सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)
भाग ६
औरंगजेब प्रचंड चिडला त्याने स्वराज्याच्या सीमेवरील सरदारांना स्वराज्यात घूसून मुलुख बेचिराख करण्याची आज्ञा दिली. पण तोवर पावसाळा लागला होता. हे सर्व सरदार मुघली पद्धतीने हातावरती हात धरुन बसून राहिले. पुढले तब्बल चार महिने सगळीकडे शांतताच राहिली. महाराजांनी औरंगजेबाशी हातमिळवणी करुन एक मुलुख पदरात पाडून घेतला आणि वरुन औरंगजेबालाच दोन आघाड्या उघडायला लावून अप्रत्यक्षपणे आदिलशाहीच वाचवली. मुघली आक्रमणांनी अर्धमेल्या आदिलशाहीला खेळवत रहाणे महाराजांच्या फायद्याचे होते. दख्खनमध्ये प्रभावी होण्याकरता महाराजांना जशी अवस्था हवी होती ती त्यांनी निर्माण केली होती. शिवाय १६४९ पासून महाराजांना नगरचा भाग पाहीजे होता तो त्यांनी मिळवला, मुघलांवरती त्यांच्याच भागात घूसून हल्ला केल्याने मुघलांनाच बचावात्मक व्हायला त्यांनी भाग पाडले. दरम्यान तह होऊन विजापूर - दिल्लीत युध्दविराम झाला.
यापुढे आपली उडी थेट १६७० च्या नंतर घडलेल्या घटनांवरती जाणार आहे. एकाचवेळी दक्षीणेत किती वेगवेगळ्या घटना घडत होत्या. राजकारणाचे पट मांडले जात होते मोडले जात होते ते बघूया. याच्या पहिल्याच २-३ वर्षात महत्वाचे सत्तापालट झाले. कुत्बशाही - आदिलशाही आतून ढवळून निघाल्या. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आदिलशाही, कुत्बशाही यांच्यात नेहमी दक्षीणी मुसलमान व पठाण यांच्यात कधी सुप्त तर कधी उघड संघर्ष होत असे. दख्खन मधल्या राजकारणाला ह्या संघर्षाची वेगळी किनार आहे. अश्या संघर्षांमुळे बघता बघता एखाद्या राजकारणाला क्षणात वेगळे वळण लागत असे.
२४ नोव्हेंबर १६७२ रोजी अली आदिलशहाचा मृत्यु झाला. अली आदिलशहाच्या मृत्युनंतर सिकंदर आदिलशहा ह्या चार वर्षांच्या पोराला सत्तेवरती बसवून सर्व सुत्रे खवासखानने आपल्या हाती घेतली. जुन्या वजीराला - अब्दुल मुहम्मदला व मुजफ्फरखानाला त्याने दूर सारले. परीणामी हा संघर्ष अधिक धारदार झाला. या अस्थिरतेचा फायदा शिवरायांनी घ्यायचे ठरवले. त्यांनी विजापूरात असलेला आपला वकील बाबाजी नाईक पुंडे याला परत बोलावून घेतले. हे विजापूर विरुद्ध आघाडि उघडणार असल्याचे संकेत होते.
सांभार :सांभार :सांभार : सांभार : http://sahajsuchalamhanun.blogspot.in/2012/12/blog-post.html
No comments:
Post a Comment