मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग १३
एप्रिल संपता व मे सुरवातीला दादासाहेब आग्र्याच्या रोखाने निघाले. दादासाहेब येताना दिसताच सुरजमलने मैत्रीचा हात पुढे केला व आधीची सर्व बाकी खंडणी चुकती केली. यमुना उतरोन दुआबात उतरायला मराठ्यांना आणखी एक महिना लागला. जून दरम्यान मराठे अंतर्वेदीत पोचले.अंतर्वेदीत नजीबचे राज्य सुरु होते. दादासाहेबांनी आता नजीबवर मोर्चे बांधण्यास सुरुवात केली. सैन्यबळ पाठीशी येताच अंताजी माणकेश्वर हे पुन्हा सक्रीय झाले व त्यांनी सिकंदराबादेचा प्रदेश काबीज केला आणि दादासाहेबांच्या साथीला उतरले. मराठे मदतीला येताना पाहून दिल्लीचा वजीर इमादुल्मुल्काने निरोप पाठवून कळवले की “मनाजोगे राजकारण करणे परंतु रोहिल्यास दिल्लीतून घालविणे“. आता नजिबखानास धास्ती वाटू लागली. त्याने मल्हाररावकरवी राघोबादादाला सला करण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यात ४ कलमे होती.
१.मी तुमचा फर्जंद आहे तेव्हा मजवर तरवार धरू नये. मी दिल्ली व मुलुख स्वाधीन करून यमुनापार उतरून जाईन.
२.किंवा मी तुमचा वकील बनून अब्दालीकडे जाऊन तेथे राहीन. उभयतांची हद्द सांभाळीन.
३.माझ्याबद्दल संशय धरू नये म्हणून पुत्र झाबेताखानाला ७००० फौजेनिशी तुमच्याकडे ठेवीन.
४.सर्व अमान्य ठरून लढवयाचे असल्यास तसेही करू आणि ईश्वरास फैसला करू देऊ की राज्य कुणाचे.
त्याच्या या मागणीस अंताजी माणकेश्वर यांनी उत्तर दिले -
“अब्दाली व नजीब दोन नाहीत. एक चित्ती आहेत तेव्हा सर्व सोडून निघोन जावे”
अंतर्वेदेत उतरोन मराठ्यांनी सहारनपुरपासून इटाव्यापर्यंतचा प्रदेश काबिज केला.फक्त नजीबला हाकलून दिल्ली घेण्याचे बाकी राहिले होते. नजीबच्या त्रासाला दिल्लीकर आता वैतागले आणि वजीर गाजीउद्दिनने नजीबच्या हालचाली गुप्तपणे बापू हिंगणेकरवी राघोबादादाला कळवल्या. राघोबादादांनी सर्व बळ एकवटले आणि १५ जून रोजी तो दिल्लीवर निघाले. सैन्य विभागून यमुनेच्या दोन्ही काठावरून सैन्य दिल्लीच्या रोखाने निघाले. ११ ऑगस्ट रोजी मराठी सैन्याने दिल्लीला घेरले. दिल्लीच्या संरक्षणावर नजिबचा गुरु कुतुबशाह होता. मराठ्यांनी दिल्लीची रसद मारली त्यामुळे रोहील्यांची उपासमार होवू लागली. नाजीबखानाने या अखेरच्या काळात वजिराच्या परिवाराचे भरपूर हाल केले व त्यांना रस्त्यावर आणले. १५ दिवस लढून अखेर विठ्ठल शिवदेवने यांनी दिल्ली सर केली. थेट हल्ला चढवून नजीब व त्याच्या सर्व साथीदारांना जिवंत कैद केले. मराठी सैन्य दिल्लीत शिरले व त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला. बादशाहला पुन्हा स्थापित केले. विठ्ठल शिवदेव यांना बादशाहने चांदवड तालुक्यात जागीर व उम्देतुल्मुल्क किताब देवून सत्कार केला.
क्रमशः
प्रणव महाजन.
padmadurg@gmail.com
नोंद -
दुआब = अंतर्वेद = दोन नद्यांमधील भूप्रदेश.
सर्व संदर्भ उत्तरार्धाच्या अखेरीस दिले आहेत.
No comments:
Post a Comment