Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३७८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३७८
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ८
महाराजांनीया मोहीमेवरती निघण्या आधी पाटगावास मौनीबुआंचे दर्शन घेतले. आशिर्वाद मिळावा म्हणून महाराज बराचवे थांबले. मौनीबुआ अर्थात कधी काही बोलत नसत. बर्याच वेळाने त्यांनी खडीसाखर दिली व महाराजांसोबत उभे असलेल्या मोरोपंतांच्या हातातील चंपक फुलांचा तुरा महाराजांच्या डोईवर ठेवला. महाराज नेहमीच सर्व धर्म-पंथांच्या संत-सत्पुरुषांचा आदर करीत मात्र त्यांनी भलत्या ठिकाणी नाक खूपसले तर ते त्यांना सूनवायला देखिल मागे-पुढे बघत नसत. मौनीबाबांच्या प्रमाणेच महाराज चिंचवडकर देवांनाही फार आदर देत. मात्र महाराज सातारा भागात असताना निमसड भागात त्यांना जेजूरीचे कान्हा कोळी व सूर्याजी घडसी येऊन भेटले. त्यांनी चिंचवडकर देवांविरुद्ध महाराजांकडे तक्रार केली. जेजुरीला गुरवांचा तंटा सुरू होता. देवांनी त्यात हस्तक्षेप करुन परस्पर निर्णय देऊन दोघांचे हात तोडले व त्यांना कोंडाण्यावरती कैदेत टाकले होते. ही तक्रार ऐकून महाराज संतापले. त्यांनी टाकोटाक देवांना तिरकस पत्रं लिहिले - "तुमची बिरदे आम्हांस द्या व आमची बिरदी तुम्ही घ्या!" दुसरे पत्र कोंडाण्याच्या गडकर्यास लिहिले - "तू चाकर आमचा की देवांचा?" कैद्यांची सुटका करुन या प्रकरणावरती स्वारीहून आल्यावरती निर्णय द्यायचे वचन महाराजांनी दिले.
महाराज बहुदा गोदातीराने मराठवाड्यातून नांदेड बोधन मार्गाने सिकंदराबाद व तेथून भागानगरकडे गेले असावेत. एका सनदपत्रात ’महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामी भागानगर्प्रांते स्वारीस आले होते, ते समयी मौजे कंदकुडती परगणे बोधन सरकार नांदेड हा गाव समग्र ब्राह्मणास अग्रहार करुन दिला’ अशी नोंद आहे. महाराजांनी कुत्बशाहिच्या हद्दित प्रवेश केला. महाराजांचे सैन्य शिस्त पाळून येत असलेले बघून कुत्बशहावरती त्याचा परीणाम झाला असावा. त्याने स्वत: महाराजांच्या स्वागतार्थ काही गावे सामोरा येण्याची तयारी तो करु लागला. हे समजताच महाराजांनी निरोप पाठवला ’आपण वडील भाऊ, मी धाकुटा, आपण पुढे न यावे’ बादशहा अधिकच संतुष्ट झाला. त्याने अक्कणा व मादण्णांना पुढे धाडले. त्यांनी मोठ्या सन्मानाने महाराजांना शहरात नेले. दिनांक होता - ४ मार्च १६७७. सभासद म्हणतो - "राजियांनी आपले लष्करास कुल्जरी सामान केला होता. सूमुहुर्त पाहून पातशाहाचे भेटीस भागानगरमध्ये चालिले. पातशहाने नगर शृंगारिले. चौफेरी बिंदीस कुंकुम केशराचे सडे, रंगमाळा घातल्या, गुढिया, तोरणे, पताका, निशाणे नगरात लावली. नगर नागरीक लोक कोट्यान कोटी राजा पहावयास उभे राहिले. नारींनी मंगळ आर्त्या अगणित उजळून राजियास वंदिले. सोने - रुपियाची फुले राजियावरती उधळली. राजियांनी लोकांस खैरात द्रव्य वस्त्रे अगणित दिली आणि सर्व सैन्यासहित दादमहालात पावले..... तेथून पातशहास खालते उतरु नका आपणच खासा येतो असा निरोप पाठविला." मात्र इथे महाराजांनी आपणही सार्वभौम राजे आहोत हे दाखवून द्यायचे ठरविले. वास्तविक कुतुबशाहीचा रिवाज होता की शिरभोई धरावी, तसलिम करावी - म्हणजे पातशहाला लवुन कुर्निसात करावा व मुजरा करावा. मात्र महाराजांनी म्हंटले - ’आम्ही आपणावरी छत्र धरीले असे. त्यामुळे शिरभोई धरणे व तसलिम करणे हे माफ व्हावे.’ कुत्बशहाने ते मान्य केले. महाराजांना समोरे जाऊन त्याने महाराजांना थेट आलिंगन दिले. व महाराजांचा हात धरून त्यांना आपल्याच शेजारी बसविले. दोघेही एकासनिच बैसले. अनेकदा डोकेफोड करुन देखिल जे साधता येत नाही ते अश्या कृतींनी साधता येते. दस्तुर खुद्द कुत्बशहाच त्यांना आलिंगन देऊन एकासनी बसवतो आहे ह्याचा अर्थ महाराजांच्या राज्याला - सिंहासनाला त्याची मान्यता आहे हा उघड संदेश सगळ्यांना मिळाला.

No comments:

Post a Comment