Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३५४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३५४
नागपूर (नागपूरकर भोसले) :
भाग १
परसोजी भोसले
महाराष्ट्रातील मराठी अंमलातील एक पराक्रमी मराठा घराणे. यांच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. हे आपल्याला उदेपूरच्या राजपूत राण्यांचे वंशज म्हणवीत. मुसलमानांचे दिल्लीस वर्चस्व वाढले, तेव्हा हे दक्षिणेकडे आले. हे प्रथम अहमदनगरच्या निजामशाहीत नोकरीस लागले. त्यांना अमरावती व भाम ही गावे इनाम मिळाली. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष मुधोजी व त्याचा भाऊ रूपाजी. यांनी सध्याच्या पुणे जिल्ह्यातील हिंगणी येथील पाटीलकी खरेदी केली. म्हणून त्यांना हिंगणीकर या नावानेही संबोधीत. हे दोघे बंधू पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली फौजेत होते. मुधोजीस सात मुलगे होते, तर रूपाजीस संतती नव्हती. सात मुलांपैकी परसोजी व साबाजी हे पुढे शिवरायांच्या चाकरीत आले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजास स गादी मिळू नये, म्हणून झालेल्या कटात परसोजीचा हात होता; पण संभाजी राजा यशस्वी होताच तो खानदेशात पळाला. पुढे राजारामाच्या कारकीर्दीत रूपाजी व पुतण्या परसोजी यांनी हरेकप्रकारे मदत केली आणि गोंडवन व वऱ्हाड प्रांतांत अंमल बसविला. त्याबद्दल राजारामाने जरीपटका व सेनासाहेबसुभा हा किताब देऊन परसोजीचा सन्मान केला आणि गोंडवन, देवगढ, चांदा व वऱ्हाड हे प्रदेश त्याच्या अखत्यारीखाली दिले (१६९९). नागपूरकर भोसले घराण्यातील छत्रपतींची सनद मिळालेला हा पहिला पुरुष. परसोजीकडे वऱ्हाडातील चौथाई-सरदेशमुखी गोळा करण्याचे कामही सोपविण्यात आले. शाहूची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली (१७०७), तेव्हा परसोजी आपल्या फौजेनिशी त्यास मिळाला आणि हा शाहू तोतया नाही, हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या ताटात जेवला. त्याच वर्षी शाहूने त्यास सेनासाहेबसुभा ह्या पदाची सनद दिली आणि सहा सरकारां (जिल्हा) मधील १४७ महालांचा मोकासा वंशपरंपरागत सुरू केला. परसोजी वऱ्हाडात जात असता खेड येथे मरण पावला (१७०९).

 

No comments:

Post a Comment