Total Pageviews

Sunday, 9 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २५२

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २५२
राजाराम, छत्रपति :
(२ मार्च १६७० – १५ मार्च १७००).
छत्रपती शिवाजी महाराजांचा सोयराबाईपासून झालेला धाकटा मुलगा व छ. संभाजींचा सावत्र भाऊ. त्यांचा जन्म रायगडावर झाला. राजारामांचे लग्न प्रतापराव गुजराची मुलगी जानकीबाई हिच्याशी झाले (१५ मार्च १६८०). शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाई, अण्णाजी दत्तो व मोरोपंत पिंगळे यांनी राजारामांचे मंचकारोहण करविले. संभाजीनी आपल्या हातात सर्व सूत्रे घेतल्यानंतर राजाराम रायगडावर नजरकैदेत होते. जानकीबाई वारल्यानंतर संभाजींनी राजारामांची लग्ने हंबीरराव मोहित्यांची ताराबाई व कागलकर घाटग्यांची राजसबाई यांबरोबर केली. यांशिवाय राजारामांस अंबिकाबाई नावाची आणखी एक पत्नी होती व त्यांची नाटकशाळाही मोठी होती. १६८५ मध्ये मोगलांकडून जहागीर मिळवण्यसाठी राजारामांनी रायगडावरून पळून जाण्याचा एकदा अयशस्वी प्रयत्न केला होता. संभाजींना मोगलांनी पकडल्यानंतर (९ फेब्रुवारी १६८९) चांगोजी काटकर व येसाजी कंक यांनी राजारामांना ‘अदबखानाहून’ काढून, मंचकी बसविले (१२ फेबु्वारी १६८९). राजारामांनी प्रल्हाद निराजी, मानाजी मोरे इ. मंडळींना कैदेतून मुक्त करून त्यांना पूर्वीच्या पदावर नेमले.
मोगलांनी रायगडास वेढा घातल्यामुळे (२५ मार्च १६८९) राजाराम, त्यांच्या स्त्रिया, प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ यांनी रायगड सोडला. मोगलांचा पाठलाग चुकवीत राजाराम व इतर मंडळी जिंजीस गेली. मात्र त्यांनी आपल्या पत्न्या विशाळगडास रामचंद्रपंताच्या संरक्षणाखाली ठेवल्या होत्या. १६६४ मध्ये ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई जिंजीला पोहोचल्या. राजारामांना ताराबाईपासून शिवाजी व राजसबाईपासून संभाजी अशी दोन मुले झाली. राजारामांनी महाराष्ट्रातील अधिकारसूत्रे शंकराजी नारायण व रामचंद्रपंत यांना देऊन, धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांस सेनापती नेमले होते. शंकराजी मल्हार, परशराम त्रिबंक व शंकराजी नारायण इत्यादींनी राजारामांच्या गैरहजेरीत महाराष्ट्रातील मोगलांच्या आक्रमणास यशस्वीपणे तोंड दिले. जिंजी येथील कारभार प्रल्हाद निराजीने सांभाळला. १६९० मध्ये जुल्फिकारखानाने जिंजीला वेढा दिला. हा वेढा सात वर्षे चालू होता. संताजी-धनाजी यांनी या वेढ्यात मोगली अधिकाऱ्यांना जेरीस आणले होते. १६९६ मध्ये संताजी-धनाजी मधील भांडणे विकोपाला गेली. राजारामांनी संताजीचे सेनापतिपद काढून धनाजीला दिले. १६९७ गणोजी शिर्के याच्या सहाय्याने व जुल्फिकारखानाच्या संगनमताने राजाराम जिंजीहून निसटले. ते प्रथम विशाळगड येथे गेले. १६९८-९९ मध्ये राजारामांनी खंडेराव दाभाडे, परसोजी भोसले, धनाजी जाधव यांच्याबरोबर वऱ्हाड-खानदेशांत स्वारी केली होती. जुल्फिकारखानाने पाठलाग केल्यामुळे राजाराम स्वारीतून माघारी फिरले. स्वारीची दगदग सहन न झाल्याने त्यांना सिंहगड येथे नेण्यात आले होते. तेथेच ते मरण पावले. राजारामांनी स्वतःच्या हिमतीवर धडाडीने एखादी गोष्ट केली नसेल, परंतु त्यांनी सरदार व मुत्सद्दी यांचा योग्य उपयोग करून घेतला. परिस्थितीमुळे त्यांनी अनेकांना वतने दिली. राजाराम शांत स्वभावाचे व स्थिर बुध्दीचे होते. राजारामांच्या मृत्युनंतर महाराणी ताराबाईने मराठी राज्याची धुरा वाहिली.
संदर्भ : 1. Kishore, B.J. Tara Bai and Her Times, Bombay, 1963.
२. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत : स्थिरबुद्धी राजाराम, मुंबई, १९७५.
३. जुवेकर, प्रमोदिनी, संपा. मल्हार रामराव चिटणीसकृत छत्रपति राजाराम महाराजांची बखर, पुणे, १९६३.

No comments:

Post a Comment