Total Pageviews

Thursday, 3 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३२८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३२८
मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ५
कालचक्रच जणू फिरले ! आणि हिंदुस्थानच्या इतिहासातील सगळ्यात वाईट गोष्ट घडली की नजीब ने आपला भाऊ सुल्तानखान याला अब्दालीकडे रवाना केले आणि मदत मागितली. इमादुल्मुल्काने पंजाबवर असलेली आपली सत्ता उडवल्याचा राग अब्दालीच्या मनात होताच, त्यामुळे त्याने अधिक विलंब न करिता आपली फौज जमा केली व स्वारी करून प्रथम पंजाब ताब्यात घेतले. अब्दालीच्या सैन्याचे नेतृत्व त्याचा पुत्र तैमुरशाह आणि त्याचा मित्र जहानखान करीत होते. लाहोर नंतर सतलज नदी ओलांडून सरहिंद काबीज करताच सैन्याची दुसरी तुकडी घेवून आता अब्दाली थेट दिल्लीच्या रोखाने निघाला. यावेळी होळकर सावनुरास होते व जयाप्पाच्या मृत्यूमुळे शोकग्रस्त शिंदे मारवाडची मोहीम उरकून पुण्यास गेले होते. अब्दाली येतोय हे कळताच दिल्ली हादरली. नादिरशाह आणि खुद्द अब्दाली यांच्या आधीच्या स्वारया, त्यातील कत्तली आणि लुट ह्याशी दिल्लीकर परिचित होते. दिल्लीतील मवासदार आणि मोठे व्यापारी मथुरेच्या रोखाने निघाले. मराठ्यांचा एकच सेनापती यावेळी उत्तरेत ग्वाल्हेरपाशी होता. ते म्हणजे अंताजी माणकेश्वर. अंताजी वजिराचा निरोप मिळताच ते हाताशी असलेले मुठभर सैन्य घेवून दिल्लीला पोचले. अब्दालीचा सेनापती जहानखान हा पंजाबातून सतलज ओलांडून सरहिंद आणि तिथून पानिपत मार्गे दिल्लीत १२ जानेवारी १७५७ रोजी पोचला. त्याचे सैन्य मोठे होते. अंताजीचा निभाव लागू शकला नाही तेव्हा इमादुल्मुल्काने अंताजीना पळून जाणाऱ्या जमीनदारांना रोखण्यास सांगितले. त्याने ठरवले की जमीनदारांना थांबवून त्यांच्या करून रक्कम जमा करून अब्दालीस खंडणी दिल्यास तो परत निघून जाईल.

No comments:

Post a Comment