भाग ३२७
मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ४
आपल्या या जावयाला मुघलानी बेगम पुरेपूर ओळखून नव्हती. त्याने तिथला प्रांतिक अंमलदार आदिनाबेग याच्या सहाय्याने मुघलानी बेगम आणि स्वतःची बायको या दोघांनाही कैद करून दिल्लीला रवाना केले. पंजाब प्रांताचा कब्जा घेतला. मुघलानी बेगम दिल्लीला पोचली तसे तिला आपल्या जावयाचे गुण कळले. इमादुल्मुल्काने वजीर होताच सरकारी खाजाण्याचा ताबा घेतला होता. मालिका-ए-जमानी तसेच शाही जनान्यातील इतर स्त्रियांचे सर्व खर्च थोपवून धरले होते. मुघलानी महाकारस्थानी बाई होती तिने दिल्लीत पोचताच सर्व परिस्थितीचा आढावा घेत आपले राजकारण सुरु केले. तिने ओळखले की इमादुल्मुल्काला रोखण्याची ताकत एकाच इसमात होती आणि तो म्हणजे अहमदशाह अब्दाली. अहमद शाहने वास्तविक तिला आधी पंजाबातून झिडकारून लावले होते परंतु तिला अहमदशाहच्या ताकदीचा आणि सैन्याचा अंदाज होता. अब्दाली पर्यंत पोचायला आता तिला आणखी एक मोहरा हवा होता आणि तिने तो शोधला. हा मोहरा होता नजिबखान रोहिला. नजीब्या हा मराठ्यांच्या इतिहासातील कली आहे. राघोबादादा उत्तरेत असताना नानासाहेबांनी ह्या खेळ्याला संपवा म्हणून हुकुम दिला होता परंतु नजीबला आपला धर्मपुत्र मानणाऱ्या होळकरांनी मध्यस्थी करून नजीबला वाचवले होते व तेव्हा तो तूर्त आपले अंग सावरून गंगेपलीकडे नजीबाबादेत गेला होता. या प्रकरणाचा संपूर्ण परामर्श आपण आगामी लेखात घेवूया. मराठ्यांच्या राग त्याच्या मनी होताच. या संधीची तो वाटच पाहत होता. राघोबादादा परत जाताच तो पुन्हा दिल्लीस गेला आणि मुघलानी बेगमेला हाताशी धरून मलिकेशी भेटून त्याने तिला समजाविले की आता मराठ्यांशी सांगत करता बादशाही नष्ट होणार हे निश्चित. मालिकेने नजीबच्या बोलण्यात येवून वजिराची सत्ता नाहीशी केल्यास तुलाच वजीर करू असे नजीबला वाचन दिले.
No comments:
Post a Comment