Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३५६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३५६
नागपूर (नागपूरकर भोसले) :
भाग ३
रघूजी भोसले
रघूजी भोसलेच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही; परंतु नागपूरकर भोसले घराण्यातील हा सर्वांत पराक्रमी व श्रेष्ठ पुरुष असून त्याचे वडील बिंबाजी त्याच्या लहानपणीच वारले. त्याचे संगोपन आई काशीबाई व आजी बयाबायी यांनी केले. वऱ्हाडात स्थिरस्थावर झाल्यावर त्याने देवगढ, गढा-मंडला (मध्य प्रदेश) व खंडाला, चांदा (महाराष्ट्र) ही गोंड राज्ये आपल्या आधिपत्याखाली आणली. याच वेळी शाहूने पुन्हा रघूजीस कर्नाटकात स्वारीवर पाठविले (१७३९-४०), रघूजीने भास्करपंत या आपल्या सेनापतीस बंगालवर पाठविले (१७४१). सुमारे दहा वर्षे त्याचे हे बंगाल लुटणे चालू होते. रघूजीने देवगढची विधवा राणी रतनकुंवर हिला सर्वतोपरी मदत करून तिच्या अकबर व बुऱ्हान या मुलांना वारसाहक्क व राज्य मिळवून दिले आणि वलीशाहचा पराभव केला. रतनकुंवरने रघूजीस आपला तिसरा मुलगा मानून राज्याचा तिसरा हिस्सा दिला. यानंतर रघूजीच्या रघूजी करांडे नावाच्या सेनापतीने गोंडवन काबीज केले; तेव्हा रघूजीने राजधानी नागपुरास हलविली. या वेळेपासून पुढे भोसल्यांचे वऱ्हाडातील राहण्याचे प्रमुख ठिकाण नागपूर झाले. शाहूने १७३८ मध्ये रघूजीस बंगाल, बिहार व ओरिसा येथील चौथाई व सरदेशमुखीचे अधिकार दिले. रघूजीने १७५१ मध्ये अलीवर्दीखान व मराठे यांत तह घडवून आणला. या तहान्वये भोसले यांना बारा लाख रु. चौथाई म्हणून मिळाले आणि कटक जिल्हा भोसल्यांच्या अंमलाखाली आला. या बंगालवरील स्वारीत रघूजीला वरील गोष्टींशिवाय रायपूर, रतनपूर, बिलासपूर व संबळपूर या संस्थानांवरही भास्करराम या सेनापतीमार्फत अधिराज्य प्रस्थापिता आले. रघूजीचा अनौरस मुलगा मोहनसिंग याच्या ताब्यात या संस्थानांची व्यवस्था असे.
रघूजीच्या अखेरच्या दिवसांत त्याच्या ताब्यात वऱ्हाडापासून कटकपर्यंतचा मुलूख व गढा-मंडला, चांदा व देवगढ ही गोंड राज्ये तसेच गाविलगढ, नरनाळा व माणिकदुर्ग हे महत्त्वाचे किल्ले एवढा प्रदेश होता. शिवाय बिहार व बंगाल यांची चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा मिळून सु. ४०% उत्पन्नाचा भाग त्यास मिळत असे.
शाहूने मरणापूर्वी आपल्यानंतर वारस कोण, याची चर्चा करण्यासाठी रघूजी भोसले यास साताऱ्यास बोलाविले. शाहूची राणी सगुणाबाई व रघूजीची पत्नी सुकाबाई या चुलत बहिणी होत्या. त्यामुळे रघूजीस छत्रपतींच्या गादीवर आपला मुलगा दत्तक द्यावा, असे वाटत होते. नानासाहेबांना पेशवेपद न देता ते बाबूजी नाईकास द्यावे, म्हणूनही त्याने पूर्वी खटपट केली होती; पण शाहूने त्याचे सर्व बेत अमान्य करून पेशव्यांबरोबरचा वादही सामोपचाराने मिटवून दोघांना दोन स्वतंत्र विभाग दिले. रघूजीने नागपूर शहराचे सौंदर्य वाढविले. रामटेक येथे रामाची मूर्ती बसविली.

No comments:

Post a Comment