सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १२
आता शेरखानला एकटा पाडल्यावरती त्याची शिकार करणे सोपे झाले. तो आपल्या सासर्याकडे तिरुवाडिच्या किल्यात आश्रयासाठी गेला होता. त्याचे ३ हजार घोडदळ व ४ हजार पायदळ त्याच्या बरोबर होते. मात्र तो स्वत: कसलेला लढवैय्या नव्हता. त्याच्या मुत्सद्यांना त्या सैन्याचा फाजिल आत्मविश्वास होता. वरुन विजापूर्वरुन मदत येईल अशी वेडि आशा त्यांना होती. पण महाराज तडकाफडकि तिरुवाडिजवळ येऊन ठाकले. जवळिल काहि सैन्याला त्यांनी मराठ्यांवरती पिटाळले. मात्र मराठ्यांनी स्वस्थता धारण केली. गोंधळून जाऊन आपले काहितरी चुकले आहे असे वाटून शेरखानने सैन्य उलटे बोलावले. सैन्य माघारी वळाले आहे याचा अंदाज येताच मराठी सैन्याची फळी वेगाने त्यांवरती चालून गेली. मग काय? त्यांच्या पळापळिला धरबंधच उरला नाही. स्वत: शेरखान लोदी अकलनायकाच्या अरण्यात शिरला. मागे प्रतिकारासाठी त्याने ५०० पठाण ठेवले होते. मात्र २-३ तासांतच तो प्रतिकार मोडून मराठे त्याच्या मागावर गेले. काहि हत्ती - उंट व आपले घोडदळ घेऊन शेरखान भुवनगिरीकडे निसटला. मराठ्यांनी निकराचा पाठलाग करुन त्याचे २७० घोडे, २० उंट, शेकड्यानी बैल, अनेक तंबू, काही नगारे पकडले. महाराज यावेळी तेवनापट्टम जवळ होते कारण तिरुवाडिचा किल्ला शेरखानच्या सासर्याने झुंजता ठेवल्याने त्याकडेही लक्ष देणे भाग होते. महाराजांची दुसरी तुकडी शेरखानवरी चालून गेली तिने २०० घोडे व ४ हत्ती पकडून आणले. आता शेरखान आपल्या १००-१२५ स्वारांनिशी भुवनगिरीपट्टणमच्या किल्यात निसटून गेला. आता शेरखानचे खरे नाही हे बघताच वालदूर, तेगनापट्टण वगैरे किल्यातून पठाणी सैन्य शरण आले अथवा सरळ सरळ पळून गेले. जुलैच्या १६७७ च्या पहिल्या आठवड्यात महाराजांच्या उपस्थितीतच मराठी सैन्याने भुवनगिरीपट्टन वरती जोरदार हल्ला चढवला. अखेर शेरखान लोदिने गुडघे टेकले. त्याने किल्ला तर ताब्यात दिलाच वरुन २० हजार होनांची खंडणी द्याचे कबूल केले. त्यावेळी पैसे नसल्याने त्याने आपल्या मुलाला ओलिस ठेवले. महाराजांनी शेरखानची सन्मानपुर्वक भेट घेतली. तह झाल्यावर एखाद्या सामान्य स्वाराप्रमाणे तो केवळ २० घोडेस्वारांनीशी अरीयलूरच्या झंगलात निघून गेला. तब्बल सहा महिन्यांनी त्याने आपल्या हिंदू मित्रांकडून पैसा गोळा करुन ती खंडणी भरली व आपल्या मुलाची सूटका केली. मग शेरखान आपल्या मुलासह आश्रयासाठी मदुरेच्या नायकाकडे निघून गेला. बहलोलखानाचा दख्खनमधला सर्वात मोठा साथीदार महाराजांनी असा कायमचा गपगार करुन टाकला.
महाराज आता व्यंकोजीराजांकडे वळले. वास्तविक कर्नाटकात आल्यापासून महाराजांनी त्यांना अनेक खलिते पाठवून भेटण्याची इच्छा प्रकट केली होती. मात्र व्यंकोजीराजांनी टाळाटाळ केली. आता कायमचा सोक्षमोक्ष लावण्याच्या विचाराने महाराज स्वत: तंजावरच्या दिशेने निघाले. त्यांनी तिरुमळ्ळपाडि जवळील कोल्लिडमच्या पात्राजवळ छावणी केली. व व्यंकोजींना निरोप पाठवला "राजश्री गोविंदभट गोसावी, राजश्री काकाजीपंत, राजश्री निळोबा नाईक व रंगोबा नाईक व तिमाजी यक्षियारराऊ असे भले लोक आम्हांपासी पाठवणे." नाईलाजाने व्यंकोजीराजांनी त्यांना पाठवले. महाराजांनी इतके वर्ष सामंजस्य दाखवल्याने व्यंकोजीराजांनी जी वडिलोपार्जित जहागिरी व संप्पत्ती उपभोगली होती त्याबाबत ’बहुत रीती घरोबियाचा व्यवहार सांगुन’ आपला हक्क असलेला अर्धा वाटा द्यावा अशी मागणी शिवरायांनी केली. मात्र अनेक दिवस व्यंकोजींनी त्यावर प्रतिक्रियाच दिली नाही.मात्र मुत्सद्दि फारच मागे लागले तेव्हा ’आम्ही वडिलाचे दर्शनाला येतो’ असा निरोप त्यांनी महाराजांना पाठवला. महाराज आनंदले. अभयाची खात्री देऊन त्यांना निमंत्रण धाडले.
No comments:
Post a Comment