राजस्थानातील मुसंडी
भाग २
रामसिंहाने त्याच्या वडिलांचे मराठय़ांसोबत चांगले वागण्याचे धोरण कायम ठेवले. त्याने काही मराठी ब्राह्मणांना जहागि-याही दिल्या. सनगोढ, मांगरोळ, अटोनी, इजारा येथे या जहागि-या होत्या. निळोजी प्रधान यांचा कोटय़ाला १६९७ मध्ये सत्कारही करण्यात आला. हा रामसिंह जजाऊच्या लढाईत १७७० मध्ये मारला गेला. त्याचा मुलगा राव भीमसिंह हा कोटय़ाच्या गादीवर आला. कोटय़ाच्या दक्षिण प्रांतात राजाविरुद्ध उठाव झाल्याने राजाने चंद्र पंडित आणि हिंदुराव यांना मदतीस बोलावून त्यांच्या करवी उठावाचा बंदोबस्त केला. या दोघांना मोठय़ा भेटी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
फरुखसियर १७१३ मध्ये दिल्लीचा बादशाह म्हणून गादीवर आल्यावर कोटय़ाच्या राजाने त्याचा सन्मान केला. पण बुंदीच्या राजाने मात्र काहीच केले नाही. कालांतराने भीमसिंहाने दाखवलेल्या हुशारीबद्दल त्याचा ‘महाराव’ असा किताब देऊन सत्कार करण्यात आला. १७१९ मध्ये त्याला बुंदी घेण्याची परवानगीही देण्यात आली. भीमसिंह १७२० मध्ये बु-हानपूरजवळ निजामाच्या विरुद्ध लढत असताना मृत्युमुखी पडला.
‘महाराव अर्जुनसिंह’ हा भीमसिंहाचा मुलगा कोटय़ाच्या गादीवर आला. दिल्लीत यावेळी उलथापालथ चालू असल्याने जयपूरच्या सवाई जयसिंहाने सर्व राजपुतांना एकत्र येण्याचे आवाहन केले. अनेक राजपूत राजे या योजनेच्या विरुद्ध होते. शिवाय जयसिंहाने दिल्लीला मुहम्मदशाहाच्या मदतीला आपली फौज पाठवली तरी त्या फौजेचे नेतृत्व करण्यास तो स्वत: गेला नव्हता. अर्जुनसिंहानेही तसेच केले होते. पण तो अचानक १७२३ मध्ये मृत्युमुखी पडला. यावेळी कोटय़ाचा १६७ मराठय़ांशी उत्तम संबंध होता.
No comments:
Post a Comment