त्रिंबकराव मामा पेठे—
भाग २
त्याच्यावर भोंसले, फडके व मामा यांनां कारभार्यांनीं पाठविलें. त्यांची गांठ पंढरपुराजवळ कासेगांव येथें पडली. मामानें घाई व उतावीळ करुन दादावर हल्ला केला, त्यांत त्याचा मोड होऊन मामा फार जखमी होऊन पाडाव झाला (२६ मार्च १७७४). त्यावर बर्हाणपुराकडे शिंदे होळकरांची मदत घेण्यास दादा जात असतां वाटेंत पाडाव झाल्यावर दुसर्याच दिवशीं मामा वारला. आनंदीबाईनें मामाला पकडल्यावर त्याची फार निंदा केली; तेव्हांचें मामाचें सडेतोड उत्तर प्रसिद्ध आहे. मामाचा मुलगा विश्वासराव हा पुढें पेठ्यांच्या पथकाचा मुख्य झाला. त्याचा पुत्र अमृतराव हा पेशव्यांच्या दरबारीं कांही दिवस त्यांचा मुतालिक होता. त्याचा मुलगा त्रिंबकराव हा खडर्याच्या लढाईंत हजर होता. पेठ्यांनां मामांच्या कारकीर्दीतच ताराबाईनेंव पेशव्यानें सरंजामासाठी नेमणुका व जहागिरी दिल्या होत्या (१७४७,१७५७ इ.). मामाच्या वेळीं एकदंर सरंजाम मोठा होता. तो शेवटीं दुसर्या त्र्यंबकरावाच्या वेळीं १ लक्ष १५ हजारांपर्यंत राहिला. दोनशें स्वार बाळगण्याचा या त्र्यंबकरावाचा करार असे व त्याबद्दल सालिना ६० हजार रु. मिळत; ५० हजारांचें खासगत इनाम असे. रावबाजीनें पूर्वीचें वैर आठवून पेठ्यांचा सरंजाम सर्व जप्त केला (१८०३). इंग्रजी झाल्यावर इंग्रजांनींहि सरंजाम जप्तच करुन दुसर्या त्रिंबकरावास फक्त सालिना दोन हजारांचें पोलि. पेन्शन करुन दिलें. आपला सरंजाम परत मिळविण्याबद्दल या त्रिंबकरावानें केलेली खटपट इंग्रजांनीं चालू दिली नाहीं. पेशवाईंत पेठ्याकडे पुढील मान असत. छत्रपतीकडून जीं पेशवाईचीं वस्त्रें आणावयाचीं तीं यांनीं आणावीं. छत्रपती पुण्यास आल्यास त्यांची बरदास्त ठेवावी; दसर्याचीं ३०० रुपयांचीं मानाचीं वस्त्रें पेशव्यांकडून यास मिळत. सरकारांतून हत्ती, पालखीचा मान असे. पुणें येथें मामाचा वाडा कसबा पेठेंत तांबटाच्या हौदाजवळ होता. तो ७-८ वर्षांखालीं पडला. त्यांचा वंश सातारा जिल्ह्यांतील चिंधोली या त्यांच्या इनामगांवीं व नाशिक येथें असे. (वाड-कैफियती; भारतवर्ष शकावली; पेशव्यांची बखर; काव्य. इ.सं. शकावली; धाकटे राजारामचरित्र; राजवाडे खंड २,६; पत्रें यादी.).
No comments:
Post a Comment