त्रिंबकराव मामा पेठे—
भाग १
बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची मुलगी अनुबाई ही इचरलकरंजीकर व्यंकटराव नारायण यास दिली होती; त्यांची मुलगी वेणुताई ही त्र्यंबकराव मामाची बायको. या नात्यावरुन पेशवे घराण्यांत त्र्यंबकराव मामा असें टोपण नांव यास मिळालें व तेंच प्रख्यात झालें; शिवाय मामांची बहीण विमाजीआप्पा यांची पहिली बायको (रखमाबाई) होती, त्यामुळें यांचें पेशव्यांची तिकडूनहि हें नातें होतें. मामांचे वडील विसाजी कृष्ण पेठे हे नागरपूरकराच्या पदरीं होते, पुढें नागरपूरकरानें त्रिंबकराव विश्वनाथ यास आपला वकील म्हणून शाहूच्या दरबारीं ठेविलें होतें. नंतर पेशव्यांनीं त्यानां आपल्याकडे घेतलें.
शाहूच्या मृत्यूनंतर मामा हा पेशव्यांच्या कारभारांत त्यांचा मुख्य हस्तक होता. बाळाजी विश्वनाथाच्या नंतर बाजीरावास पेशवाई मिळवून देण्याच्या कामीं ज्यांनीं खटपटी केल्या त्यांत विसाजीपंत हेहि होते. पुरंदरे हे पेशव्यांचे पुण्याचे कारभारी असत. नानासाहेबांच्या वेळीं पुरंदरे (महादोबा) हा रुसला तेव्हां त्याच्या जागीं पेशव्यानें मामाला नेमिलें (१७५१ फेब्रु.); परंतु पुढें महादोबाजी समजूत झाल्यावर मामाला सातार्यास ताराबाईच्या बंदोबस्तास ठेविलें. मध्यंतरी ताराबाईचा व पेशव्यांचा समेट झाला. तरी पण ती आपला हेका (कारभार पहाण्याचा) सोडीना; ती पुण्यास आली असतां (आक्टोबर) मामा तिच्याबरोबर आला होता, परंतु बाईची समजूत पटली नाहीं म्हणून पुन्हां तिच्यावर देखरेख ठेवण्यास मामाला सातार्यास पाठविलें. दमाजी गायकवाडाचा सातार्यास गेंडेमाळावर पेशव्यांच्या सरदारांनीं जो पराभव केला, त्या सरदारांत मामा हे प्रमुख होते. थोरल्या माधवरावाच्या कारकीर्दीत मामानीं कर्नाटकावर स्वार्या केल्या होत्या. मामानें या स्वार्यांत (मुख्यतः मोती तलावाच्या) हैदराची खूप खोड मोडली. इतकी कीं पेशवे थेउरास फार अजारी असल्याचें ऐकून मामा परतले तरीहि हैदरानें २६ लक्ष खंडणी व १४ लक्ष स्वारीखर्च व कोल्हार वगैरे पांच प्रांत मामांच्या हवालीं केले. पेशव्यांच्या शेवटच्या दुखण्यांत मामा थेऊरासच होते. नारायणरांवाच्या खुनानंतर नदीवर ज्या मंडळींनीं (नाना, बापू, हरिपंत तात्या) नानासाहेबाचा वंश चालविण्याबद्दल गुप्तपणें शपथा घेतल्या त्यांत मामाहि होते. दादासाहेबांच्या कारकीर्दीत बारभाईच्या कारस्थानांत मामा प्रमुख होते. तेच यावेळीं सेनापति होते. दादानें त्याला घेऊन निजामावर स्वारी केली होती. पुढें कर्नाटकांत दादानें मोहीम केली, त्यावेळीं एक एक मंडळी त्याला सोडून पुण्यास आली. पुढें दादाला ही मसलत (बारभाईचें कारस्थान) समजल्यावर दादा परतला. मामाला भोंसल्यावर दादानें पाठविलें होतें. तो तिकडे न जातां दादावर स्वारी करण्याची वाट पहात बसला (१७७४ डिंसेंबर).
No comments:
Post a Comment