Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४०३


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४०३
पेशव्यांच्या स्त्रिया...
भाग 8
लेखक : अशोक पाटिल
७. आनंदीबाई
पेशवे इतिहासातील सर्वात काळेकुट्ट प्रकरण कुठले असेल तर शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेला 'नारायणराव पेशव्यां'चा निर्घृण खून. तोही सख्ख्या चुलत्या आणि चुलतीकडून. नाना फडणवीस आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी रामशास्त्रींच्या न्यायव्यवस्थेकडून त्या खून प्रकरणाचा छ्डा तर लावलाच पण त्या धक्कादायक प्रकरणाच्या मागे एकटे रघुनाथराव नसून अत्यंत महत्वाकांक्षी असलेली त्यांची पत्नी 'आनंदीबाई' आहेत हेही सिद्ध केले. ["ध" चा 'मा' हे प्रकरण इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण नाही, इतके ते कुप्रसिद्ध आहे.]
आनंदीबाई ह्या गुहागरच्या ओकांची कन्या. राघोबांशी त्यांचा विवाह (१७५६) झाल्यापासून आपला नवरा 'पेशवे' पदाचा हक्कदार आहे हीच भावना त्यानी त्यांच्या मनी चेतवीत ठेवली होती. गोपिकाबाईंचे वर्चस्व त्याना सहन होणे जितके शक्य नव्हते तितकेच त्यांच्या सरदारांसमवेतही संबंध कधी जुळू शकणारे नव्हते. रघुनाथराव पराक्रमी जरूर होते पण ज्याला सावध राजकारणी म्हटले जाते ते तसे कधीच दिसून आले नाही. विश्वासराव अकाली गेले आणि माधवराव अल्पवयीन म्हणून आपल्या नवर्याला - रघुनाथरावाना - पेशवाईची वस्त्रे मिळतील अशी आनंदीबाईंची जवळपास खात्री होतीच. पण छत्रपतींनी वंशपरंपरागत रचना मान्य केली असल्याने माधवराव व त्यांच्यानंतर नारायणराव हेच पेशवे झाल्याचे आनंदीबाईना पाहाणे अटळ झाले. माधवराव निपुत्रिक गेले आणि नारायणराव यांचे वैवाहिक जीवन [पत्नी काशीबाई] नुकतेच सुरू झाले असल्याने रघुनाथराव याना पेशवे होण्याची हीच संधी योग्य आहे असे आनंदीबाईनी ठरवून तो शनिवारवाडा प्रसंग घडवून आणण्याचे त्यानी धारिष्ट्य केले आणि तांत्रिकदृष्ट्या त्या यशस्वीही झाल्याचे इतिहास सांगतो.
पण दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अल्पकाळ का होईना, पण रघुनाथराव जरूर पेशवेपदी बसले पण नाना फडणविसांनी त्याना ते सुख घेऊ दिले नाही. 'बारभाईं'नी रघुनाथराव आणि पर्यायाने आनंदीबाईंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि एक वर्षाच्या 'सवाई माधवराव' यांच्या नावाने पेशवेपदाची नव्याने स्थापना केली. आनंदीबाई मध्यप्रदेशात धार प्रांतात पळून गेल्या आणि तिथेच त्यानी 'दुसर्या बाजीराव' ना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यु झाला. त्यानंतर आनंदीबाईंचीही ससेहोलपटच झाली. रघुनाथरावांपासून झालेली दोन मुले आणि सवतीचा एक अशा तीन मुलांना घेऊनच मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात त्यांच्यामुळेच होणार्या वादात आणि लढ्यात त्यांचे नवर्याच्या मृत्यूनंतरचे आयुष्य गेले. इकडे बारभाईनी 'सवाई माधवरावा' ला पेशवे गादीवर बसवून नाना फडणवीस यांच्याच अखत्यारीत राज्यकारभार चालू केल्याने दुसर्या बाजीरावाला निदान त्यावेळी तरी पुण्यात प्रवेश नव्हताच. सवाई माधवरावांनी वेड्याच्या भरात १७९६ मध्ये आत्महत्या केल्याने आणि ते निपुत्रिक वारल्याने त्यांच्या जागी 'पेशव्यां'चा अखेरचा वारस म्हणून नानांनी (आणि दौलतराव शिंद्यांनी) अन्य उपाय नाही म्हणून दुसर्या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली.
~ मात्र मुलगा मराठेशाहीचा "पेशवा' झाल्याचे सुख आनंदीबाईच्या नजरेला पडले नाही. त्यापूर्वीच ही एक महत्वाकांक्षी स्त्री १२ मार्च १७९४ रोजी महाड येथे नैराश्येतच निधन पावली होती.
अशोक पाटील

 

No comments:

Post a Comment