हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २५६
खंडो बल्लाळ—
भाग २
`एका गांवास कौल लिहून द्यावयास सांगितला तो तरी धावतां लिहितां नये म्हणून मागीं बसोन कागद लिहिला. तो तीन चार कोश स्वारी गेली. नि:संग धावोन स्वारी आटोपिली कागद वाचोन दाखवून पालखीत सिके होते. राजश्रीनीं सिका केला. कागद जाबकरी यांचे हातावर देतांच आपास कलमल येऊन रगत वमन जालें. राजश्रींनीं मागें फिरोन दृष्टीस पडिल्यावरी पालखी उभी करून जवळ बोलाऊन नेलें आणि मेहेरबान होऊन बारीचा कोतवालपैकीं घोडा बसायवास दिला. पुढें राजश्रींनी कुंभारजुवेंवर हल्ला केला व फिरंग्याची व संभाजीची लढाई झाली त्यांत राजश्रीचे पुढें चहू हातावर आपाचा घोडा, केव्हां राजश्रीचे घोड्याचे तोंड आपाच्या घोड्याचे दांडीस’’ अशा तर्हेनें खंडोजीची निष्ठा व कामगिरी पाहून संभाजी राजांनी परत रायगडी आल्यावर इ.स. १६८३ च्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस चिटनिसीचीं वस्त्रें वगैरे मान देऊन चिटनीसी त्याचे हातें घेऊ लागले व त्यामुळें कलुशाच्या कारभाराला आळा बसला. याप्रमाणें कारभार चालत आहे तोंच इ.स. १६८८ च्या नोव्हेंबरांत संभाजी राजा कलुशाच्या मदतीस गेला व संगमेश्वरीं शिर्क्यांचा मोड करून खेळण्यास जाऊन राहिला. कबिला बरोबर होता तो पुढें रवाना करून संभाजी राजे संगमेश्वरास एक दिवस मुक्काम करून राहिला. येथें शेख निजाझ उर्फ तकरीबखान यानें त्यास अचानक पकडलें. हें वर्तमान कबिल्याबरोबर असणार्या खंडोजीस कळतांच त्यानें येसूबाईंच्या मेण्यांत आपली मावसबहीण संतुबाई इला ठेऊन आपण व संताजी घोरपडे येसूबाई व शिवाजी यांनां घेऊन जलदीनें मजलीवर मजली मारीत रायगडास येऊन पोहोंचले. इतक्यांत मोगलांनीं हा कबिला पकडला व `संतुबाईला’ येसुबाई म्हणून पकडून नेली. तिनें खंडोजीनें दिलेली हिरकणी खाऊन प्राण दिला असें म्हणतात. पुढें राजारामाबरोबर चंदीस गेलेल्या मंडळींत खंडो बल्लाळहि होता व त्या सर्व मंडळींस त्या प्रवासांत अनेक संकटें व हाल सोसावे लागले. एक प्रसंगीं त्याच्या मुलास (बहिरोजीस) त्याजबद्दल कैदेंत रहावें लागलें व पुढें बाटविल्यामुळें त्यानें आत्महत्या केलीं. एका प्रसंगी त्यास तटावरून उडी टाकावी लागल्यामुळें त्याचा पाय कायमचा अधु झाला.
झुल्पिकारखानानें चंदीस वेढा घातला असतां राजारामास तेथून काढून लावण्याच्या कामीं खंडो बल्लाळानें शिर्के मोहिते यांजबरोबर कारस्थान केलें व त्या कामीं त्यास दाभोली व कुचरी गांवची आपली सरदेशमुखीचीं वतनें सोडावीं लागलीं. नंतर ही चंदीहून निघालेली मंडळी कांहीं काल कर्नाटकांत गनीमी लढाया करीत राहून पन्हाळा व विशाळगडीं येऊन राहिली व तेथून पुढील कार्यक्रम चालू केला. इतक्यांत राजाराम महाराज निवर्तले. त्यावेळीं राजारामानें शाहूवरच लक्ष ठेवून आजपर्यंत ज्याप्रमाणें कारभार केला तसाच करावा असें सांगून आणाभाका घेतल्या. परंतु ताराबाईनें तें न ऐकतां शिवाजीस गादीवर बसविलें. त्यामुळें व इतर कारणामुळें खंडोजी व ताराबाईंचें पटलें नाहीं
No comments:
Post a Comment