! संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !
भाग ४
संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेतील संभाजीराजांचे तत्कालीन चित्रकाराने रंगवलेले चित्र नगर येथील संग्रहालयात आजही आहे. असंख्य यातना सहन करणार्या या तेजस्वी हिंदु राजाची नजर अत्यंत क्रुद्ध आहे, असे त्या चित्रात दिसते. संभाजीराजांच्या स्वाभिमानाचा परिचय त्या क्रुद्ध नजरेवरूनच होतो. १५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता.आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला. धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजे शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्दल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.
No comments:
Post a Comment