मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग १
अठराव्या शतकातील अफगाणिस्तान – अरबी, दारी, पश्तो बोलणाऱ्या पठाणांचा आणि टोळधाडी करणाऱ्या लुटारूंचा भरणा असलेला प्रदेश. नादिरशाहच्या नेतृत्वाखाली या पठाणांनी पूर्वेकडील सुबत्ता पहिल्यांदा पहिली होती. वेळ मिळेल तेव्हा ती ओरबाडली होती. पाच नद्यांच्या ईश्वरी आशीर्वादाने सधन झालेला पंजाब आणि त्याचा शेजारी असलेल्या सरहिंदच्या प्रदेशाला जणू एखादा शाप मिळावा तश्या या अफगाणी टोळ्या मनमुरादपणे येवून लुट करू लागल्या. नादिर शाहच्या मृत्युनंतर अहमद शाह अब्दाली ने सर्व अफगाणी पठाणांच्या टोळ्या एकत्र केल्या व काबुल येथे स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. सर्व टोळ्यांच्या तो म्होरक्या झाला. पंजाब पासून सरहिंद पावेतो प्रदेश हा मुघल बादशाहीच्या अंमलाखाली असणारा प्रदेश आणि त्या नाते त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही तेथील वतनदार आणि जमीनदारांची परंतु ते या वाढत्या आक्रमणांना तोंड देण्यास असमर्थ ठरत होते. या प्रदेशात वास्तव्य करणारे शीख बंधू हे वस्तुतः कडवे शिपाई. तलवारीला देव मानणारे परंतु आता रोजच्याच होत असलेल्या या जाचाला ते त्रस्त झाले होते. या समस्येला आता तोडगा काढणे आवश्यक झाले होते. मुघल बादशाही दिवसेंदिवस दुर्बल होत होती. १७५२ च्या तहानुसार मराठ्यांना उत्तरेतील आग्रा व अजमेर सुभ्यात चौथीचे हक्क मिळाले होते आणि त्यायोगे मराठ्यांचा उत्तरेच्या राजकारणात अधिकृतरित्या प्रवेश झाला.
No comments:
Post a Comment