Total Pageviews

Sunday, 9 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २३७


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २३७
तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
भाग ८
पानिपतच्या युद्धावरून शेजवलकरांनी मराठ्यांच्या एकंदरच राजकारणाविषयी काढलेला निष्कर्षही बोधप्रद आहे. ""पानिपतच्या युद्धामुळे सिद्ध झालेली महत्त्वाची गोष्ट ही, की मराठे हिंदुस्थानचे राज्यकर्ते म्हणून वागत होते. केवळ लुटारू म्हणून दुसऱ्या लुटारूशी लढले नाहीत. हिंदुस्थानात सत्ताधीश कोणी व्हावयाचे किंवा राहावयाचे याबद्दल वाद असो, पण हे राज्य हिंदी रहिवाशांचेच असले पाहिजे व तेच येथील राज्यकर्ते राहिले पाहिजेत, या तत्त्वासाठी मराठे पानिपतास लढले. परक्या अब्दालीला येथे कोणताच नैतिक हक्क नाही असे त्यांचे आव्हान होते. पेशव्याने 1752 च्या अदृदनाम्याने---- सहा सुभ्यांच्या चौथाईच्या बदल्यात दिल्लीच्या पातशाहीचे रक्षण अब्दालीपासून करण्याचे कार्य अंगावर घेतले होते. ते कार्य त्याने यथाशक्य पुढे चालविले. अब्दालीला दिल्लीतून व पंजाबातून हुसकून एकवार तरी त्याला अटकेपार घालवून मुलतान व पंजाब येथील कारभार वर्षभर त्यांनी केला. नंतर आलमगीर बादशहाने भाऊस फर्मान पाठवून स्वतःच्या रक्षणास बोलाविले. त्याप्रमाणे भाऊ दिल्लीस येऊन त्याने अब्दालीचा हस्तक घालवून मृत बादशहाचा मुलगा बादशहा म्हणून जाहीर केला. एवढेच नव्हे, तर त्याला साफ बुडविण्यासाठी कंबर कसली. बादशहास न जुमानणाऱ्या हिंदू व मुसलमान संस्थानिकांवर त्यांनी सारखे शस्त्र धरिले. एवढे सर्व त्यांनी आपण दिलेल्या शब्दासाठी व अंगावर घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी एकट्याने, दुसऱ्याच्या मदतीशिवाय केले. मोगलांच्या ताब्यातून गेलेले काबूल व कंदाहार हे अटकेपारचे दोन सुभेसुद्धा त्यांनी अब्दालीस देऊन टाकले नाहीत. मोगल साम्राज्याचा भाग म्हणून राखण्याचेच त्यांनी ठरविले व यासाठीच पानिपतचा पराभव आपणावर ओढवून घेतला. त्याच्याप्रमाणे एक लाख स्वार तयार ठेवण्याचे सामर्थ्य दुसऱ्या कोणत्याही सत्ताधीशाने त्या काळी दाखविले नाही. धार्मिक बाबतीत ते हिंदू-मुसलमान असा भेद करून वागले नाहीत किंवा त्यांनी आपल्या वागणुकीत कोठे धर्मवेडेपणाही दाखविला नाही. क्लाइव्हप्रमाणे खोटे कागद करून किंवा राजपूत मुसलमानांप्रमाणे मारेकरी घालून त्यांनी आपला हेतू साध्य केला नाही. युद्धानंतर शस्त्रे काढून घेतलेल्या कैद्यांची कत्तल त्यांनी केल्याचे ठाऊक नाही किंवा शत्रूची शिरे अकारण कापून त्यांच्या राशी घालण्याच्या वा ती भाल्यावर मिरवण्याचा रानटीपणाही त्यांनी कधी आचरिला नाही.''
शेजवलकरांच्या या विस्तृत उताऱ्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही.

 

No comments:

Post a Comment