Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३८१

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३८१
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ११
जिंजीच्या दुर्गाची भक्कम व्यवस्था महाराजांनी लावली. रायाजी नलगे यांना किल्याची हवालदारी, तिमाजी केशवांना सबनिशी आणि रुद्राजी साळवी यांना इमारतींच्या कामावरती नेमले. व महाराज लगोलग २५ मे च्या सुमारास वेल्लोरच्या दिशेने निघाले. वेल्लोरचा भुईकोट किल्ला दख्खन मधला फार ताकदिचा किल्ला होता. सभासदाने लिहुन ठेवले आहे - "तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही. कोटात जीत पानियाचा खंदक. पाणियास अंत नाही असे. उदकात दहा हजार सुसरी. कोटाच्या फाजियावरुन दोन गाडिया जोडून जावे ऐशी मजबुदी. पडकोट तरी चार फेरीयावरी फेरे ये जातीचा कोट." इ.स. १५६६ च्या सुमारास विजयनगर साम्राज्याचा अधिकारी असलेल्या चिन्नबोमी नायकाने हा भुईकोट उभारला होता. वेल्लोरची मजबुती बघुन भुईकोटाच्या पूर्वेला असलेल्या टेकड्या ताब्यात घेऊन त्यावरती मराठ्यांनी तटबंदी बांधली त्यांनाच महाराजांनी साजरा-गोजरा अशी नावे दिली. काहींच्या मते हे गड आधीच बांधले होते. याच ठिकाणहुन कुत्बशहाच्या तोफखान्याच्या मदतीने वेल्लोरच्या भुईकोटावरती हल्ला करायचा महाराजांचा मानस असावा. मात्र त्याच सुमारास कुत्बशहाने महाराजांसोबत दिलेला तोफखाना परत मागवून घेतला होता. कदाचित महाराजांनी जिंजीचा किल्ला कुत्बशहाला न दिल्याने नाराज होऊन त्याने ही मदत थांबवली असावी. कींवा दुसरे कारण असेही असू शकते की या सुमारास मुघल-आदीलशहा व कुत्बशहां यांच्यातला संघर्ष पुन्हा सुरु झाला होता त्याच कारणाने कुत्बशहाने आपला तोफखाना परत मागवला असावा. कारण काहिही असेल मात्र याच कारणाने आता हा किल्ला जिंकणे जास्त कठिण व वेळखाऊ होऊ शकते हे लक्षात घेऊन त्याला दिर्घकाळ वेढा देऊन बसण्याची गरज महाराजांनी ओळखली. या वेढ्याचे काम त्यांन बहुदा नरहरी रुद्र यांकडे सोपवले व ते शेरखान लोदिचा बंदोबस्त करायच्या मागे लागले.
त्यांनी लोदिच्या अंमला खालचा मैदानी प्रदेश जिंकायला सुरुवात केली. अधेमध्ये जे गड होते त्यांवरतई शेरखान लोदीची माणसे होती. मात्र ते गड सांभाळण्याचे सोडून मराठ्यांना इतर प्रतिकार करायला किल्यांच्या बाहेर पडलेच नाहीत. महाराजांनी आजूबाजूच्या शहरांतील धनाढ्य सावकार व्यापार्यांना २ लाख होनांचे कर्ज देखिल मागवले होते पण ते घाबरुन जंगलात परागंदा झाले. मद्रास, पुलकित भागातुन ५ हजार होनांची व्यवस्था झाली. मराठ्यांनी इंग्रजांची टिमेरी येथील वखार लुटून अजून २ हजार होनांचा माल लुटला. वेल्लोरच्या मुक्कामात आजुबाजुच्या संस्थानिकांनी महाराजांकडे आपापले वकील पाठवले. फ्रेंचांनी देखिल आपला वकिल पाठवला. फ्रेंचांनी शेरखान लोदिला वालदूरचा किल्ला जिंकून दिला होता. महाराजांनी त्याबाबत नाराजी दाखवून आता त्याच्या विरोधात मदत मागितली. मात्र फ्रेंच याकरीता तयार झाले नाहीत. मात्र प्रत्यक्ष युद्धाखेरीज काही मदत लागली तर ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment