Total Pageviews

Tuesday, 11 April 2023

#जोतिबा_यात्रेचे_शाहूकालीन_व्यवस्थापन व ऐतिहासिक माहीती*.




#जोतिबा_यात्रेचे_शाहूकालीन_व्यवस्थापन
व ऐतिहासिक माहीती*.
दरवर्षी भाविकांच्या अमाप गर्दीत तसेच उत्साहात साजऱ्या होणाऱ्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेचे तसेच जोतिबा देवस्थानचे महत्त्व राजर्षी शाहू महाराजांनी जाणलेले होते. इ. स. १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानची सूत्रे हाती घेतल्यानंतर यात्राकाळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी त्यांनी अनेक विधायक निर्णय घेतले व ते अमलातही आणले.
वाडी रत्नागिरी ऊर्फ जोतिबा देवस्थानला फार प्राचीन व ऐतिहासिक परंपरा लाभलेली
आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणारे कोल्हापूरचे आराध्य दैवत देवी श्री अंबाबाई या देवस्थानच्या समकालीन असणारे जोतिबा देवस्थान आहे. कोल्हापूरपासून अवघ्या २० किलोमीटरवर हे देवस्थान वसलेले आहे. शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची नातसून करवीरकर जिजाबाई यांच्या कारकिर्दीत या देवस्थानच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी तळ्याची उभारणी झाल्याचे दिसून येते. जोतिबा डोंगरावरील श्री यमाई मंदिराजवळ हे तळे करवीरकर जिजाबाई यांनी उभारलेले आहे. या तळ्याच्या दक्षिण दरवाजाच्या कमानीवर याबाबतचा शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखाचे वर्णन 'करवीर रियासत' या पुस्तकात आढळते. तसेच पन्हाळ्यावरील ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. मु. गो. गुळवणी यांनी १९५७ साली लिहिलेल्या जय केदार अर्थात जोतिबा या पुस्तकातही या शिलालेखाचा उल्लेख आलेला आहे.
जोतिबा देवस्थानकडे एक पोर्तुगीज घंटा आहे. ती शककर्ते शिवाजी महाराजांचे नातू व राष्ट्रवीर छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज (सातारा) यांनी जोतिबा देवस्थानला अर्पण केलेली आहे. या संदर्भातील एक पत्र कोल्हापूर पुरालेखागारातील ऐतिहासिक कागदपत्रांमधील 'निवडी दप्तर' या विभागात आहे. ही घंटा आजही जोतिबा देवस्थान येथील दक्षिण दरवाजाच्या वर असल्याचे दिसून येते. तसेच अंबाबाई मंदिरातील घंटा कालांतराने कोल्हापुरातील टाउन हॉल येथील वस्तुसंग्रहालयात जमा केलेली आहे. वस्तुसंग्रहालयातही या घंटेबाबत कागदपत्रांमध्ये नोंद आहे.
दरवर्षी भाविकांच्या अमाप गर्दीत तसेच उत्साहात साजऱ्या होणाऱ्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेचे तसेच या जोतिबा देवस्थानचे महत्त्व राजर्षी शाहू महाराजांनी जाणलेले होते. यात्राकाळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी त्यांनी अनेक विधायक निर्णय घेतले व ते अमलातही आणले. इ. स. १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी जोतिबा डोंगरावरील दलित समाजाच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी विहीर बांधण्यासाठी १६२ रुपये मंजूर केले होते. कोल्हापूर संस्थानात इ. स. १८९९ मध्ये प्लेगची साथ पसरल्याने संस्थानातील बहुतांश देवस्थानच्या यात्रा व इतर प्रमुख सोहळे शाहू महाराजांनी रद्द केले होते. त्यांनी प्लेगच्या साथीच्या काळात राबविलेल्या अनेक विविध उपाययोजनांमुळे साथ आटोक्यात आणणे शक्य झाले.
या काळात जोतिबा देवस्थानची यात्राही मोठ्या प्रमाणावर भरलेली नव्हती. पण शाहू महाराजांच्या अथक प्रयत्नाने प्लेगची साथ बऱ्याचअंशी आटोक्यात आली. इ. स. १९०० मध्ये जोतिबा देवस्थानची यात्रा अनियंत्रितपणे भरू द्यावी, असा हुकूम शाहू महाराजांनी दिलेला होता. प्लेगच्या साथीच्या काळात प्लेगचा बंदोबस्त व्हावा यासाठी लसीकरण केलेल्या लोकांचे दाखले यात्राकाळात तपासण्यासाठी एक हंगामी कारकून महाराजांनी जोतिबा डोंगरावर नेमलेला होता. त्याच्या भत्त्याची भक्कम एक विशेष बाब समजून त्याला देण्याबाबतही महाराजांनी हुकूम दिलेला होता.
यात्राकाळात येणाऱ्या भाविकांचे सामाजिक प्रबोधन व्हावे यासाठी इ. स. १९०३ मध्ये जोतिबा डोंगर येथे जनावरांचा बाजार व जनावरांचे प्रदर्शन भरविण्याचे मंजूर केलेले होते. जनावरे विक्रीस घेऊन येणाऱ्या व्यक्तीकडून तसेच या बाजारात जनावरे विकत घेणाऱ्या व्यक्तीकडून कोणताही कर घेऊ नये असा हुकूम महाराजांनी दिलेला होता. फक्त या व्यक्तींकडे संस्थानचा जनावरे खरेदी- विक्री करण्याचा दाखला असणे जरूरीचे केलेले होते. या बाजारात जनावरे घेणाऱ्या व्यक्तीने प्रथम कर भरावा व नंतर संस्थानचा दाखला दाखवून तो कर परत घ्यावा, याचीही सोय शाहू महाराजांनी केलेली होती.
इ. स. १९०४ मध्ये जोतिबा डोंगर येथे यात्राकाळात भरलेल्या जनावरांच्या प्रदर्शनात उत्तम प्रतीच्या जनावरास बक्षीस देण्यासाठी १२५३ रुपये मंजूर केलेले होते. यात्राकाळात येणाऱ्या यात्रेकरूंच्या तसेच जनावरांच्या बाजारात येणाऱ्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी जो खर्च होईल तो देवस्थानने करामधील शिल्लक रकमेतून करावा, असा हुकूम दिला होता. यात्रेकरूंच्या पिण्याच्या पाण्याची तसेच निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी शाहू महाराजांनी विशेष प्रयत्न केले होते. १९०३ मध्ये जोतिबा डोंगरावरील चव्हाण तळे, बेडूक बाव, कारदगेकराची विहीर यातील गाळ काढून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी २००-३०० रुपये खर्च करण्याचा आदेशही त्यांनी दिलेला होता.
१९०४ मध्ये जोतिबा डोंगरावरील धर्मशाळेनजीकच्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी १५० रुपये कराच्या रकमेतून खर्च करावेत, असा हुकूमही महाराजांनी दिलेला होता. पुढे याच वर्षी गायमुख तलावातील गाळ काढून तेथे इतर सुधारणा करण्यासाठी तब्बल १३७८ रुपये कराच्या रकमेतून खर्च करावेत असा हुकूम दिला होता. १९०७ मध्ये यात्रेकरूंच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी तसेच मैला निर्गतीसाठी सोय करण्यास ३१८ रुपये देवस्थानच्या शिल्लक रकमेतून खर्च करण्याबाबत आदेश दिलेला होता. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी विविध ठिकाणी महाराजांनी धर्मशाळेची उभारणी केलेली होती. मादळे गावच्या हद्दीत पाण्याच्या झऱ्यानजीक धर्मशाळा उभारण्यास १९०४ मध्ये सुरुवात करून ही धर्मशाळा १९०५ मध्ये पूर्ण झाली. यासाठी ११४४ रुपये सहा आणे खर्च आला होता. तो खर्चही महाराजांनी मंजूर केला. जोतिबा डोंगरावरील दलित लोकांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधण्यासाठी कराच्या रकमेतून ३०० रुपये देण्याचे महाराजांनी मंजूर केलेले होते. मौजे कुशिरे गावच्या हद्दीत धर्मशाळा बांधण्याची जबाबदारी संस्थानचे डिस्ट्रिक्ट ऑफिसर दक्षिण भाग विठ्ठल सदाशिव देसाई यांच्याकडे सोपविलेली होती. १९०७ मध्ये वाडी रत्नागिरी डोंगर रस्त्याच्या सातव्या मैलात पाण्याच्या टाकीनजीक दोन धर्मशाळा बांधण्यास दोन हजार रुपयांची मंजुरी दिली होती. तसेच या धर्मशाळेच्या रखवालीस व तेथे लावलेल्या लिंबाच्या रोपांना पाणी घालण्यासाठी एक व्यक्ती दरमहा पाच रुपये पगारावर नेमलेला होता. चैत्र पौर्णिमेची यात्रा ऐन उन्हाळ्यात येत असल्याने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या निवाऱ्याच्या सोयीसाठी जोतिबा डोंगरावर इ. स. १९०४ मध्ये झाडे लावण्यासाठी २०७ रुपये दोन आणे मंजूर केलेले होते.
चैत्र पौर्णिमेच्या यात्राकाळात जोतिबा डोंगरावर स्वच्छता राहावी असा शाहू महाराजांचा कटाक्ष होता. यासाठी १९०६ मध्ये यात्राकाळात स्वच्छता ठेवण्यासाठी ३१९ रुपये ६ आणे ६ पैशांची मंजुरी महाराजांनी दिलेली होती. १९०८ मध्ये यात्राकाळात स्वच्छता ठेवण्यासाठी ३०० रुपयांची मंजुरी दिलेली होती. १९१२ मध्ये चैत्र यात्रेत तसेच इतर दिवशीही स्वच्छता ठेवण्यासाठी एक भंगी व डोंगरावर लावलेल्या झाडांच्या रखवालीसाठी एक व्यक्ती नेमून त्याच्या पगारासाठी दरवर्षी १४६ रुपयांच्या खर्चासही हे काम सार्वजनिक व महत्त्वाचे असल्याने शाहू महाराजांनी मंजुरी दिलेली होती. जोतिबा डोंगरावरील हत्तीच्या सोयीसाठी हत्तीमहाल ही इमारत दुमजली करण्यासाठी १८२० रुपये महाराजांनी मंजूर केलेले होते.
महाराजांनी जोतिबा देवस्थानकडे आणखी एक विधायक प्रयोग केलेला होता. त्यांनी गायमुख तलावाजवळ रेशीम तयार करण्याचा कारखाना काढला होता. संस्थानातील लोकांना या उद्योगाचे जास्त ज्ञान नसल्याने त्यासाठी एक माणूस खास जपानवरून मागवलेला होता. त्याचे नाव रिओ झो तोफो असे होते. त्याच्यावर रेशीम कारखान्याची सर्व जबाबदारी सोपवून दरमहा २५ रुपये पगारावर त्याची नेमणूक केली होती. तसेच कारखान्याच्या उत्पन्नाचा (खर्च वजा जाता) तिसरा हिस्सा देऊन भागीदार म्हणून नेमलेले होते. तसेच या कारखान्यासाठी गायमुख तलावाजवळ तुतूच्या झाडांची लागवडही महाराजांनी केलेली होती.

 

No comments:

Post a Comment