Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३७९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३७९
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ९
महाराजांबरोबर जनार्दन पंत, प्रल्हादपंत, सोनाजी नाईक बंकी व बाबाजी ढमढेरे हे पाचजण होते. शिवाय अक्कण्णा व मादण्णा होतेच. महाराज व पातशहा एक प्रहर संवाद करत होते. कुत्बशहा व जाळीआड असलेल्या त्याच्या स्त्रीया, इतर मंत्री दस्तुर खुद्द महाराजांच्या तोंडून त्यांच्याच अतुलनिय पराक्रमाच्या कथा ऐकून अचंबित झाले. भेटी अखेर पात्शहाने महाराजांना उंची वस्त्रे, अलंकार, घोडे, हत्ती दिले व त्यांचा सत्कार केला. महाराजांना निरोप द्यायला पातशहा स्वत: महालाखाली आला. पातशहाचे चांगले मत बनले - ’राजा प्रामाणिक, आपल्यास रक्षिले, क्रिया जतन केली." दुसर्या दिवशी महाराजांना मादण्णांनी आपल्या घरी मेजवानीचे निमंत्रण दिले. महाराजांनेही ते स्वीकारले. शिष्टाईच्यावेळी हस्तीनापुरात फक्त विदुराकडे श्रीकृष्णाने भोजनाचे निमंत्रण स्वीकारले होते अगदी तसेच. मादण्णांच्या आईने स्वत: महाराजांसाठी अन्न शिजवले व वाढले.
कुतुबशहाने मादण्णास बोलावून ’राजियास काय पाहिजे ते देऊन संतुष्ट करुन निरोप द्यावा’ असे सांगितले. पुन्हा एक सुमुहुर्त पाहून कुत्बशहा व महाराजांची भेट घडवून आणली गेली. तह ठरला. कुत्बशहाने मादण्णांना सर्व अधिकार दिले. "आपली पादशाही जितकि वाढवू ये तितकी वाढवणे, पठाणाची नेस्तनाबूद करणे, दक्षीणची पातशाही आम्हा दक्षणियांचे हाती राहे ते करावे." या सुत्रावरुन उभय पक्षात करार झाला. -
१) स्वारी खर्चासाठी कुत्बशहाने दरमहा ३ हजार होन अथवा ४ लक्ष ५० हजार रुपये महाराजांना द्यावेत. २) कर्नाटक स्वारीत मदत म्हणून मिर्झा मुह्हमद अमीन याने एक हजार घोडदळ व ३ हजार पायदळाची मदत करावी. ३) पाश्चात्य तोपचींसह कुत्बशाहीचा नावाजलेला तोफखाना दारुगोळ्यासह महाराजांना मिळावा व त्याबदल्यात आदिलशहाने बळकावलेला कुत्बशाहीचा प्रदेश भूभाग शहाजीराजांचे जहागिरी वगळून जिंकलेल्या भागाचा एक हिस्सा कुत्बशहाला देण्यात येईल अशी मुख्य कलमे होती. खेरीज मुघलांचे आक्रमण आले तर परस्परांना मदत करावी. एकमेकांचे वकील एकमेकांच्या दरबारी रहातील. तसेच कुत्बशहाने दरवर्षी एक लाख होनांची खंडणी महाराजांना द्यावी असेही तहात ठरले. महाराज भागानगरात सुमारे दिड महिना मुक्कामास होते. तिथूनही त्यांनी आदिलशाहीतील घोरपडेंसारख्या मोठ्या सरदारांना आपल्या किंवा कुतुबशाहीच्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न केले. त्याचा फारसा उपयोग झाला नसला तरी महाराजांचा राजकिय प्रभाव अर्थात विस्तारला होता. एप्रिल १६७७ मध्ये महाराजांनी भागानगर सोडले ते भरपूर द्रव्य, दाणा, व अधिकची कूमक घेऊनच. दक्षिण दिशा विजयश्रीची माळ घेऊन त्यांची वाटच बघत होती.

No comments:

Post a Comment