Total Pageviews

Thursday, 6 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३४

जयपूर ला मराठांच्या दरारा

जयपुर – हिंदुस्तानच्या राजकारणातील एक महत्वाचे शहर, कछवाह वंशाचे आमेर संस्थानचे राजे यांचा बालेकिल्ला.
घटना आहे १७४५ ते १७५० च्या दरम्यानची.या वेळी जयपुरवर राज्य होते इश्वरीसिन्हाचे. मीर्जा राजा जयसिंह-सवाई जयसिंह-राजा अभयसिंह असा प्रवास करत जयपुरचा ताबा आता इश्वरीसिन्हाकडे आला होता. या दरम्यान पडलेला महत्वाचा फरक म्हणजे मराठ्यांच्या वाढत्या ताकदीचा अंदाज घेउन ह्या जयपुरकरांनी आता बचावात्मक पवित्रा घेत मराठ्यांशी वरपांगी दोस्तीचे राजकारण स्वीकारले होते. नाईलाजाने आणि स्वार्थाने. इश्वारीसिन्हाला मराठ्यांची मदत हवी होती पण मिळत नव्हती. उम्मेदसिंह हाडा हा बूंदी संस्थानावरील ताबा गमावून बसलेला बूंदीचा एक वारसदार आणि स्वतःला जयपुरचा वारसदार समजणारा माधोसिंह हे इश्वारीसिन्हाच्या विरोधात उभे होते. वास्तवात माधोसिंह हा इश्वरीचा धाकटा भाऊ आणि या नात्याने ईश्वरीसिन्हाने आपल्या राज्याचा काही भाग हा माधोसिन्हाला द्यायला हवा होता पण तो मधोसिन्हाचा हक्क सरळ सरळ नाकारत होता. माधोसिन्हाने मराठ्यांची मदत घेण्याचे ठरवले आणि त्याने पेशव्यांशी एक करार केला की – जर मराठ्यांच्या मदतीने त्याला जयपुर मधील टोंक, तोडा, मालपुरा आणि बरवाडा हे चार महाल मिळाले तर तो मराठ्याना १० लाख रुपये नजर करील आणि रक्कम मिळेपर्यंत हे चार महाल उत्पन्नासह मराठ्यांच्या ताब्यात राहतील.
१ मार्च १७४७ च्या सकाळी लढाईला तोंड फुटले आणि दीड दिवस चाललेल्या या युद्धात मराठे-माधो-जगत-उम्मेद या मित्रगटाचा पराभव झाला.याला कारण होते सूरजमल जाट. ह्या म्होरक्याने ऐन वेळी केलेल्या मदतीच्या जोरावर इश्वारिसिन्हाला निसटता विजय मिळाला. ह्या विजयाच्या उन्मादात ईश्वरीसिन्हाने पेशव्यांना एक खरमरीत पत्र लिहिले -
“ … पेशवे व आम्ही मित्र होतो, माझे पिताजी आणि बाजीराव हे मित्र होते पण प्रस्तुतचा प्रश्न हा पूर्वजांच्या मालमत्तेवरील हक्काचा आहे. आम्ही राजपुरुष आहोत आणि रुढी ह्या आम्ही पाळल्याच पाहिजेत ! धाकट्या भावाबरोबर वाटणी करून आम्ही भित्रे आहोत अथवा नालायक पुत्र आहोत अशी नामुष्की आम्ही स्वतःवर का ओढून घ्यावी ? पेशवे व मल्हार ह्यांची सूचना की आम्ही माधोसिन्हाला काही मुलुख द्यावा आम्हाला अमान्य आहे. राज्ये परमेश्वर देतो आणि त्याने हे राज्य आम्हाला दिले आहे. मल्हार सोबत आम्ही पग्ड्यांची अदलाबदल करून जी मैत्री प्रस्थापित केली होती, आणाभाका केल्या होत्या त्याची कटू फळे आता आम्हाला दिसत आहेत… “

ह्या पत्राचा परिणाम असा झाला की पेशव्यांच्या हुकुमाने १७४८ च्या जुलै मध्ये मल्हारराव होळकर, पुत्र खंडेराव आणि गंगोबातात्या चंद्रचूड हे ससैन्य जयपूरवर चालून गेले. सहा दिवस चाललेल्या धुमश्चक्रीत ईश्वरीसिन्हाची पीछेहाट झाली आणि पुन्हा सुरजमल जाटाला पुढे घालून ईश्वरीसिंह पळाला आणि बगृच्या किल्ल्यात जाऊन बसला. दरम्यान जयपूरच्या आस -पास पावसाच्या सरी दाखल झाल्या आणि रक्तासोबत चीखलही माजू लागला. मराठे भर पावसात बगृला वेढून बसले. रसद आणि कुमक मिळणे कठीण झाले. मराठ्यांनी तर जयपूर सैन्यासाठी येणारी रसद पकडून ती घेऊन येणाऱ्या तांड्यातील वाहकांचे नाक आणि कान कापले. आता ईश्वरीसिन्हाने तहाचे बोलणे लावले.तहाकरिता वकील म्हणून पुढे आला केशवदास (पेशवेकालीन मुघल दरबारातील पर्शियन तज्ञ आयमल ह्याचा मुलगा). केशवदासने प्रथम गंगोबातात्याला आपल्या बाजूने करीत मल्हाररावला वश केले आणि तह झाला. तहात माधोसिन्हाला ५ महाल मिळाले, उम्मेदसिन्हाला राज्य आणि मराठ्यांना १० लाख रुपये. मराठ्यांना निरोप देत प्रधान केशवदास आपल्या धन्यासह जयपुरकडे निघाला.
ईश्वरीसिंह अत्यंत हलक्या कानाचा माणूस होता.हरगोविंद नटानी ह्या नावाचा सरदार ईश्वरीच्या राज्याचा प्रधान बनू पहात होता. त्याने एक बनावट पत्रव्यवहार तयार केला आणि केशवदासावर राजद्रोहाचा आरोप केला. योग्य चौकशी न करिता ईश्वरीसिन्हाने त्वरित केशवदासाला देहांत शिक्षा सुनावली आणि त्याला विष देऊन ठार करण्यात आले. मराठ्यांशी झालेल्या तहाचा मध्यस्थी असणारा केशवदास मृत्यू पावला. हरगोविंद प्रधान झाला आणि मराठ्यांना हप्त्यांनी येत असलेले खंडणीचे ओघ थांबले. मराठे आता पुऱ्या जोमानिशी जयपूरवर जाण्याच्या विचारात होते आणि ह्या दरम्यान मृत प्रधान केशवदासाच्या कुटुंबाने मराठ्यांकडे न्यायाची मागणी केली. मराठ्यांनी आता स्वारीबाबतचा निश्चय दृढ केला. हरगोविंदच्या नादी लागून ईश्वरीसिन्हाने आपल्या विश्वासातील अनेक जणांना सेवेतून दूर केले आणि त्याला सल्ला देणारे विश्वासातील असे दोघेच उरले, ते म्हणजे त्याचा माहूत आणि त्याचा न्हावी !
सप्टेंबर १७५० मध्ये मराठे निघाले. खंडेराव व मल्हारराव होळकर, गंगोबा तात्या, जयाप्पा शिंदे असे मातब्बर असामी ससैन्य जयपूरच्या रोखाने पुन्हा निघाले.केशवदास मल्हाररावचा चांगला मित्र होता त्यामुळे मल्हारराव चांगलाच संतप्त झाला होता. ईश्वरीसिन्हाकडून आलेल्या वकिलाला त्याने धुडकावून लावले आणि खंडणीचे १० लाख रुपये मागितले. ईश्वरीसिन्हाने हा क्रोध प्रथम ओळखलाच नाही आणि वकीलासोबत आधी २ आणि नंतर ४ लाख रुपये पाठवले, ह्या कृत्याने तर मल्हारराव जास्त संतापला आणि त्याने जयपूर खालसा करण्याची जणू प्रतीज्ञाच केली. जयपूरच्या रोखाने मल्हारराव निघाला आणि १२ डिसेंबर रोजी तो जयपूरच्या शहराबाहेर पोहोचला. ईश्वरीसिन्हाला ही खबर मिळाली त्याने आपले प्रिय सल्लागार माहूत आणि न्हावी ह्यांना पर्याय शोधायला सांगितला आणि त्यांच्या सांगण्यावरून एक छोटी कुमक मराठ्यांवर चालून गेली. संतप्त मराठ्यांनी एका प्रहरात जयपूर बाहेरील मैदानावर ह्या फौजेचा निकाल लावला आणि जयपूरच्या रोखाने निघाले.आता मात्र ईश्वरीसिंह चांगलाच घाबरला त्यानी पुन्हा आपल्या सल्लागारांना बोलावले पण तोवर सल्लागारांनी पळ काढला होता. प्रधान हरगोविंद ह्याने उरलेली तुटपुंजी फौज मराठ्यांवर पाठवून स्वतः अज्ञात झाला होता.ईश्वरीसिन्हाला आता आपल्या कृतीचा पश्चाताप झाला. मल्हाररावच्या ताकदीचा अंदाज त्याला होता,बगृच्या किल्ल्यात बसून त्याने मराठ्यांची ताकद पहिली होती आणि आता तो भयंकर घाबरला, त्याला ह्यातून काहीच मार्ग सुचेना.कुणीही सल्लागार मिळेना. मराठे जयपुरात दाखल झाल्याची एक उडती अफवा दुपारच्या शेवटी त्याला मिळाली आणि सायंकाळच्या पहिल्या तासी त्याने एक भयानक पवित्रा घेतला.
त्याने आपल्या नोकरांना बोलावले आणि आपल्याला काही औषध करण्याकरिता हवे आहे असे सांगून त्याने नोकरांकरवी सोमलखार आणि एक जहरी नाग मागवला. रात्रीचा अंमल सुरु होताच त्याने, त्याच्या ३ राण्यांनी आणि एका आवडत्या रखेलीने सोमलखार प्राशन करून व नाग दंश करवून आत्महत्या केली. एका बंद महालात घडलेली ही दुर्दैवी घटना पुढे सुमारे १८ तास गुप्त राहिली. अनाथ जयपूर स्वैर मर्जीने प्रतिकार करीत होते. प्रेते तशीच सडत कुजत पडली होती. मराठे कब्जा करीत शहरात पोहोचले आणि त्यांना ही शोकांतिका समजली. वृद्ध मंत्री विद्याधर आणि हरगोविंद हे आता महालात जमले होते आणि त्यांनी ही वार्ता मराठ्यांना सांगितली. १८ तास राजाचे कलेवर अग्निसंस्काराशिवाय पडून होते. मल्हाररावाने जरूर त्या खर्चास पैसे देवून त्या मृतदेहावर राजवाड्याच्या बागेत अंत्यसंस्कार करविले. त्या अग्नीत ईश्वरीसिंहाची एक राणी आणि आणखी २० रखेल्या सती गेल्या.राजवाड्यात मराठे पहारेकरी बसले आणि जयपूरवर मराठी अंमल
- इति -
प्रणव महाजन
संदर्भ
पेशवे दफ्तर निवडक पत्र रुमाल क्र.२७
Fall of the Mughal Empire – Vol 1 – Jadunath Sarkar
दस्तूर-उल-अमल-इ-आगही – आयमल व केशवदास.
Translation of “वीर विनोद“ & “चहार गुलजार” By Jadunath Sarkar.
राजपुताना वंशभास्कर – १८४१
—saambhar :"सेवेठायी तत्पर मराठा"

No comments:

Post a Comment