बाळाजी आवजी चिटणवीस -
बाळजी आवजीचे वडील आबाजी हरी मुजुमदार उपनाम चित्रे. हे सुमारे ११ वर्षांपर्यंत जंजि-याचा बाबजीखान हबशी याचे मुख्य कारभारी होते. इ.स. १६३५ च्या सुमारास बाबजीखान अत्यवस्थ असता आबाजीचे बंधु खंडोबा 'बाबजीखान उदर्ईक मरेल' असे बोलले बोल फळास गांठ पडली, व आबाजीच्या शत्रूंनी 'बाबजीखानास खंडोबानी आपले जे कुलदैवत खंडेराय त्याच्या साहाय्याने कुडे करून मारिले असे बेगमांच्या व त्याच्या पुत्राच्या मनांत भरवून दिले. त्यामुळे आबाजीवर सर्वांचा रोष झाला व त्याला 'आमुचे चित्ती ती स्वामीभक्ति एक ' हा एकच मंत्र जपीत दिलेला विषाचा पेला सेवन करावा लागला. नंतर आबाजी व खंडोबा यांनी पोत्यांत घालून समुद्रांत फेकून दिले व आबाजीची पत्नी रघुमाई किंवा बुलगाई हिला व तिचे पुत्र बाळाजी, चिमाणाजी व शामजी अशा चौघास गुलाम म्हणून दूर नेऊन विकण्यास आज्ञा झाली. घरदार जप्त करून जाळपोळ केली. परंतु या चौकडीला तारवांतून नेत असता वादळ झाले व खलाश्यांना जीव वांचविण्यास राजापुरी शिरावे लागले. वादळ झाल्याने खलाश्यांनीहि बुलगाईजवळ फार कोपिष्ट देव आहेत अशी भीति वाटली व त्यांनी त्यांस २५ होनांस बुलगाईच बंधु विसो व लिंगो शंकर तुंगारे टिपणिशीवर होते त्यास विकले. येथेहि शिद्दी याचा थोडाबहुत अंमल असल्यामुळे या चौकडीला अज्ञातवासच भोगावा लागला. मामानी या तीनहि मुलांची चागची संगोपना केली व ती मोठी होताच बाळाजीला राजापूरच्या कसबेदारापाशी शिकण्यास ठेविले. बाळाजी जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याला अज्ञातवासाचा कंटाळा वाटूं लागला. इतक्यात म्हणजे स.१६४७-४८ च्या सुमारास शिवरायांनी जी नवीन क्रांति घडवून आणण्याची घामधूम सुरू केली होती ती त्याच्या कानी आली व बाळाजीला शिवरायास जाऊन मिळावेसे वाटले परंतु तसे करणे तितकेंच धोक्याचे व कठिण होते. नंतर इ.स. १६४८ त शिवरायांनी राजापूराकडे मोहीम करण्याचे ठरविले. ते ऐकून तेथील कसबेदारांनी जी काही सामोपचाराची पत्रे पाठविली त्यातच बाळाजीनी शिवरायांना एक गौरवपर पत्र लिहून आपला मनोदय कऴविला. त्या पत्रातील अक्षर, लेखनकौशल्य व विशेषतः कळकळ पाहून शिवरायांनी राजापुरास आल्यावर मुद्दाम बाळाजीचा शोध केला व त्याला, त्याचे बंधू व मातोश्रीसह आपल्याबरोबर घेऊन गेला. बाळाजीची व त्याच्या बंधूंची सेवा पाहून शिवरायांनी बाळाजीस ता. १६ आगष्ट स. १६६२ रोजी चिटणिशी दिली व चिमणाजी व शामजीस खासगीकडे कारभार सांगितले.
No comments:
Post a Comment