छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहासप्रसिद्ध जिंजीचा प्रवास !
लेखक : डॉ. जयसिंगराव पवार (पुढारी, २९.३.२०००)
६. चन्नम्मा राणीने हिंदु धर्म आणि संस्कृती यांना इस्लामी आक्रमणापासून वाचवण्याचे शिवछत्रपतींचे कार्य ज्ञात असल्यामुळे राजाराम महाराजांना तिच्या राज्यातून सुखरूपपणे जाण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य करणे
ही हुलकावणी मार्गातील बिदनूरच्या चन्नमा राणीच्या सहकार्याने शक्य झाली. हिंदु धर्म आणि संस्कृती यांना इस्लामी आक्रमणापासून वाचवण्याचे
शिवछत्रपतींचे कार्य चन्नमास ज्ञात होते आणि म्हणूनच राजाराम महाराजांनी तिच्या राज्यातून सुखरूपपणे जाऊ देण्याचे आवाहन करताच तिने त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य देऊ केले. संकटग्रस्त मराठा राजास साहाय्य करणे हा तिने राजधर्म मानला आणि औरंगजेबाच्या संभाव्य क्रोधाची तमा न बाळगता तिने महाराजांच्या प्रवासाची गुप्तपणे चोख व्यवस्था केली. राणीच्या या साहाय्यामुळेच मराठ्यांचा राजा आपल्या सहकार्यांनिशी तुंगभद्रेच्या तिरावरील शिमोग्यास सुखरूपपणे पोहोचला. राणीच्या या साहाय्याची वार्ता औरंगजेबास समजताच त्याने तिला शिक्षा करण्यासाठी मोठी फौज रवाना केली; पण या फौजेचा समाचार मार्गातच संताजी घोरपड्याने घेऊन राणीचा बचाव केला.
७. राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणार्या एका बेटावर मुक्काम करत असतांना मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकणे
राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणार्या एका बेटावर मुक्काम करून होते. ऐन मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकला. या तुकडीचे नेतृत्व करत होता विजापूरचा सुभेदार सय्यद अब्दुल्ला खान. स्वतः औरंगजेबाच्या हुकमाने ३ दिवस ३ रात्र अखंड घोडदौड करून अब्दुल्ला खानाने राजाराम महाराजांस गाठले होते. सर्व दिशांनी मोगलांचा वेढा पडताच मराठ्यांनी सावध होऊन आपल्या राजाच्या रक्षणार्थ जोराचा प्रतिकार चालू केला. मोठी धुमश्चक्री उडाली.
No comments:
Post a Comment