Total Pageviews

Friday, 7 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३७

हिंदुस्थानचा पाटील
अलिजाबहाद्दर महादजी शिंदे
भाग ४

उत्तरहिंदुस्थानांत महादजीनें कडक अम्मल गाजविला, त्यामुळें बादशाहींतील मुसुलमान सरदार व रजपूत राजे यांनीं त्याच्याविरुद्ध बंडाळी माजविली (१७८६-८७). लालसोटच्या लढाईंत तर बादशहाची सर्व फौजच रजपूत राजांनां मिळाली, त्यामुळें महादजीस हार खावी लागली (१७८७); गुलाम कादरनें दिल्‍ली, अलीगड वगैरे शहरें ताब्यांत घेतल्यानें महादजीला चंबळेअलीकडे यावें लागलें. याप्रमाणें त्याच्या उत्तरेकडील वर्चस्वास धक्का बसला, परंतु त्यानें धीर न सोडतां पुन्हां गेलेले प्रांत परत मिळविण्याचा प्रयत्न चालविला; यावेळीं मात्र महादजीनें आपला ताठा व मत्सर सोडून नाना फडणविसाकडे मनांतील किल्मिष काढून टाकून मदतीची मागणी केली. दिल्‍ली हातची जाते हें पाहून नानानींहि अल्‍लीबाहद्दरास त्याच्या मदतीस धाडलें (१७८८). अल्‍लीबहाद्दर व महादजी यांनीं शीख आणि जाट यांनां मदतीस घेऊन गुलाम कादर वगैरे मुसुलमानमंडळ आणि उदेपूर, जोधपूर, जयपूर येथील राजे वगैरे रजपूतमंडळ यांचा पराभव करून पुन्हां रजपुताना आणि दिल्‍ली हस्तगत केली (१७८९-१७९०). उदेपूरचा राणा तर पाटीलबोवास सामोरा आला होता. हा मान त्या घराण्यानें खुद्द दिल्‍लीच्या बादशहासहि कधींच दिला नव्हता. याच सुमारास गुलाम कादरानें शहाअलमचे डोळे काढून व त्याच्या जनान्याची अब्रू घेऊन दिल्‍लींत प्रळय मांडला होंता; त्यावर महादजीनें गुलामास पकडून त्याला देहांतशासन केलें व पुन्हां शहाअलमास तक्तावर बसवून सर्व पातशाही कारभार आपल्या हातीं घेतला (१७८९).

No comments:

Post a Comment