे मारून त्यांची तोंडे एकमेकांना लावून टांगून ठेवण्यात आली. जहानखानच्या एका तुकडीनेच केवळ ३००० मुंडकी मारल्याची नोंद मिळते. भयंकर कत्तली झाल्या. मूर्ती फोडून लाथांनी तुडविल्या गेल्या. सुंदर स्त्रिया बाटवून नेल्या. कित्येक स्त्रियांनी विषप्राशन करून तसेच जलप्रवेश करून प्राण त्यागिले. ह्याची बातमी सुरजमलला समजताच तो पठानांवर चालून आला व त्याच्या सैन्याने जोर चढवत ३ हजार पठाण कापले. अब्दाली गोकुलेच्या दिशेने निघाला होता तो माघार फिरून बल्लमगडावर सुरजमलावर चालून गेला. सुरजमल पुन्हा मागे फिरला व अब्दाली ने बल्लमगड घेतला. तिथे शिबंदी घेवून तो पुन्हा मथुरेहून गोकुळास निघाला. एव्हाना मथुरेची राखरांगोळी झाली होती. गोकुळात पोचताच मथुरेच्या बातमीने सावध झालेले आखाड्यातील नंगे गोसावी तयार होते. ४००० नंगे गोसावी तेग धरून अब्दालीचे पारीपत्यार्थ उतरले. हि तारीख होत २३ मार्च १७५७. एव्हाना अब्दालीस आणखी एक बातमी समजली… मराठे दख्खनेतून निघून जयनगर पावेतो पोचले होते.

No comments:

Post a Comment