Total Pageviews

Sunday, 9 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २५५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २५५
खंडो बल्लाळ—
भाग १
खंडो बल्लाळ हा शिवाजी राजांचा आवडता व विश्वासू चिटणीस बाळाजी आवजी याचा दुसरा मुलगा होय. . याचा जन्म इ.स. १६६६ च्या सुमारास झाला असावा. खंडोबास घोड्यावर बसणें, तरवार मारणें व अक्षराचें वळण उत्तम वळवणें इत्यादि तत्कालीन उपयुक्त असें शिक्षण मिळालें होतें. खंडोबल्लाळाचा बांधा मजबूत असून हा अंगानेंही धिप्पाड होता.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो शिवशाहींत मंत्रीच्या कारस्थानानें घोंटाळा माजला त्यांत संभाजी राजे यांनां कोणी गैरवांका समजाविल्यामुळें बाळाजी आवजीवर त्यांची इतराजी झाली व त्याचा फायदा घेऊन कलुशानें बाळाजी आवजी व त्यांचे बंधू शामजी बाळा व वडील चिरंजीव आवजी यांस इ.स. १६८१ च्या आगष्ट महिन्यांत परळीखालीं उरमोडीच्या कंठीं मारिलें व खंडो बल्लाळ व निळोबल्लाळ यांस व्याघ्राकडून खावविण्यासाठीं म्हणून सातार्याजवळील `अजिमतारा’ गडावर नेऊन सदरेस उभे केलें. परंतु इतक्यांत कांहीं राजकारण आलें म्हणून कबजी बावाची मजालस उठली व या दोन लहान मुलांनां शिक्षा सांगण्याचें काम तहकूब राहिलें. या वेळी संभाजी महाराजाबरोबर येसूबाईहि सातारियाचे मुक्कामीं होती. तिला जेव्हां बाळाजीच्या वधाची वगैरे ही हकीकत समजली. तेव्हां तिनें संभाजी राजांची चांगलीच कानउघाडणी केली, व संभाजी राजांना झाल्या गोष्टीबद्दल फार पश्चाताप झाला. तेव्हां खंडोबल्लाळ व निळोबल्लाळ यांस येसूबाईनें सोडवून त्यांनां व त्यांचे मातुश्रीला दिलदिलासा देऊन आपल्या जवळ ठेऊन घेतलें. व विसाजी शंकरं राजापूरकर, बाळाजी आवजीचे मामा व लक्ष्मण आत्माजी व इतर कारकून पूर्वापार होते त्यांपासून चिटणीसाचें कामकाज संभाजी राजे घेऊं लागले. परंतु यापूर्वीच कलुशानें बाळाजीची चीजवस्त लुटून गांव इनाम जप्त करण्याचे हुकूम दिले होते. ते सोडवून घेण्याचें तसेंच राहिलें. येसूबाईनें या दोन मुलांना आपल्या जवळ ठेऊन घेतलें व त्यांच्या खर्चालाहि आपल्या खर्चांतून देऊं लागली. तिनें खंडो बल्लाळाला धीर देऊन त्याच्याकडून कामकाज घेऊन संभाजी राजाच्या नजरेस खंडो बल्लाळ येईल असें करूं लागली. तथापि संभाजी राजाच्या हाताखालीं काम करणें बरेंच धोक्याचें होतें. यापुढें संभाजी राजांनी चौलास वेढा दिला व गोवेकरांवर स्वारी केली त्यावेळीं खंडो बल्लाळ जवळ होते, व त्यांस पुष्कळ श्रम व साहस करावें लागलें.

No comments:

Post a Comment