Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३४६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३४६
लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे
भाग १
पानिपत संग्रामपूर्वी १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते.
सन १७५८ मध्ये मराठय़ांनी सरहिंद, लाहोर जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमूर आणि सरदार जहाँनखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. जाताना त्यांनी अवजड तोफखाना आणि दिल्लीतील लुटीचा खजिना तेथेच सोडून दिला. त्या वेळी तैमूरने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले. तहमासखान मुक्त झाल्याने त्याने लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे! तारीख होती १० एप्रिल १७५८. ही हकिकत ‘तहमासनामा’ या आपल्या आत्मचरित्रापर ग्रंथात तहमासखानाने लिहून ठेवली आहे. अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठय़ांनी चालूच ठेवला होता. त्यांनी चिनाब, झेलम अशा मोठय़ा नद्या ओलांडल्या. रावळपिंडीही मराठय़ांनी सर केली व मराठी फौजा सिंधु नदीच्या काठांवर आल्या. नदीच्या पलीकडील काठांवर अटक किल्ला आहे. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी १५८१ मध्ये अकबराने अटक किल्ला बांधला. मराठी सैन्याने नदीच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज घेतला व नदीवर होडीचा पूल तयार केला. होडीच्या पुलावरून मराठी फौजा सिंधूपार होऊन अटक किल्ल्यापर्यंत आल्या व किल्ल्यावर हल्ला करून तो हस्तगत केला. ‘अटके’ वर मराठी जरीपटका फडकला. ही गोष्ट १० ऑगस्ट १७५८ ची. मराठी फौजेत या वेळी मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर, गोपाळराव गणेश, तुकोजी खंडोजी कदम, नरसोजी पंडित, साबाजी शिंदे इत्यादी सेनानी आपापल्या पथकाबरोबर होते.
अटकेच्या मोहिमेचे नेतृत्व श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी केले. लाहोरहून श्रीमंत रघुनाथरावांचे पत्र पुण्यात आले. बिपाशा नदी तीरावरून सडय़ा फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव, गोपाळ गणेशसह पुढे रवाना केल्या. पेशवे दप्तर खंड २७/२१८ या मध्ये या बाबतचे पत्र उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment