ही मेहनत करायचे दादा अर्थातच मनावर घेतल्याशिवाय राहिला नाही, अबदालीच्या शहाजाद्याविरुद्ध शीख सरदार अलासिंग जाट आणि आदिनाबेग मोगल यांनी संघर्ष जारी ठेवला होता. राघोबा त्यांच्या मदतीसाठी लाहोरकडे रवाना झाला. मानाजी पायगुडे व आदिनाबेग थेट लाहोरवर चालून गेले. मराठ्यांची धास्ती घेऊन तैमूरशहा व जहानखान यांनी पलायनाचा मार्ग चोखाळला. ही घटना 20 एप्रिल 1758 रोजी घडली. पळपुट्या पठाणांचा मराठ्यांनी चिनाब नदीपर्यंत पाठलाग केला. आपले सामान तेथेच (वजिराबाद) टाकून पठाणांनी पळण्याचा वेग वाढवला व अटकपार करून काबुल गाठले.
दरम्यान, राघोबाने लाहोरचा कब्जा घेतला. तेथील मोगलांच्या प्रसिद्ध शालिमार बागेतील वाड्यात मराठी सैन्याचा शाही पाहुणचार आदिनाबेगने केला. मोठा दीपोत्सव करण्यात आला. त्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च झाला.
4 मे 1758ला रघुनाथराव दादाने नानासाहेब पेशव्यांस लिहिलेल्या पत्रातून काही गोष्टींचा स्वच्छ उलगडा होतो.
""लाहोर, मुलतान, काश्मीर वगैरे अटकेअलीकडील सुभ्यांचा बंदोबस्त करून अंमल बसवावा. त्यास काही झाला, काही होणे, तोही लौकरच करितो. तयमूर सुलतान व जहानखान यांचा पाठलाग करून फौज लुटून घेतली. थोडीशी झडतपडत अटकेपार पिशावरास ते पोहचले.''
दरम्यान, अहमदशहा अबदालीचा पुतण्या पुणे दरबारात नानासाहेब पेशव्यांच्या भेटीस गेला होता. अबदालीविरुद्धच्या राजकारणात त्याचा उपयोग करून घ्यावा या उद्देशाने नावाने त्याला राघोबाकडे पाठवला होता. त्यावर राघोबा लिहितो ः ""इकडून जोरा पोहचवून सरकारचा अंमल अटकेपार करावा. त्याचा पुतण्या व दौलतेचा वारस स्वामीपाशी देशास आला, तो स्वामींनी आम्हाकडे पाठवित होता. त्यास अटकेअलीकडे थोडीशी जागा बसावयास देऊन अटकेपार काबूल पिशावरचा सुभा देऊ.''
यांचे मनसुबे आता असे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे होते. त्यांची उमेद रूमशाम उर्फ कॉन्स्टन्टिनोपलपर्यंत झेप घ्यायची होती.
No comments:
Post a Comment