Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३७७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३७७
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ७
या मोहीमेवरती महाराजांनी ठरवून वरकड खर्च केला होता. सैनिकांचे पोषाख, निशाणे वगैरे हा सार्वभौम राजाच्या सैन्यासारखा केला होता. नवी शस्त्रे, दारुगोळा, चिलखते, शिरस्त्राणे उत्तमोत्तम प्रतीची होती. दोन घोडेस्वारांत तीन घोडे ठेवले होते. अर्थात हा भपका मुद्दामहुन केला असला तरी सर्व सैन्य शिस्तबद्धच होते. इतर चैनीच्या वस्तू, स्त्रीयांना अजिबात प्रवेश नव्हता. महाराजांनी सैन्याला कडक हूकूम केले होते - "एक काडी रयतेची तसनस न व्हावी.’ आवश्यक त्या वस्तू खरेदी कराव्यात, लूट कदापि करु नये. उल्लंघन झाल्यास शिरच्छेदच होणार होता. खुद्द महाराजांचा व मुख्य ४-६ अधिकार्यांचे तंबू साधे जाड कापडाचे होते. तर नेहमीच्या कारभारासाठी म्हणून असलेला मोठा तंबू देखिल जाड्याभरड्या कापडाचाच होता. त्यामुळे अर्थात इतरांचे तंबू भपकेबाज असण्याची शक्यताच नव्हती.
आपली हालचाल शक्य तितकी महाराज गुप्त ठेवत होते. महाराजांनी दोन तुकड्या करुन दुसरी तुकडी हंबीरारांवांसोबत दिली जी तोरगळप्रांतातून तुंगभद्रेच्या किनार्याने कुत्बशाहीत शिरणार होती. याच तुकडीत बाजी सर्जेराव जेधे व त्यांचा तरणाताठा मुलगा नागोजी जेधे होता. ह्या तुकडिला बहलोलखानचा सरदार हुसेनखान मियाण आडवा आला. येलगेंदलाजवळ मोठी धुमश्चक्री उडली. मराठ्यांनी हुसेनखानच्या सैन्याला पार चेचून टाकले. त्याचे सैन्य माघार घेऊ लागले. खुद्द हुसेनखानचा हत्ती रणांगणातून पळून जाऊ लागला. नागोजी जेध्याने हे बघितले. व दौडत जाऊन स्वत:चा घोडा मध्ये घातला. हत्तीची सोंडच कापली. हत्ती घाबरुन उलटा फिरला व परत रणांगणाकडे जाऊ लागला. हुसेनखान संतापला त्याने एक तीर नागोजीच्या दिशेने सोडला. तो थेट नागोजीच्या कपाळात घुसला. हुसेनखानला देखिल मराठ्यांनी पकडले. नागोजीच्या मस्तकात घुसलेला तीर बाहेर काढताच नागोजीही तडफडत मृत्युमुखी पडला. त्याची पत्नी गोदूबाई हे वृत्त समजताच कारीस सती गेली. या घटनेनंतर बहुदा बाजी जेधे आधी रायगडला गेले व तेथून कारीला गेले असावेत. नंतर महाराजांसोबत पुन्हा दख्खनमध्ये आले असावेत. ह्या घट्नेनंतर महाराज स्वत: कारी गावांत गेले व नागोजीम्च्या आईचे सांत्वन केले. त्यांना प्रतिवर्षी एक शेर सोने खर्चासाठी देण्याची व्यवस्था लावली. जेधे शकावली म्हणते पौषात हुसेनखानचा पाडाव झाला. यावरुन ही घटना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीत घडली असावी. म्हणूनच वरती मी महाराज डिसेंबरच्या शेवटी रायगडवरुन निघाले असण्याची शक्यता नोंदवली आहे.

No comments:

Post a Comment