नारो शंकर-
भाग २
राघोबादादानीं आपल्याकडे पेशवाईचा कारभार घेतला, तेव्हां (१६७२) भगवानराव प्रतिनिधीवर त्यांची इतराजी होऊन, त्यांनीं आपल्या अल्पवयी मुलास प्रतिनिधि करून, त्याचें मुतालिकपद नारोपंतास दिलें. पुढें माधवरावानीं पुन्हां भगवानरावास त्याचें पद परत केलें (१७६३). नारोपंत बहुतेक दादांचा पक्षपाती असे. त्याच्या सैन्यांत अरबांचा भरणा फार असे.
याच्या ताब्यांत दिल्ली असतांना, याला बादशहानें राजेबहाद्दर हा किताब व मालेगांव हा गांव जहागीर देऊन शिवाय इतर गांवेंहि सरंजामादाखल दिली होतीं. यानें इ.स. १७४० त मालेगांव येथें दिल्लीचे कारागीर आणून एक किल्ला बांधला. लष्करीदृष्ट्या याची बांधणी फार उत्तम आहे. मालेगांवचा किल्ला हा खानदेशचें नांक होय असें तत्कालीन इंग्रज लष्करी तज्ज्ञांनीं म्हटलेलें आहे.
नाशिक येथील रामेश्वराचें देऊळ यानें १७४७ साली बांधलें; हें दक्षिणेत आढळणार्या शिल्पकामाचें एक उत्कृष्ट उदाहरण आहे. याचें नकशीकाम उत्तम आहे. यास १८ लाख रु. खर्च लागला. येथें नारोपंतानें (बहुधा वसईहून आणिलेली) एक फिरंगी कारागिरीची प्रचंड घंटा ठेविली आहे. तिच्यावर १७२१ हा आंकडा इंग्रजींत कोरलेला असून तिचा घेर सहा फूट आहे. जवळचा घाटहि नारोपंतानेंच बांधलेला आहे; त्यास ६० हजार रु. खर्च लागला. या घंटेस, देवळास व घाटास नारोशंकरी म्हणतात. यानें नाशकास एक वाडाहि बांधला. याचा भाऊ लक्ष्मणपंत हाहि याच्या बरोबर उत्तरेकडील राजकारणांत भाग घेत असे. हा प्रथम काल्पी व झांशी येथें सुभेदार होता. याचा मुलगा विश्वासराव हाहि कांहीं दिवस या सुभेदारीवर असे. नारोपंताचा दुसरा भाऊ आबाजी हा सुद्धां त्याच्या बरोबर उत्तरेकडे वावरत असे. नारोपंताच्या मृत्यूनंतर त्याच्या त्र्यंबक व रघुपत या दोन मुलांत सरंजामाबद्दल भांडण लागले असतां, तें पेशव्यांनीं मोडलें. त्र्यंबकराव हा शिंद्याचा दिवाण होता. त्याचा पुत्र गोपाळराव यानें महादजी व दौलतराव शिंद्याबरोबर राहून मराठी राज्याची चाकरी केली. पुढें पेशवाईअखेर हा इंग्रजांस मिळाला. परंतु याचे अरब लोक मालेगांवचा किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन करीनात. त्यामुळें त्यांनीं किल्ल्यास महिना-तीन बार वेढा देऊन किल्ला घेतला. या वेढ्यांत त्यांचें बरेंच नुकसान झालें (एप्रिल १८१८). किल्ला घेतल्यावर इंग्रजांनीं तो पाडून टाकला. गोपाळरावाचा पुत्र शिवराय नांवाचा होता.
मल्हारबा होळकर, विठ्ठल शिवदेव, हिंगणे, अंताजी माणकेश्वर वगैरे मंडळी ही पेशव्यांशीं फटकून उत्तरेकडे आपला सवता सुभा थाटण्याच्या विचाराची होती. यामुळें मध्यवर्ती सरकारचा फार तोटा होत असे. पानपतच्या अपयशाच्या अनेक कारणांपैकी या लोकांची ही अराजनिष्ठा किंवा अराष्ट्रनिष्ठा हेंहि एक कारण होतें. या लोकांचा तत्कालीन पत्रव्यवहार वाचून पाहिल्यास ही बाब लक्ष्यांत येईल. याचा नाशिकचा वाडा यशवंतराव होळकर व त्र्यंबकजी डेंगळ्यानें जाळला होता. [भारतवर्ष भाग १; डफ; राजवाडे खंड १, ६; ब्लॅकर- मराठा वॉर्स; लेक- सीजेस भा. ३]
No comments:
Post a Comment