सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ३
तिसरी गोष्ट म्हणजे महाराजांनी तंजावर येथे व्यंकोजीराजांना लिहिलेले पत्र. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी सातारा स्वराज्यात दाखल झाले. काही दिवसांनी महाराज सातार्यास आले व गंभीर रीत्या आजारी पडले. ते इतके आजारी होते कि त्यांच्या मृत्युच्या वावड्या देखिल उठल्या. मुंबईकर इंग्रजांनी तर संभाजीराजांनीच विष प्रयोग केल्याची घाणेरडी शंका आपल्या सुरतेकडे पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली. सुदैवाने महिना भरात महाराज दुखण्यातून सावरले. दक्षीणेतील राजकारणावरती महाराजांचे बारीक लक्ष होते महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्र लिहिले - "येकोजीबाबा तुम्ही महाराज म्हणवितोस हिमत बांध आम्ही तरी येक वेडे बहलोलखानासी वर जादर झगडा लाविला आहे.सारी जमेती याची आम्हावर गुंतली आहे. ...... चंदीपलीकडे तीन लक्षांचा मुलूक बहलोलखानासी आहे ऐसियास जरी आम्ही तुम्हाला ऐसी अकल ल्याहावी की चंदीमध्ये खवासखानाचा भाऊ महमद नासीरखान आहे तो तुम्ही मिलोन पठानाची विलायेत घ्यावी तरी नासीरखान वेडे आहेत त्याच्याने पुढे राजकारणाची बुनयाद चालवत नाही. याकारणे तुम्हाला हुजुर करुन लिहितो की बहलोलखाने विजापूरातून तुम्हाला लिहिले असेल की सेरखान तुम्ही मिलोन खिबा कबज सेरखानचे हवाला करणे तरी येकोजीबाबा तुम्हि पैकियावरी न पहाणे जरी बहलोलखानचा तिकडे सेरखान आहे तो लस्करीयास दोन होन देई तरी आपण तीन होन द्यावेत आणि लस्कर हशम जमेती करावी ..... ऐसे करुन आपणाकडे जमेत करुन बलकट होणे बहलोलखानचा कागद तरी चंदी घ्यावी म्हणौन आले असतील त्या मिसे सेरखानास बोलावून आनून ते तुम्हि मिलुन चंदी घ्यावी अहमद नासीरखानास मारुन गर्देस मेलवावा आणि सेरखान सहजेच आपण होऊन तेथे कमजोर असेल तो भेटीस म्हणुन बोलावून आणून तेथेच जबे करावा. त्याची जमेत काही असली तर त्यावरही हला करावा म्हणजे चंदी आपणास आली. वालगुडपुराभवता मुळूक आहे तो ही आपणास चालोन आला तरी सदरहूप्रमाणे वर्तणूक केली तरी येणेप्रमाणे फते होतच आहे. म्हणजे येकोजीबाबा तुम्हाऐसा कर्नाटकामध्ये जोरावर कोण्ही नाही... मथुरेचा (मदुरेचा) राजा आपले चदावर (तंजावर) खाऊन सुखी असोन आपला सेरीख (मित्र) व्हावा आणि आपण तरतूद तलास करुन येरुळचा (वेल्लोर) कोट व रायेलाचे (विजयनगरचे) तख्त हाताखाली घालावे. पुढे तैसेच घाटावरी चढोन श्रीरंगपटकरांसी आपलेयामध्ये सरीख करोन आपणही श्वार संगीनाथ मेलवून बेंगरूलाचा दवेदार थोरला कोट बहलोलखानाचे लेकापासून रगडून घ्यावा." हे पत्र महाराजांनी साधारण जानेवारी १६७६ मध्ये लिहिले होते म्हणजे दक्षीणेत मोहिम काढायच्या किमान ११ महिने आधी.
No comments:
Post a Comment