मराठ्यांचा शेवटचा सरलष्कर "म्हलोजी घोरपडे"
"आबा, गाठू ना आपण शिरकान येळेवर?"
"आरं?, निस्त पोचून काय कामाचं? येळ आली तर शीर काटून ठिवाया लागय, शिवाजीऱ्हाज्याचा अंकुर जपाया!"
मराठी दोलत डुबवू पाहणाऱ्या त्या भयाण काळरात्री तो म्हातारा आपल्या दोन बांड्या पोरांसह जीवाच्या आकांतानं दौडत होता... पन्हाळ्यावरून.. संगमेश्वराकडे.... घाट-पांदीतून... गचपानातून...., कारण त्यांच्याही पुढे औरंग्याचा मुकर्रबखान सावज टिपायला उरफोडीनं दौडत होता...
मध्यरात्र उलटली नसेल तोच सपासप शांतता भेदीत दोन घोडाइत सरदेसायांच्या वाड्यात घुसले...खबर ऐकून कनोजाचा थरकाप उडाला... कसेबसे सावरीत ते सुखदालनाकडे झेपावले... महाराजांना जागे केले.
"को S ण ?"
"वकुत न्हाई.. घोडा फेकत एक फौज रानांतनं दौड घेतिया.. धन्यांनी खिन्नभर देरी न करता ह्याच वक्तीला संगमेश्वर सोडावं" - "इथल्या पांगपरास दौडीत लैई घोडा हाय.. तड न्हाई लागाय्ची" भेदरलेले खबरे एकापाठोपाठ बोलते झाले.
"शिर्क्यांची, शिर्क्यांची माणसं असतील ती, गनीमाची काय बिशाद ह्या गचपानात घुसायची? " महाराज जराश्या गाफीलपणानं बोलले....काळोखातल्या गाफीलपणाचा अंदाज त्यांना नीटसा आलाच नव्हता, अरेरे... चुटपुटत खबरे बाहेर पडले.
.
कोंबडं आरवायच्या आत,... अन दैव बलवत्तर म्हणून मुकर्रबखानाच्याही काही घटका अगोदर, आडवाटेनं जीवाची पर्वा न करता म्हातारा संमेश्वराच्या वेशीत शिबंदीसह घुसला... वायू वेगाने संगमेश्वराला घेर टाकत पांगणाऱ्या शिबंदीतून नरड्याच्या घाटा फुटून थरकाप उडविणाऱ्या कैक किलकिल्या उडाल्या.... " हाS र हाS र म्हादेव!!! ".... अन.. त्या विरायच्या आत... आली... घुसली...बेभान, बेलाग, शिवपुत्राच्या रक्तासाठी पिछाडलेली गनीमांची फौज धुरळा उडवीत वेशीच्या आत घुसली. "धीS न धीS न" आरोळ्या, कालवा, टापां साऱ्यांचा चिखल झाला...
भयकातर झालेले कुलेश, राया, अंता छत्रपतींना गदगदा हालवत किंचाळले "घात झाला... इळभर थांबू नगासा, घात झालाया.. हत्यार घ्या नि भाईर पडा... निघा.. निघा"
गर्रकन वळत.. म्यानातील तलवार सर्रकन उपसत.. म्यान तिथंच फेकून देत... त्याच हातात शंभुराजे ढाल तोलते झाले. " चला, भाईर व्हा, गाव येरगटलाय गनीमानं". राया, अंता, कुलेश, अर्जोजी, महाराज एकाच आवेगानं वाड्या बाहेर पडले... घोडी धरलेले मोतदार जीव डोळ्यात आणून टकमका दरवाज्याकडेच पाहत होते.. मराठ्यांचा राजा बाहेर काढण्यासाठी... वाचविण्यासाठी.
पण एव्हाना म्हाताऱ्याची फळी फोडून दहा-पंधरा हसम आत घुसले होते... पाठोपाठ पिसाळलेला इखलासखानही पिछाडीला शे-पाचशे हशम घेऊन महाराजाच्या अंगावर धडकला..
.पण म्हाताऱ्याचा सारा "जीव" महाराजांत अडकल्याने, जिवाची अन गनीमांच्या वारांची दोघांचीही पर्वा न करता म्हातारा संताजी-बहिर्जीसह पुढे झेपावलाच.... इखलासखानाला ते मोठ्या जिकरिने दरवाज्यापासीच आडवे आले...... झालं, टापा, आरोळ्या, खणाखणाट करत.. दरवाज्यावरच कुरुक्षेत्र पेटलं!
संभाजीराजांनी कसाबसा चंद्रावत माडांखाली घेतला.. लागलीच म्हाताऱ्याने स्वतःचा घोडा धन्यापासी नेला... भिंगरी सारखा तो धन्याभोवती फिरवत... वार झेलत.. वार करत.. म्हातारा ओरडत होता.. "धनी...धनी..भांगा काढा धनी.. नावडी.. व्हडक्यात बसून निघा.. जीवाची बाजी लावू आमी".. म्हाताऱ्याच्या मुखातून मराठी दोलत अक्षरशः आक्रोशत होती..
हातचे हत्यार सपासप फिरवत संभाजीराजे भांगा मिळेल तसा चंद्रावत घुसवत होते.
"म्हातारा, संताजी, बहिर्जी, कुलेश, अर्जोजी असे जानकुर्बान मराठे वादळातून दिवली जपून न्यावी तसे शिवाजीऱ्हाज्याच्या अंकुराला, शिवपुत्राला, मराठ्यांच्या राजाला नेण्याची पराकाष्टा करत होते. पाठीवरून घामाच्या धारा फुटल्या होत्या, नरड्याला कोरड पडली होती तरीही म्हातारा एकाही गनीमास राज्यांच्या जवळ फिरकू देत नव्हता... जीव गेला तरी बेहत्तर पण राजा वाचवायचाच या इर्षेने तो पेटला होता, अगदी बाजीप्रभू देशपांड्यांप्रमानं.."
काफरांच्या राज्याच्या अंगलटी भिडण्याच्या आड हा थेरडा येतो आहे हे हेरलेला इखलास म्हाताऱ्याकडे बोट दाखवत खाटिकाप्रमाने किंचाळला "घेर डालो, बुढ्ढेको.. घ्रेर डालो". ....आणि महाराजांची कड धरून असलेल्या म्हाताऱ्याला चवताळलेल्या हशमांनी लागलीच घेरून टाकलं... महाराजांच्या फळीपासून त्याला तोडून एकटं केलं जाऊ लागले... तरीही अजूनही हत्यार अन बुढी बोली कडकडत होती " धनी, नावडी, व्हडकी"...
पण आता?.... म्हाताऱ्याच्या अंगावर जागाच नव्हती जखम झेलायला..
आणि झालाच.. ...
शेवटचा हाशमी वार.. . जाड पात्याच्या हाशमी तेगीचा...
म्हाताऱ्याच्या छाताडावर.. !!!!
म्हातारा जनावरावरून खाली कोसळला... धाडकन.
दोलतिचा पाचवा मर्दांना सरलष्कर कोसळला.... ...."म्हलोजी घोरपडे" कोसळला.
.
साळसूद पाचोळा.
आधार- "छावा- शिवाजी सावंत"
No comments:
Post a Comment