भाग २४३
छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहासप्रसिद्ध जिंजीचा प्रवास !
लेखक : डॉ. जयसिंगराव पवार (पुढारी, २९.३.२०००)
भाग १
‘छत्रपती संभाजी महाराजांच्या मोगली छावणीत झालेल्या अत्यंत क्रूर आणि दारुण वधाने हिंदवी स्वराजाचा पायाच हादरून गेला होता. मोगली फौजा स्वराज्यात सर्व बाजूंनी घुसून आक्रमण करत होत्या. स्वराज्याचे गडकोट, ठाणी एकामागून एक याप्रमाणे शत्रूच्या हाती पडत होती. प्रत्यक्ष राजधानी रायगडला औरंगजेबाचा सेनापती जुल्फीकार खान याचा वेढा पडला होता आणि सर्व मराठा राजकुटुंबांसह मराठ्यांची राजधानी हस्तगत करून दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्या पाठोपाठ मराठेशाहीही खालसा करण्याचा दुराग्रह (जिद्द) बाळगत औरंगजेब महाराष्ट्रात छावणी करून बसला होता.
२. राजाराम महाराजांनी रायगडाबाहेर पडून अनेक किल्ल्यांवर जाणे, ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे मोगली फौजांनी त्यांचा पिच्छा पुरवणे आणि त्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेणे
अशा भयंकर संकटात रायगडावर संभाजी महाराजांची राणी येसूबाई आणि स्वराज्यातील प्रमुख अधिकारी यांनी एकत्र येऊन राजाराम महाराजांना मंचकारोहण करून त्यांना ‘छत्रपती’ म्हणून घोषित केले आणि ‘मराठ्यांचे राज्य बुडालेले नाही, एवढेच नव्हे, तर मराठ्यांचे शत्रूंशी निकराने युद्ध
चालूच राहील’, हे त्यांनी बादशहास दाखवून दिले. अशा प्रसंगी रायगडावर राजकुटुंबातील सर्वच व्यक्तींनी एकाच स्थानी अडकून रहाणे धोक्याचे होते; म्हणून राजाराम महाराजांनी आपल्या सहकार्यांसह गडाबाहेर पडावे, किल्लो-किल्ले फिरते राहून शत्रूशी प्रतिकार चालू ठेवावा आणि त्यातूनही बिकट
परिस्थिती उद्भवली, तर जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात जिंजीकडे निघून जावे, अशी मसलत येसूबार्इंच्या मार्गदर्शनाखाली ठरली. त्यानुसार राजाराम महाराज रायगडाबाहेर पडून प्रतापगडास आले. प्रतापगडाहून सज्जनगड, सातारा, वसंतगड असे करत पन्हाळ्यास पोहोचले. ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे
मोगली फौजांनी त्यांचा पिच्छा पुरवला. लवकरच पन्हाळ्यासही मोगलांचा वेढा पडला. स्वराज्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट बनू लागली. तेव्हा पूर्वनियोजित मसलतीप्रमाणे राजाराम महाराजांनी आपल्या प्रमुख सहकार्यांनिशी जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेतला.
No comments:
Post a Comment