Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३६९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३६९
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)
भाग १०
बहलोलखान पठाणाने आदिलशाही अशी बळकावली. अली आदिलशहा जेमतेम ७ वर्षांचा होता व केवळ बाहुले होता. खवासखान काय किंवा बहादूरखान काय त्याच्या स्थितीत फरक पडत नव्हताच. आता खवासखानाचा पक्ष लंगडा पडला. यावेळि जिंजीचा सुभेदार खवासखानाचा भाऊ नासीर मुहम्मद हा होता. त्याच्या हाताखाली पांदेचेरीपर्यंतचा मुलुख होता. तर शेरखान लोदि हा बहलोलच्या पक्षातला सरदार वालिगंडापुराम्‌मध्ये प्रमुख सरदार होता. दुसरीकडे बेळगावचा किल्लेदार शेख मीनहान हा खवासखानच्या गटांतला होता. या घटनेचा बदला घेण्यासाठी त्याने खिजरखान पन्नीला मेजवानीला बोलावले आणि त्याला भोसकून ठार केले. शंभर पठाणहि त्याने कापुन काढले. बहलोलखानाला हे कळताच तो संतापला व त्याने बंकापूरच्या हवालदाराला खवासखानचा जीव घ्यायची आज्ञा केली. १८ जानेवारी १६७६ रोजी खवासखानचा मुडदा पाडून तो विजापूरला पाठवण्यात आला. खवासखान ठार होताच त्याची प्रतिक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी उठू लागली. शेरखान व नासीर मुहम्मद एकमेकांशी भांडू लागले. मात्र खवासखान मारला गेल्याने नासीर मुहम्मद एकाकी पडला. शेरखान आता बलिष्ठ झाला. तो फ्रेंचाशी मैत्रे करुन जिंजीच नव्हे तर सर्व हिंदू संस्थाने व अगदि गोवळाकोंडाही जिंकायची महत्वाकांक्षा बाळगायला लागला. इथे खवासखानच्या मृत्यूची बातमी ऐकून बहादूरखान चिडला, कितीही झालं तरी तो त्याचा व्याही होता, शिवाय आदिलशाहीचा वजीर कच्छपी लावून मराठ्यांना चिरडण्याच्या त्याच्या दूरच्या हेतूला फार मोठा धक्का पोहोचला होता. त्याने औरंगजेबाला हे वृत्त कळवताच औरंगजेबाने आज्ञा केली की विजापूर बळकावणार्या बहलोलखानास कैद करावी किंवा मारुन टाकावे. यासाठी त्याने दिलेरखान पठाणाला बहादूरखानाच्या मदतीला पाठवले. ह्या शिवाय दख्खनच्या राजकारणाची व प्रदेशाशी खडान्‌खडा माहित असलेली एक व्यक्ती पाठवली - महंमद कुलीखान!
यापुढे जे वाचणार आहोत ते बघता राजकारणाला वारंगना का म्हंटले आहे ते समजते. दिलेरखानाची कूमक येताच बहादूरखानाने विजापूर विरुद्ध मोहिम उघडली. ३१ मे रोजी त्याने भीमा ओलांडली व आदिलशाही मुलुखात घुसला. त्यांना आदिलशाहितील शेख मीनहाज व शेख महंमद जुनैद येऊन मिळाले. १३ जून १६७६ रोजी मुघल - विजापूर युद्ध सुरु झाले. बहलोलखान कसलेला नेता होता. नुकसान दोहो बाजूंचे झाले पण बहलोलखानने मुघली सैन्याचे लचके तोडले. इतके कि बहादूरखान - दिलेरखानला माघार घ्यावी लागली व कसेबसे नदीपार झाले. या गडबडित मुघलांच्या जाळ्यात तब्बल ११ वर्ष अडकलेला एक मासा निसटला - मुहंमद कुलीखान या युद्धादरम्यान निसटले व थेट रायगडला आले. महाराजांनी लगोलग १९ जून १६७६ रोजी त्यांचे पुन्हा हिंदु धर्मात स्वागत केले. आता ते परत नेताजी पालकर झाले. दिलेरखानाला हा फार मोठा झटका होता. तसेच औंगजेबाच्या आज्ञेने झालेल्या या सक्तीच्या धर्मांतराला चपराक देऊन महाराजांनी थेट औरंगजेबाला ठेंगा दाखवला होता. महाराजांचा हा निर्णय फार क्रांतिकारक होता.

No comments:

Post a Comment