Total Pageviews

Friday, 7 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३५
हिंदुस्थानचा पाटील
अलिजाबहाद्दर महादजी शिंदे
भाग १

प्रसिद्ध मराठी वीर. हा राणेजीचा चिमाबाई नांवाच्या रजपूत बाईंच्या पोटीं झालेला मुलगा. याचें चरित्र म्हणजे नाना फडणविसाच्या चरित्रासारखा ३५-४० एक वर्षाचा प्रकारें हिंदुस्थानचाच इतिहास होय. राणेजीच्या पश्चात् बरेच दिवस महादजी हा खुद्द पेशव्यांच्या खाजगी पागेंत होता; तो आपल्या भावांबरोबर लहानपणापासूनच मोहिमांवर जात असे; त्यामुळें त्याला युद्धशास्त्राचें शिक्षण तेव्हांपासून मिळालें होतें, तसेंच नानासाहेब पेशव्यांच्या खाजगी पागेंत असल्यानें त्यांच्या संगतीनें मुत्सद्दीपणांतहि महादजी तरबेज झाला. महादजीनें प्रथम तळेगांव-उंबरीच्या निजामावरील लढाईंत शौर्य गाजवून नांव मिळविलें. यानंतर औरंगाबाद (१७५१), साखरखेडलें (१७५६), पंजाब (१७५९) वगैरे मोहिमांत तो हजर होता. पुढें कांहीं काळ हिंदुस्थानचें आधिपत्य जें त्याच्या हातीं आलें, त्यास कारण असलेला अभ्यास, त्यानें या पहिल्या काळांत नानासाहेब पेशवे व जयाप्पा, दत्ताजी वगैरे बंधूंच्या सहवासानें केला. पानपतावर भाऊसाहेबांबरोबर हा दक्षिणेंतून निघाला होता. पानपतांत शेवटच्या दिवशीं जेव्हां उरलेले लोक पळाले, तेव्हां हाहि परत फिरला. वाटेंत एका पठाणानें त्याला डाव्या पायावर सांग मारून जन्माचा लंगडा केला असतां, राणाखान नांवाच्या एका मराठे लष्करांतील माणसानें त्याला शेवटपर्यंत निभाऊन आणलें. त्याबद्दल खानास महादजीनें भाऊ मानून व पुष्कळ इनामें देऊन योग्यतेस चढविलें. राघोबादादांच्या घालमेलीच्या कारकीर्दीत महादजी हा, पटवर्धन, प्रतिनिधीप्रमाणें निजामाकडे जाऊन मिळण्याच्या बेतांत होता.

No comments:

Post a Comment