सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ६
आता दख्खनमध्ये जायचे तर स्वराज्याची व्यवस्था लावणे गरजेचे होते. आधी मुघलांची आघाडी शांत ठेवणे गरजेचे असल्याने निराजीपंतांना मोठ्या नजराण्यासह बहादूरखानाकडे रवाना केले. व एक वर्षांसाठी शांतता राहिल असा तह केला. बहलोलशी लढण्यात महाराजांनी मदत केल्याने व आधीच्या घटनांमध्ये महाराजांनी त्याला बेजार केल्याने तो देखिल या नजराण्यांनी खुष झाला. उलट मराठ्यांची कटकट होणार नाही यातच त्याला समाधान होते. रायगडच्या उत्तरेकडील भाग त्यांनी मोरोपंत पेशव्यांकडे सोपवला, पोर्तुगिज व हबश्यांसमोर अनाजीपंत आणि विजापूरच्या सीमेवरती दत्ताजीपंतांना ठेवले. खुद्द रायगडाची जबाबदारी राहुजी सोमनाथांकडे दिली. युवराज शंभूराजांना बहुदा घरात सुरु झालेल्या सुप्त संघर्षापासून जाणूनबूजून दूर ठेवण्यासाठी शृंगारपुर सुभ्याची जबाबदारी दिली. बहुदा नोव्हेंबरच्या सुरुवातीसच शंभूराजे शृंगारपुरी गेले असावेत.
या मोहिमेसाठी महाराजांनी बहुदा डिसेंबरच्या मध्यावरती किंवा बहुदा अखेरीसच रायगड सोडला असावा. एरवी दसर्याच्या मुहुर्तावरती मराठे नवीन मोहीमा घेत. मात्र पावसाळा संपून स्वराज्याची घडी लावणे, इतरत्र कुठलाही संघर्ष निर्माण होऊन दुसरी आघाडी उघडावी लागु नये म्हणून आदिलशहा, मुघल यांबरोबर नवे तह - करार करणे यातच सप्टेंबर उजाडल्याचे आधी आपण बघितलेच आहे. मोहीमेसाठी महाराजांनी खजिना, भरपूर घोडदळ, प्रचंड पायदळ घेतले. कारकून घेतले. कर्नाटकचे माहीतगार लोकं घेतले. सभासदाने तब्बल पंचवीस हजार घोडदळ असल्याचे म्हंटले आहे. तर इंग्रज तीच संख्या २० हजारांचे घोडदळ व ४० हजारांचे पायदळ घेतले असे म्हणतात. थोडक्यात महाराजांसोबत ५० हजारांचे सैन्य नक्कीच होते. पहिल्यांदाच इतकं मोठं मराठी सैन्य मोहीमेवरती जात होतं. याशिवाय दिर्घकालिन मोहीम असल्याने रसद करायला हजारोंनी बैल, वरकड कामे करणारे बाजारबुणगे, शेकड्याने कुशल कारागिर वगैरे सोबत असावेत. रघुनाथपंत व जनार्दनपंत हणमंते सोबत होतेच. शिवाय पायदळाचे सरानौबत येसाजी कंक, बाजी सर्जेराव जेधे, सोनाजी दौलतबंदक, बाबाजी ढमढेरे, आनंदराव, मानाजी मोरे, सूर्याजी मालुसरे, धनाजी जाधव, सेखोजी गायकवाड अशी तोलामोलाची माणसे होती. कारकूनी अधिकार्यांमध्ये बाळाजी आवाजी चिटणीस, मुन्शी नीलप्रभू, शामजी नाईक पुंडे हे होते. खुद्द सरसेनापती हंबीरराव मोहीते हे दुसर्या मार्गाने गोवळकोंड्याला येणार होते.
No comments:
Post a Comment