इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत [मग ती उजवी असो वा डावी] उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी [विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी] मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' च्या विषयी कुतूहल जागृत होते. वाटते, असेल का एखादे एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील "टाईम मशिन', ज्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावे आणि म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल.
पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती "काल-प्रवासा"ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच "पेशवाईतील स्त्रिया" ना आपण इथे चर्चेसाठी पटलावर आणू आणि त्या अनुषंगाने त्या त्या पुरुषासमवेत त्यांच्या अर्धांगिनींने इतिहासात दिलेल्या साथीचे अवलोकन केल्यास तो वाचन-आनंद सर्वांना भावेल अशी आशा आहे.
छत्रपतींच्या कारकिर्दीत पेशवेपद भूषविणारे मोरोपंत पिंगळे यांच्यापासून ते बहिरोजी पिंगळे यांच्यापर्यंत त्यांच्या कामकाजांचे स्वरूप 'महाराजांचे प्रशासनातील उजवे हात' अशा पद्धतीचे होते. शाहू छत्रपतींनी सातार्याला प्रयाण करून राज्याची सर्वबाबतीतील जबाबदारीची मुखत्यारपत्रे पेशव्यांना दिली आणि त्या जागी बाळाजी विश्वनाथ भटांची नेमणूक केल्यावर खर्या अर्थाने 'पेशवे' हेच मराठा राज्याची सर्वार्थाने धुरा वाहू लागले. त्यामुळे या पदावर आरुढ झालेल्या पुरुषांबरोबर त्यांच्या स्त्रियांही अधिकृतरित्या राज्यकारभारात विशेष लक्ष घालू लागल्याचे दाखले आपल्याला सापडतात. म्हणून आपण थेट पहिल्या पेशव्यांच्या घरापासून लेखाची सुरूवात करू या.
१. राधाबाई
बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी. ज्यांच्याकडे स्वतंत्र अर्थाने 'प्रथम पेशवेपत्नी' या पदाचा मान जाईल. बर्वे घराण्यातील राधाबाई यानी थेट राज्यकारभारात भाग घेतला असेल की नाही यावर दुमत होऊ शकेल पण त्यांचे पेशव्यांच्या इतिहासात नाव राहिल ते त्या "बाजीराव" आणि "चिमाजीअप्पा" या कमालीच्या शूरवीरांच्या मातोश्री म्हणून. राधाबाईना दोन मुलीही झाल्या. १. भिऊबाई, जिचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर २. अनुबाई हिचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. घोरपडे घराणे हे इचलकरंजीचे जहागिरदार होते. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.
No comments:
Post a Comment